अशी साकारली नाशिकची देवराई
मित्रांनो नमस्कार,
आपण {नाशिक देवराई}ची संकल्पना जी रोवली तिचा मूळ उद्देश मृत जंगल (हरित वाळवंट) जिवंत करायचं…! आता आपल्याला प्रश्न पडला असेल, मृत जंगल म्हणजे काय…? स्वाभाविक आहे प्रश्न. त्याविषयी आणि नाशिकच्या देवराईविषयी आपण जाणून घेऊया…
ज्या ठिकाणी ग्लिरीसीडीया(गिरीपुष्प) सारखी परदेशी वृक्ष प्रजाती अति प्रमाणात लावलेली असते, तेथील जैवविविधता जवळपास संपुष्टात येते. असेच काहीसे नाशिक देवराई अर्थात पूर्वश्रमीचा फाशीचा डोंगर येथे दिसत असे.
अति प्रमाणात या झाडांच्या लागवडीमुळे तिथल्या जमिनीची सुपीकतेचा स्तर घटला होता. एवढ्या मोठ्या जवळपास शंभर एकर च्या वनामध्ये पक्ष्यांची रेलचेल नावालाही दिसत नव्हती. फुलपाखरू,मधमाशा, मित्र कीटक, उपयुक्त असे जीवजंतू यांचाही अधिवास जवळपास संपुष्टात आलेला होता. अशा ठिकाणी आपल्याला प्रदेशनिष्ठ व देशी प्रजातीचे वृक्ष लागवड करून येथील जागेत, बिघडलेला पर्यावरणीय परिसंस्थेला जिवंत करायचं.
म्हणजेच इथं विविध पक्ष्यांचा, मधमाशांचा, फुलपाखरांचा, इतर उपयुक्त जंगलातील पर्यावरणीय घटकांचा, हक्काचा आणि शाश्वत अधिवास निर्माण करायचा. पण असल्या जमिनीवर हे करणं तेवढं सोपं काम नव्हत. कारण गिरीपुष्प सारखी वृक्ष प्रजाती वाढलेली असताना दुसऱ्या प्रजाती जगविणे मोठे आव्हानात्मक होते. तरीही हे धाडसी पाऊल उचलले. ५ जून २०१५ रोजी वनमहोत्सव घेऊन आपण येथे एका दिवसात अकरा हजार विविध पर्यावरणपुरक वृक्षांची रोप लावली.
मागील सतरा ते अठरा वर्षाचा सामाजिकदृष्ट्या वृक्ष लागवड व संवर्धनाचा अनुभव पाठीशी होता. त्यामुळे काम कसं करायचं याच आधीच सूक्ष्म नियोजन केलेले होते. आपल्याला फक्त डोळ्याला हिरवळ दिसावी म्हणून वृक्षारोपण करायचे नव्हते. त्यामुळे आपण अभ्यासपुर्ण काम सुरू केले. प्रदेशनिष्ठ वृक्षांची लागवड जास्त प्रमाणात व देशी वृक्षांची लागवड योग्य प्रमाणात करुन व ग्लिरिसिडीया पासुनचे होणारे धोक्याचे नियंत्रणाचे काम करत, आपण लावलेल्या रोपांनचे योग्य रीतीने संवर्धन करून आज आपली नाशिक देवराई, सात वर्षात व नाशिक वनराई ने सहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. खरंतर, मला आपल्या समोर लावलेल्या वृक्षांच्या प्रजातींची माहिती द्यायची आहे. त्यामुळे इतर ठिकाणी पण योग्य वृक्ष लागवड संदर्भात प्रबोधन व्हावे हीच तळमळ. त्यामुळेच हा लेखन प्रपंच.
तर मग चला बघु या आपण लागवड केलेल्या वृक्षांची नावे……
बेल, हळदू, तिवस, कुकर, निम, चांदवा, जंगली अजाण, आवळा, भेरली माड, अटरुण, कर्णीकार, काळा कुडा,वारस, कुसुम, अर्जुन, कळम, मेडशींग, पळस, पांढरा पळस, पिवळा पळस, बिब्बा, हिरडा, भुजडा, फालसा, धामणी, रोहण, वारंग, सिता अशोक, रुद्राक्ष, कौशी, शिंदी, मुचकंद, शिसम, शिसव, अंबाडा, खिरणी, काळा शिरीष, शिरीष, अंबा, कांचन, आम्ली, तुतु, काटे सावर, वरुन, शिवण, करवत, ताम्हण, नोनी, बाभुळ, कंसार, रामकाठी बाभुळ, शमी, देवसावर, लोखंडी, सादडा, पेटार, लकुच,बिजा, पांगारा, बुच पांगारा, काटे पांगारा, बिसतेंदु, भोकर, ऊबंर, रोहितक, नानद्रृक, पारसवड, रेशीम धावडा, बेहडा, गणेर, परस पिंपळ, कहांडळ, नरक्या, हिंगणबेट, लांब पानाचा नानद्रृक, उंडी, अंजनी, खैर, कृष्णवड,अजाण, बुध्दनारळ, चंदन, बुच, सुरंगी, डीकामली, काष्टी बांबू, माणवेल बांबू, पिवळा बांबू, अंजन, निन्नई, पाडळ, गुलाबी पाडळ, चिंच, करंज, करमळ, पिवळा करमळ, कुंभा, कुचला, बोंडारा, नाना, अळव, आपटा, तिरफळ, दक्षिण मोह, मोह, तेंदु, हुंब, मोई, बकुळ, पुत्रंणजिवा, भोरमाळ, आसाणा, रीठा, टेबुर्णी, पांढरा पांगारा, भिरा, नेवर, लीची, सेमला कांचन, कुंकू, गेळा, महारुख, काटे कुंबळ, घणसर, खडशिंगी, धावडा, काजु, खिडक, बोत्ती, घोटबोर, मोखा, बोर, दही पळस, जंगली शेवगा, कसुळ, काटसागोन, अंबा पायर, पायर, खडक पायर, सलई, लोध, गुग्गुळ, पाचपानी गुग्गुळ, पारीजातक, जाभुळ, पारजांभुळ, जांभुटणी, वड, पिंपळ, भुत्या, किरमीरा,वावळ, पाचुंदा, गांध्या ऊबंर, कोकम, दांडुस, फणशी, किंजळ,रतनगुंज, कौट, लहान पानाचा आसाणा, अंकोल, ताडगोळा, चारोळी, सप्तपर्णी, तांबडा कुडा, काकड, गोंदण, घोळ, हिवर, बारतोंडी, ठिपकेवाला पायर, शेवगा, सिताफळ, रामफळ, टोकफळ, मोठी चांबुळी, बहावा, टेटु, टुन, सरडोळ, पापडील, रक्त चंदन, भेंडी, भोमा, बकाम निम, महाळुंग, कढीपत्ता, अंबा अशोक, हिंगण बेट,(आजुन काही प्रकार आसे मिळुन 216 प्रकार). या व्यतिरिक्त जंगलातल्या वेली , झुडपे व कंद मुळे. यांचीही लागवड आपण नाशिक देवराई व नाशिक वनराई येथे केली आहे. त्यांची पण माहिती नंतर देईनच.