ऋषीतुल्य शिक्षणतज्ञ डॉ. प्र. ल. गावडे
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात जवळपास सात दशकांचा प्रदीर्घ काळ कार्य करणारे आणि स्वतःची वेगळी छाप निर्माण करणारे एक ऋषीतुल्य व्यक्तित्व म्हणून ओळख असणारे डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे यांचे परवा वयाच्या ९६ व्या वर्षी पुण्यात निधन झाले आणि शिक्षण क्षेत्रातला एक अध्याय संपला.
डॉ. गावडे मूळचे नगर जिल्ह्यातल्या नेवाशाचे. त्यांचे माध्यमिक शिक्षण नगरच्या फिरोदिया विद्यालयात झाले. पुढचे महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालय व एस पी कॉलेजात झाले. एम. ए आणि एम एड झाल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. ही पदवी संपादन केली. त्यांनी ‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंध या पदवीसाठी सादर केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाङ्मयाचा साक्षेपाने, विस्तृत मूलग्राही अभ्यास करून, संशोधन करून हा प्रबंध सिद्ध झालेला होता. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली, वैचारिक शिस्तीत साकार झालेल्या या प्रबंधास उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पुणे विद्यापीठातर्फे ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ मिळाले होते तसेच या ग्रंथास महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला होता. स्वातंत्र्यवीरांच्या कार्यावर संशोधन करुन लोहिला गेलेल्या तो पहिलाच प्रबंध होता हे विशेष.
जवळपास छत्तीस वर्षे प्रत्यक्षपणे अध्यापक, मुख्याध्यापक म्हणून काम केले. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग आणि ’, नूमवि तसेच विमलाबाई गरवारे विद्यालयात त्यांनी काम केले . तसेच पदवी व पदव्युत्तर वर्गांसाठी देखील त्यांनी अध्यापन केलले आहे. गरवारे महाविद्यालय , एस एन डी टी कॉलेज तसेच पुणे विद्यापीठातील मराठी अशा विविध ठिकाणी, विविध स्तरांवर त्यांनी मराठी-वाङ्मयमयाचे अध्यापन केले. याशिवाय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासनात देखील विविध पदांवर त्यांनी अनेक वर्षे काम केले होते.
डॉ. प्र. ल. गावडे यांनी विपुल लेखन केलेले आहे. स्वतंत्र ग्रंथलेखन, संत साहित्यावरील लेखन, शैक्षणिक लेखन, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर लेखन, शैक्षणिक पुस्तकांचे संपादन, शासकीय पाठ्यपुस्तक-निर्मितीसाठी संपादन, मान्यवर व्यक्ती परिचय-ग्रंथ व लेखन यांचे लेखन, इत्यादी प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय त्यांचे अगणित प्रासंगिक लेखन प्रकाशित झालेले आहे. त्याचा आढावा घेणे मूल्यमापन करणे हे एक स्वतंत्र कार्य – संशोधन कार्य आहे.
‘कवी यशवंत – काव्यरसग्रहण’ व ‘सावरकरांचे साहित्यविचार’ ही स्वतंत्र पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘अजिंक्यतारा’ या ना.ह.आपटे यांच्या कादंबरीचे संपादन त्यांनी केले आहे.
संतसाहित्य हा त्यांच्या संशोधनाचा व चिंतनाचा विषय होता ‘श्री तुकाराम गाथा’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘श्री ज्ञानेश्वर वाङ्मय सूची’ व ‘श्रीनामदेवकृत श्री ज्ञानेश्वर समाधी अभंग’ या संपादित पुस्तकांचे प्रकाशन ‘श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान, आळंदी’ यांनी केले आहे. ‘संजीवन’ हा संपादित ग्रंथ श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवनसमाधी सप्तशताब्दीनिमित्ताने प्रकाशित झालेला आहे. ‘शारदीयेचे चंद्रकळे’ हे पुस्तक आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रकाशन आहे. प्राज्ञ पाठशाळा, वाई, ‘विश्वकोश’ ग्रंथलेखनात अभ्यागत संपादक म्हणून ते सहभागी झालेले आहेत.
‘माध्यमिक शिक्षण-विचार, आचार, व्यवहार’ हे त्यांचे स्वतंत्र पुस्तक शिक्षणक्षेत्रातील अध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षण विषयाचे मार्गदर्शक व शासनाचे अधिकारी या सर्वांनाच मार्गदर्शक ठरलेले आहे. त्यांनी जे शिक्षण विषयक स्फुट लेखन केले त्यातील निवडक लेखांचा संग्रह आहे. त्यांनी ‘विचार प्राथमिक शिक्षणाचा’ हा ग्रंथ प्राथमिक शिक्षणासंबंधी महत्वाचा ठरला आहे. याशिवाय अनेक वर्षे ते मराठी ह्या विषयाच्या शालेय व महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांच्या लेखनाशी संबंधित होते. एक विचारवंत व प्रभावी वक्ते म्हणून ते प्रसिद्ध होते .मसापच्या कामातही विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणाने सांभाळल्या होत्या.
मराठीतील उत्कृष्ट ग्रंथांना राज्यपुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या ग्रंथ समीक्षक समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा , ‘कामायनी मतिमंद मुलांची संस्था, ज्ञान प्रबोधिनी (उपाध्यक्ष), , सेवासदन सोसायटी, विद्यार्थी साहाय्यक समिती अशा अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ‘श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान आळंदी या संस्थेचे विश्वस्त व प्रमुख विश्वस्त म्हणून देखील त्यांनी काम केलेले त्यांच्या कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते . महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केलेले एक ऋषीतुल्य व्यक्तित्व आपल्यातून गेलेले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.