जसजसा संगणकाचा प्रसार व्हायला लागला तसे ह्या क्षेत्रातील व्हायसचा प्रसार धोकादायक असल्याचे लक्षात यायला लागले आणि मग अँटीव्हायरस सॉफ्टवेअर्स आवश्यक व्हायला लागली . १९८६ मध्ये दोन पाकिस्तानी तंत्रज्ञांनी पहिला कॉम्प्युटर व्हायरस तयार केला . त्याचे उत्तर म्हणून जॉन मॅकेफी यांनी १९८७मध्ये त्यांनी जगातील पहिले व्यावसायिक अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर तयार केले. पुढे त्यांच्या नावाने अॅंटी व्हायरस सॉफ्टवेअरची जगभरात काम करणारी एक अग्रणी कंपनी निर्माण झाली. त्याच्याच नावाने ओळखली जाणारी ही अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर कंपनी जगभर पसरली पण स्वतः मॅकेफी यांना मात्र ह्या सगळ्याच्या श्रेयापासून दूर रहावे लागले.
मूळचे इंग्लंडमध्ये जन्मलेले शहात्तर वर्षीय जॉन मॅकेफी यांचे बालपण अमेरिकेत गेले. त्यांनी व्हर्जिनियामधील रोआनोके कॉलेजमधून गणिताची पदवी प्राप्त केली. पदवी मिळविल्यानंतर गणितात विषयात डॉक्टरेट मिळवण्याची धडपड सुरु केली. पण त्याला यश मिळाले नाही . त्यांची पहिली पत्नी ड्रगच्या रॅकेटमध्ये सापडल्याच्या कारणामुळे त्यांना डॉक्टरेट मिळवण्याचा खटाटोप सोडवा लागला. त्यानंतर त्यांनी नासा, झेरॉक्स आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या अग्रगण्य कंपन्यांसाठी काम केले. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती त्यांच्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरमुळे.
पाकिस्तानी तंत्रज्ञांनी बनवलेले व्हायरस अमेरिकन कम्प्युटर्स निकामी करत असल्याची बातमी मॅकेफीने वाचली. यानंतर त्यांनी त्यांचे एक अँटीव्हायरस सॉफ्टवेअर लॉन्च केलं . कॅलिफोर्नियातील सांता क्लारा इथल्या घरून जॉन मॅकेफी अँसोसीएटस्ची सुरुवात केली. आपले सॉफ्टवेअर लोकांना मुक्तपणे उपलब्ध व्हावं, यासाठी त्याची मेसेंजिंग बोर्डवर जाहिरात दिली. त्यांची ही आयडिया भन्नाट चालली आणि ते अमेरिकेच्या प्रभावी लोकांच्या रांगेत जाऊन बसले. त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रांत त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्याबरोबरच त्यांना चांगला पैसा देखील मिळाला.
२०११मध्ये त्यांनी आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेल या प्रसिद्ध कंपनीला विकून टाकली . मात्र, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम अजूनही त्यांच्याच नावाने सुरू आहे. जगभरात त्यांच्या या सॉफ्टवेअरचा उपयोग अंदाजे ५० कोटी ग्राहक करतात. २००० मध्ये त्यांनी एक योग स्टुडिओ सुरू केला आणि त्यांनी स्वच्छ आणि आर्थिक घोटाळ्यात पासून मुक्त असं आयुष्य व्यतीत करावे असे प्रयत्नदेखील केले. २००९ मध्ये अमेरिकेत आर्थिक मंदी आली आणि याचा त्यांना खूप मोठा फटका बसला. त्यावेळी त्यांना त्यांची संपत्ती देखील विकावी लागली.
व्यक्तिगत आयुष्यात मात्र जॉन मॅकेफी सतत वादाच्या घेऱ्यात सापडत राहिले . पहिल्या दोन पत्नींच्या पासून घटस्फोट घेतल्यावर अखेरीस त्यांनी त्यांनी कॉलगर्ल राहिलेल्या जेनिस डायसन सोबत लग्न केलं होते. डायसनला एका हिंसक दलालाला पासून आणि तस्करांपासून वाचवलं होतं. त्यानंतर मॅकेफी आपल्या दूर झालेल्या मुलाला पुन्हा भेटले आणि आयुष्याची नवीन सुरुवात केली होती . त्यांना अनेक गर्लफ्रेंड होत्या, अनेक मुलींशी त्यांचे संबंध देखील राहिलेत.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर करचोरीचा आरोप करण्यात आला. त्याचबरोबर टेनेसी आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याबाबतही न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या आरोपानंतर मॅकेफी फरार झाले. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठीही त्याने एक-दोनदा प्रयत्न करून पाहिले. पण गेल्या वर्षी ऑक्टोबरात त्याला अमेरिकेच्या विनंतीवरून कर चुकवेगिरी प्रकरणी स्पेनमध्ये अटक झाली.अनेक देशांचे पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर ऑक्टोबर २०२० मध्ये जॉन मॅकेफी यांना बार्सिलोना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. तुरुंगात त्यांना निराशेने ग्रासले होते.
स्पेनमधल्या कोर्टात त्यांचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याबद्दलचा खटला चालू होता. नुकतीच त्यांच्या प्रत्यार्पणाला कोर्टाने संमती दिली होती. ते करचुकवेगिरी, बदफैलीपणा, वादग्रस्त विधाने यांमुळे कुप्रसिद्ध झालेला फरारी उद्योगपती अशा चढउतारांनी भरलेला जॉन मॅकअफीचा जीवनप्रवास बार्सिलोनाच्या एका तुरुंगात अखेर संपला.
त्यांच्या मृत्यूमुळे एक वादळी, वादग्रस्त पण तितकेच नवनिर्मितीची प्रतिभा असणारे व्यक्तिमत्व नाहीसे झाले. जॉन ही व्यक्ती जगातून नाहीशी झाली असली तरी कंप्युटर सॉफ्टवेअर वापरणारी जगभरातले कोट्यवधी लोकांच्या दररोजच्या वापरात मॅकेफी हे नाव कायमच येत राहणार आहे, हे नक्की.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!