तीही माणूसच आहे!
आत्ता टोकियोमध्ये सुरू असलेले ऑलिंपिक आणि त्यानिमित्ताने ताणतणावाचा/डिप्रेशनचा मुद्दा चर्चेला आला हे महत्त्वाचे आहे. या प्रश्नाकडे अद्यापही आपण सर्वांनी गांभिर्याने पाहिलेले नाही.
”मला आयुष्यात कधीही मानसिक ताण तणाव नव्हता आणि माझ्यावर कधीही कोणत्याही गोष्टीचा दबाव नव्हता” असे सांगणारा माणूस तुम्हाला भेटला आहे तर तो खोटे बोलत आहे असे समजायला हरकत नाही. प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तरी ताणतणाव असतोच, कधी तो त्याला कळतो तर कधी तो त्याच्या नकळत त्याच्या मनात असतो. आणि हे सामान्य लोकांबद्दल होतेय असे नाही तर करिअरमध्ये सर्वात मोठे यश मिळवलेल्या व्यक्तीही या ताणतणावाचा अनुभव घेत असतात. त्यांना त्यांचा पहिला क्रमांक टिकवायचा असतो म्हणून ताण असतो. तर कोणाला आपण पहिला क्रमांक कधी मिळवतो या प्रयत्नातून ताण निर्माण होतो.. आत्ता टोकियोमध्ये सुरू असलेले ऑलिंपिक आणि त्यानिमित्ताने ताणतणावाचा/डिप्रेशनचा मुद्दा चर्चेला आला हे महत्त्वाचे आहे.
अमेरिकेची जिमनॅस्ट सिमॉन बाईल्स हिने प्रत्यक्ष स्पर्धा सुरू झाल्यावर, आपण खेळण्याच्या मनस्थितीत नाही. अशा स्थितीत मी खेळले तर संघाची विजयाची शक्यता कमी होण्याची शक्यता आहे असे सांगून स्पर्धेतीळ काही प्रकारांमधून माघार घेतली सिमॉन ही जिमनॅस्टिकमधली अनभिषिक्त सम्राज्ञी मानली जाते. ती खेळेल त्या स्पर्धेतील सुवर्णपदक तिलाच मिळणार हे जणू गृहितच धरले जाते. तिच्या कामगिरीकडे एक नजर टाकली तर तिला अनभिषिक्त सम्राज्ञी का म्हणतात हे समजेल. ऑलिंपिक आणि जागतिक स्पर्धांमध्ये तिला आत्तापर्यंत ३० पदके मिळाली आहेत. मागच्या म्हणजे २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला चार सुवर्णपदके मिळाली होती. कोरोना परिस्थितीमुळे जगभरातील क्रीडास्पर्धा थांबल्या होत्या आणि अठरा महिने कोणतीही स्पर्धा न खेळातही अमेरिकन क्लासिक स्पर्धेमध्ये तिने विजेतेपद मिळवले होते नंतर झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अर्थात तीच विजेती ठरली. टोकियोमध्ये ही सर्व स्पर्धा जिंकणार आणि अमेरिकेला विजेतेपद मिळवून देणार असे मानले जात असताना अचानक तिने स्पर्धेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
अगदी आजही दोन स्पर्धांप्रकारांमधून बाहेर पडली. जगातील सर्वोच्च अशा स्पर्धेमध्ये जाऊन आयत्यावेळी स्पर्धेत भाग न घेण्याचे जाहीर करणे ही सोपी गोष्ट नाही परंतु तिने आपल्या अतिताणाचा परिणाम संघावर होऊ नये या हेतूने आयत्या वेळी माघार घेतली. याबद्दल तिचे सर्वांनी कौतुकच केले. बाजूला बसून तिने संघाला प्रोत्साहन दिले. क्रीडापटुंवरील मानसिक ताण, त्यामुळे त्यांच्या खेळावर आणि मानसिकतेवर होणारा परिणाम ही बाब काही पहिल्यांदाच समोर आलेली नाही. काही महिन्यांपूर्वीच जपानची टेनिसपटू नओमी ओसाकाने फ्रेंच ओपन स्पर्धेतून मध्येच माघार घेतली होती आणि नंतर त्याच कारणास्तव ती विम्बल्डन स्पर्धाही खेळली नव्हती. फ्रेंच ओपन स्पर्धेवेळी सामन्यानंतर पत्रकारांशी बोलणार नाही अशी तिने भूमिका घेतली होती. त्यावेळी खेळाडूवरील ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला होता. बिघडलेले मन:स्वास्थ्य सुधारण्यासाठी स्पर्धेतून माघारघेणाऱ्या ओसाकाने मायदेशी भरत असलेल्या सध्याच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला, परंतु ती पराभूत झाली आहे.
