आप्पासाहेब गोडबोले
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मोठे काम करणारे आप्पासाहेब गोडबोले हे वयाची शंभरी पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा लेखाजोखा…
१९८५ च्या सुमारासच्या एका संध्याकाळी बाहेरहून घरी आलो, तर एक दाम्पपत्य माझ्या वडिलांशी गप्पा मारत बसले होते. माझे वडील मला म्हणाले की “ अरे, हे गोडबोले साहेब आले आहेत. त्यांना मी सांगतो आहे की तुम्ही जे सांगता आहात ते माझ्या मुलाला सांगायला पाहिजे .. तो त्यामध्ये काहीतरी करु शकेल. ” अप्पासाहेब आणि प्रतिभाताई गोडबोले यांच्याशी माझी झालेली ती पहिली भेट. मुंबईहून निवृत्त झाल्यावर शांतपणे राहता येईल अशा अपेक्षेने ते नाशिकला बंगला बांधून रहायला आलेले होते.
मुंबई ग्राहक पंचायतीच्या धर्तीवर नाशकात काही करावे अशा खटपटीत ते होते. मग त्यानंतर मी त्यांना भेटत गेलो. ह्या कामामध्ये रस असणारे कार्यकर्ते शोधायला सुरुवात झाली. त्यावेळी मी चित्तपावन ब्राह्मण संघाचा पदाधिकारी होतो. त्या संस्थेच्या कार्यालयात बैठका सुरू झाल्या आणि त्यातून नाशिकमध्ये ग्राहक पंचायत उभी रहायला सुरुवात झाली. ग्राहक गट उभे राहायला लागले. मुंबईच्या धर्तीवर खरेदी समिति काम करायला लागली. नाशिकमधल्या गावकरी ह्या वृत्तपत्राचे संपादक दादासाहेब पोतनीस आणि चित्तपावन संघाचे अध्यक्ष बापूसाहेब थत्ते यांच्या हस्ते वाटप सुरू झाले. पाहता पाहता जवळपास तीस गट उभे राहिले. पुढे मुंबई सारख्या ग्राहक पेठांचे आयोजन करायला सुरुवात झाली. ग्राहक पंचायत नाशिककरांच्या कुतूहलाचा विषय ठरली होती. खरं तर तो एक वेगळाच विषय आहे.
ह्या कामाच्या पाठीमागे प्रतिभाताईंचा उत्साह होता आणि अप्पासाहेबांची सूत्रबद्ध आणि योजनपूर्वक काम करण्याची कार्यशैली होती. आपल्याला काय करायचे आहे ते व्यवस्थित ठरवून, त्यात कोणत्या अडचणी येतील याबद्दलचा व्यवस्थित विचार करुन आणि सर्वप्रकारची तयारी अगोदर करुन काम करण्याची अप्पासाहेबांची कार्यपद्धती होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळातल्या अनेक संभाव्य अडचणी निर्माण होण्यापूर्वीच टाळता आल्या होत्या. अत्यंत शांतपणाने संवाद साधण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे होती. ह्यात समोरच्यांचे म्हणणे समजाऊन घेणे जसे होते तसेच आपले मत सोप्या आणि स्पष्ट शब्दांमध्ये मांडण्याची त्यांची हातोटी देखील होती.
हिशेबाचे किचकट विषय, कायद्याशी संबंधित असणारे गुंतागुंतीचे विषय ते सहजपणाने हाताळत असत.. आणि इतरांना समजाऊन देत असत. त्याकाळात ग्राहक संरक्षण कायदा नुकताच मंजूर झालेला होता. तो समजाऊन सांगण्याचे काम त्यांनी सर्वप्रथम केलेले मला आठवते आहे. लोकांच्या तक्रारी ऐकण्याचे आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम देखील गावातल्या एका शाळेच्या वर्गात त्याकाळात आम्ही करीत असू. त्यांचा बंगला लांब असला तरी अत्यंत नियमितपणाने अप्पासाहेब आणि प्रतिभाताई तिथे उपस्थित असत. आम्ही नाशिककर अप्पासाहेबांना ओळखतो ते नाशकात ग्राहक पंचायतीची पायाभरणी करणारे ह्या भूमिकेतून. पुढे ते देवळालीच्या लॅस्ली सॉहोनी सेंटरच्या प्रबंधनात अडकले आणि मग नाशिकच्या लोकांचा त्यांच्याशी असणारा संपर्क कमी झाला.
अप्पासाहेब आता वयाचे शतक पूर्ण करीत आहेत. हा एक मणीकांचन योगच म्हटला पाहिजे. हा एक दुर्मिळ योग आहे. एखाद्याला शुभेच्छा देतांना ‘जीवेत शरद: शतम्’ असे आपण म्हणत असतो. ह्या शुभेच्छा प्रत्यक्षात साकार झालेल्या पहायचा योग येणे ही अप्पासाहेबांच्यासाठी एक मोठी घटना आहे हे नक्की पण त्यापेक्षा देखील ह्या देवदुर्लभ घटनेचे साक्षीदार होण्याचा योग आपल्याला साधता यावा ही त्यापेक्षादेखील मोठी घटना आहे असेच म्हटले पाहिजे. अप्पासाहेबांना माझ्या विनम्र शुभेच्छा!