कर्मयोगी शिवशंकर भाऊ
श्रीसंत गजानन महाराज मंदीर संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे मागच्या आठवड्यात वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले. जवळपास चाळीस वर्षे गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. तसेच श्री गजानन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम केले होते. केवळ एका मंदीर संस्थानचे प्रमुख इतक्या मर्यादेत त्यांचे व्यक्तित्व मर्यादित झालेले नव्हते. त्यांच्या कामाचा, विचारांचा आणि संस्करांचा खूप मोठा ठसा त्यांनी उमटवेला आहे. त्यांच्या पाऊलखुणा प्रदीर्घ काळपर्यंत पहायला मिळतील.
साधारण १९८५ च्या सुमारास एका अभ्यासाच्या योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संघटनांच्या व्यवस्थापन प्रणालींचा अभ्यास करण्याच्या खटाटोपात मी होतो. आणि त्याचाच भाग म्हणून शेगावला माझे जाणे झाले होते. संत गजानन महाराज मंदीराच्या आवारातल्या ट्रस्टच्या कार्यालयात ट्रस्टचे प्रमुख शिवशंकरभाऊ यांची भेट घेण्याचा योग आला.
माझ्या तिथे येण्याचे प्रयोजन सांगितल्यावर जवळपास पाच-सहा तास स्वतः हिंडून त्यांनी मला त्यांच्या संस्थेचे कामकाज दाखवले होते. त्यावेळी अर्थातच आजच्या इतका मोठा व्याप नव्हता. पण ते दाखवीत असलेल्या योजनांमधून त्यांच्या विचारांचे वेगळेपण आणि त्यातला निखळ सेवाभाव सतत जाणवत होता. त्या सगळ्या भूमिकांना आणि विचारांना आमच्या व्यवस्थापनाच्या पाश्चात्य विचारांवर पोसलेल्या पुस्तकी संकल्पनांमध्ये बसवणे कठीणच होते.
मला आठवतंय, त्यावेळी संस्थानने शेगाव रेल्वे स्थानकावरून प्रवाशांना मंदिरात आणण्यासाठी त्याकाळी टांगे होते. टांगेवाल्यांचा आणि प्रवाशांचा वादविवाद आणि प्रवाशांची होणारी अडवणूक नित्याची होती. भाऊंनी संस्थानची स्वतःची बस घेतली होती आणि टांगेवाल्यांचा सुरुवातीचा विरोध सहन करीत. त्यांनादेखील त्या योजनेत सामावून घेत ती बससेवा यशस्वी केली होती. निशुल्क बससेवेमुळे भाविकांची खूप मोठी सोय झाली होती. भाविकांनी भक्तीभावनेने दिलेल्या देणगीमधून एक हिस्सा प्रसाद म्हणून भाविकांना देण्याची पद्धत त्याकाळी मला खूप भावली होती. एरवी भाविकांना लुबाडले जाते असा अनुभव इतरत्र येत असतांना ह्या संस्थानची ही पद्धत भाविकांसह सर्वांनाच सामावून घेणारी म्हणूनच वेगळी वाटली होती.
पुढे अनेकवेळा शेगावला जाणे झाले. तरी अगदी तीनचार प्रसंग वगळता मुद्दाम त्यांची भेट घेणे झाले नाही. पण शेगाव हा माझ्या सततच्या औत्सुक्याचा विषय राहिला आहे. तिथली स्वच्छता, वर्तणुकीतला सेवाभाव, सगळ्याच व्यवहारातला प्रामाणिक पारदर्शीपणा , भाविकांना जास्तीत जास्त सोयी पुरवण्याचा सततच प्रयत्न ह्या सगळ्या गोष्टी शेगावचे वेगळेपणाची सतत जाणीव करुन देत असतात. आता सेवाभावाची प्रचिती केवळ शेगावपुरती मर्यादित न ठेवता पंढरपूर, त्र्यंबकेश्वर अशा अनेक ठिकाणी नव्यानव्या उपक्रमांमधून त्याचा फैलाव झाला आहे.
गजानन महाराज संस्थानचा निस्वार्थ कारभार सांभाळत असताना संस्थानच्या माध्यमातून शिवशंकरभाऊंनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक असे अनेक उपक्रम राबविले. त्यामुळेच भाविकांसह जनतेने त्यांना कर्मयोगी उपाधीने सन्मानित केले. वयाच्या अठराव्या शिवशंकरभाऊ मंदिर व्यवस्थापनाच्या कार्यात सामील झाले. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती या त्रिसूत्री नुसार काम करत शिवशंकरभाऊंनी मंदिर व्यवस्थापनाचे एक उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले आहे. संस्थानच्या या अवाढव्य कारभाराचे नियोजन आणि नियंत्रण करण्याची शिवशंकरभाऊंची निस्वार्थ शैली जगभरातल्या अर्थतज्ञ, नियोजन तज्ज्ञांसाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे.
श्री गजानन महाराज मंदीर असेल, किंवा भक्तनिवास असेल किंवा देणग्यांच्या मोहात न पडता चालवलेले इंजिनियरिंग कॉलेज असेल किंवा आनंदसागरसारखा प्रचंड मोठा प्रकल्प असो त्यातून त्यांच्या निर्मोही सेवाभावी वृत्तीचा आपल्याला परिचय येत असतो. गजानन महाराज देवस्थानचे भक्तनिवास आणि तिथली प्रसादालये .. तिथे मिळणाऱ्या भोजनाचा दर्जा .. विनम्रपणाने भाविकांना परमेश्वरस्वरुप मानून मिळणारी सेवा .. पण शिस्तीचे तितकेच कडक दंडक आणि ते पाळण्याचा नम्रपणाने पण ठामपणाने होणारा आग्रह .. अगदी छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीला मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या .. पंढरपूरच्या वारीतली संस्थानची दिंडी .. कितीतरी गोष्टी आहेत.
शिवशंकरभाऊंच्या विचारांची साक्ष आपल्याला ह्या सगळ्यातून सतत जाणवत राहते. हे सर्व साधतांना राजकारणाच्या दलदलीत न अडकण्याचा ठामपणा , शासकीय मानसन्मान नम्रपणाने नाकारणामधला निस्पृह भाव शिवशंकरभाऊंच्या वेगळेपणाची साक्ष देत असतात.
देशात इतरत्रदेखील अनेक मोठी आणि संपन्न मंदीरे आहेत. तिरूपति, शिर्डी यासारख्या संस्थांनांच्या कारभारांचा आपल्यापैकी अनेकांना अनुभव आलेला असतो. अशा देवस्थानांचे नियमन करणाऱ्या संस्था केवळ आर्थिक दृष्ट्या संपन्न असल्या म्हणजे भाविकांना तिथल्या वातावरणात समाधान मिळते असे नाही. इतर देवस्थाने आणि शेगाव यात मला हा फरक सतत जाणवत राहिलेला आहे. यामागे शिवशंकरभाऊंनी शेगाव संस्थानला दिलेले वळण हेच एकमात्र महत्वाचे कारण आहे हे नक्की. त्यांना आदरांजली.