अथेन्सला २००४ मध्ये झालेल्या ऑलिंपिक मध्ये ऑस्ट्रेलियाची Sally Robins नावाची खेळाडू रोईंगची अंतिम फेरी चालू असताना इतकी थकली की बोटीमधील आपल्या महिला सहकाऱ्याच्या खांद्यावर डोके ठेवून निव्वळ पडून राहिली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पदक हुकले. तिच्यावर भरपूर टीका झाली. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्धीमाध्यमांनी ‘Laydown Sally ” अशी शीर्षके देऊन तिच्यावर भरपूर टीका केली. परंतु स्पर्धेच्या अत्युच्च क्षणात येणारा ताण किंवा त्या या क्षणापर्यंत जाण्यासाठी घेतलेले श्रम आणि त्यामुळे आलेला थकवा यामुळे तिला क्षणी खेळताच आले नाही. २००४मध्ये तिच्यावरचा ताण कोणी समजून घेतला नाही. आज २०२१मध्ये या गोष्टीवर खुलेपणाने चर्चा होते आहे ही चांगली गोष्ट आहे.
मायकेल फेल्प्स हा अमेरिकन खेळाडू हा सर्वोत्कृष्ट जलतरणपटूपैकी एक मानला जातो. फेल्प्सने एकूण २८ पदके मिळवली, त्यातली २३ सुवर्णपदके होती. यावरून त्याच्या कारकिर्दीच्या कल्पना यावी. तो लहान होता तेव्हा त्याला Attention Deficit for Activity Disorder नावाचा आजार होता. त्याच्या आईने अथक परिश्रम घेऊन त्याला बरे केले, त्याच्या मनात आत्मविश्वास जागवला. आणि पुढे हा मुलगा जगप्रसिद्ध झाला. २०१२ च्या लंडन ऑलिंपिकनंतर त्याने निवृत्ती पत्करली. परंतु नंतर निवृत्ती मागे घेऊन तो २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये परत खेळला आणि नुसता खेळला नाही, त्यात पाच सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक मिळवले. या खेळाडूलाही ताणाचा सामना करावा लागला.
खेळाडू जितक्या वरच्या स्थानावर जातो तितक्या लोकांकडून त्याच्याबद्दलच्या अपेक्षा वाढतात. भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही . सिंधू ने २०१६ मध्ये रौप्यपदक मिळवले पण आता तिने सुवर्णपदक मिळवायला हवे अशी अपेक्षा केली जाते. असे लोकांचे प्रेशर खेळाडूला सहन करावेच लागते, पण काळात नकळत त्याच्या / तिच्या मनावर परिणाम होताच असतो. टोकियो ऑलिंपिकमध्ये जपानी जलतरणपटू युई ओहाशी हिने दोन स्पर्धा जिंकल्या पण ती सुद्धा २०१९ मध्ये म्हणजे अवघ्या दोन वर्षांपूर्वी मानसिक ताणतणावामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती. आता पुन्हा पाण्यात उतरू नये असे तिला वाटत होते पण नंतर या ताणतणावाशी सामना करून तिने पुन्हा पाण्यात उतरायचे ठरवले आणि आता दोन स्पर्धा जिंकल्या.
असे ताण फक्त पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूंना असतात असे नाही. कालच इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्स याने आपण मानसिक स्वास्थ्यासाठी क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेत आहे, असे जाहीर केले. इतका चांगला खेळाडू इंग्लंडला भारताविरुद्ध खेळवता येणार नाही. ही मालिका चार ऑगस्टपासून सुरु होत आहे. सामने इतक्या जवळ आले असताना बेन स्टोक्सने टाकलेला हा बॉम्ब खळबळ माजवून गेला. हा इंग्लंडसाठी मोठा धक्का असला तरी या खेळाडूच्या वैयक्तिक हितासाठी त्यांनी तो निर्णय मान्य केला, हे महत्वाचे आहे.
