नाशिकला कल्पक आणि यशस्वी व्यावसायिकांची एक मोठी परंपरा लाभली आहे. ह्या पैकी काहीजणांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या व्यावसायिक वर्गाचे नेतृत्व देखील केलेले आहे. त्याच मालिकेतले एक यशस्वी व्यावसायिक म्हणून दिग्विजय कापडिया यांचा उल्लेख करणे आवश्यक ठरणारे आहे.
बीवायके कॉलेजमध्ये ते मला सीनियर विद्यार्थी होते. पदवी घेतल्यावर ज्यावेळी नाशकात प्राचार्य डॉ. गोसावींनी एम बी ए सुरू केले त्यावेळी त्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचे ते विद्यार्थी होते. एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व असणाऱ्या दिग्विजयभाईंकडे वकृत्वाची स्वतःची अशी एक खास शैली होती. इंग्रजी, मराठी आणि त्यांची मायबोली असणाऱ्या गुजराती मधून ते अप्रतिम बोलत असत.
महाविद्यालयातले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या कापड व्यवसायात लक्ष घातले. मला आठवतयं त्यावेळी नाशिकमधल्या मेनरोडवरच्या त्यांच्या बाबुभाई क्लॉथ स्टोअर मध्ये टाय घालून ते बसत असत. कापड व्यवसायात गाद्या आणि तक्के वापरले जाण्याच्या काळात एक उच्च शिक्षित तरुण टाय घालून दुकानदारी करीत असे. ते दृश्य मोठे रंजक वाटत असे. मात्र ते मेनरोडवरच्या कापड दुकानापुरते मर्यादित राहिले नाहीत हेच त्यांचे वेगळेपण होते.
पुढच्या काळात त्यांनी केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्यातील व्यापारी वर्गाचे नेतृत्व केले. ऑल इंडिया क्लॉथ मर्चंट फेडरेशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, रोटरी क्लब, जेसीजसारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते अग्रेसर राहिले. व्यापारी वर्गांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास ते नेहमीच आग्रही होते. ऑल इंडिया क्लॉथ मर्चंट फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून व्यवसायिकांच्या न्याय हक्कासाठी तीस ते चाळीस वर्षांपासून लढा दिला.
२०१० साली त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यापूर्वी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष असताना त्यांनी नाशिकच्या कृषी प्रदर्शनाच्या आयोजनात सहभाग घेतला होता. चेंबरचे पदाधिकारी असतांना त्यांनी चेंबरशी समाजातल्या व्यावसायिकांच्या शिवाय इतर क्षेत्रांना देखील जोडले. त्याच काळात ग्राहकांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्राहक पंचायतीचा देखील चेंबरच्या कामात सहभाग असेल अशी त्यांनी खबरदारी घेतली होती.
चेंबरच्या जकात विरोधी आंदोलनात किंवा अन्न आणि औषधे कायद्याबद्दलच्या चर्चांमध्ये ग्राहकांच्या हितसंबंधांचा विचारदेखील झाला पाहिजे यासाठी ते विशेष प्रयत्न करीत असत. ज्यावेळी व्यापारी आणि ग्राहक यांचे संबंध एकमेकांच्या विरोधातले आणि तणावाचेच असले पाहिजेत असे मानले जात असे त्याकाळात दिग्विजयभाई यांचा दृष्टिकोण वेगळा म्हणूनच स्वागतार्ह होता. त्यामुळेच ग्राहक पंचायतीच्या नेतृत्वाच्या स्थानावर असणाऱ्या बिंदुमाधव जोशी यांच्याशी त्यांचे खूपच स्नेह संबंध निर्माण झालेले होते.
क्लॉथ मर्चंट फेडरेशन आणि महाराष्ट्र चेंबरच्या बरोबरीनेच त्यांनी इतर सामाजिक संस्थांमध्ये देखील महत्वाची भूमिका निभावलेली होती. पंचवटी एज्युकेशन सोसायटी , आर. पी. विद्यालय, आयकर उपभोक्ता सल्लागार समिती, रेल्वे विभागीय व झोनल समिती , रोटरी क्लब , जेसीज आदी विविध क्षेत्रात त्यांनी काम पाहिले. तसेच अन्य सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना सहाय्य करण्यात ते नेहमीच आघाडीवर असत.
कोरोना काळात शैक्षणिक संस्थांच्या कार्यात खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. ह्या संबंधात शहरातल्या अनेक संस्थांशी दिग्विजयभाई यांचा सतत संपर्क राहिला होता. त्यांच्याशी होणारी चर्चा आणि विचारविनिमय अतिशय उपयुक्त ठरत असे. त्यांच्या निधनाने नाशिकमधील एक प्रभावी आणि उत्साही व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड आणि व्यापारी, उद्योजकांचा मार्गदर्शक हरपला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!