गेले काही महिने क्रिकेटपटू कोरोनापासून बचाव करण्यासाठी बायोबबलमध्ये म्हणजे बंदिस्त वातावरणात राहात आहेत. कुटुंबापासून दूर राहात आहेत. या सगळ्याचा ताण येतोच. त्यामुळे इंग्लंडने खेळाडूंना टप्प्याटप्पय्याने खेळवायचे ठरवले, एखादा खेळाडू कितीही मोठा असला तरी संपूर्ण मालिका खेळत नाही. काही सामने खेळून घरी परततो. खेळ कोणताही असो, ताणतणाव वेगवेगळ्या प्रकारचे, कमीजास्त प्रकारचे असले तरी त्याला या गोष्टीचा सामना करावाच लागतो.
सिमोन बाईल्स असो, ओसाका असो, मायकेल फेल्प्स असो अथवा युई ओहाशी असो, करिअरमधील ताणतणाव हा आधी फारसा चर्चिला न झालेला विषय या खेळाडूंनी खुलेपणाने मांडला. या विषयावर चर्चा व्हायला हवी हे सांगितले हे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा सामान्य माणसे डिप्रेशनमध्ये असली तरी आपण डिप्रेशन मध्ये आहोत हेच मान्य करत नाहीत. मग ते दुसऱ्यांना किंवा डॉक्टरांना सांगण्याचे दूरच राहिले. डिप्रेशन आणि मानसिक ताणतणाव या गोष्टीत फरक असला तरी दोन्हीचा संबंध खूप जवळचा आहे.
डिप्रेशनपोटी एखादा माणूस आत्महत्येसारखे पाऊल उचलण्याची शक्यता असते, त्याचवेळी त्याच्यावर योग्य ते उपचार झाले तर तो त्यातून सुखरूप बाहेरही येऊ शकतो. सामान्य माणसांनी या खेळाडूंपासून एकच शिकायला हवे की त्यांनी आपल्याला ताणतणाव असल्याचे मान्य केले आणि त्या आजारावर मात करून स्पर्धा जिंकण्यासाठी तयारी केली आणि ते त्यात यशस्वीही झाले. सिमोन बाईल्स हीसुद्धा यापुढे कधीही खेळली तरी यशस्वी होईल यात शंका नाही. परस्पर संवाद वाढवला, योग्य मार्गदर्शन घेतले तर अतिताण तणाव , डिप्रेशन या गोष्टींवर मात करता येते हे सगळ्यांना कळायला हवे.
सिमॉनचेच उदाहरण घ्या. ती म्हणते, ”मी ऑलिम्पिक व्हिलेज मध्ये आले, पण कोरोनामुळे एवढी बंधने होती की मी मोकळेपणी फिरून कोणाशीही गप्पा मारू शकत नव्हते. एकमेकांना जाणून घेणे होत नव्हते, एखाद्या खेळातील जगजेत्यांकडून काही मार्गदर्शन मिळत नव्हते. आधीच कोरोनामुळे सव्वा वर्ष कोणतीही स्पर्धा नाही, आता टोकियोमध्येही सारे बंदिस्त… ”. कोरोनामुळे खबरदारी घ्यायला हवी हे तिला मान्य आहे, पण गेल्या वर्ष दीड वर्षात प्रत्यक्ष भेटून जो संवाद व्हायला हवा तो न झाल्याने प्रत्येकावर ताण वाढत चालला आहे, असे सिमॉन म्हणते.
हे अगदी खरे आहे. त्यातून ती वेळीच सावरली, ”मीही माणूसच आहे, सगळ्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होतोच”, असे ती म्हणते. आता विविध क्षेत्रातली मंडळी त्यांच्या कामातील ताणाबाबत बोलत आहेत, त्यावर उपाय शोधात आहेत, हेच सिमोन, ओसाका, ओहाशी यांचे यश म्हटले पाहिजे!