पाच राज्यांच्या निकालानंतर तेथे सत्ता स्थापन झाली आहे. यातील तीन मुख्यमंत्री हे मूळचे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसमध्ये संधी न मिळाल्याने ते अन्य पक्षात गेले वा स्वतःचा पक्ष काढला. त्यातून त्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. आपल्या चांगल्या कार्यकर्त्यांना न जपण्याचे काँग्रेसचे धोरण यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
देशपातळीवर काँग्रेसने गेल्या काही वर्षात एक महत्त्वाचे काम केले आहे. ते म्हणजे इतर पक्ष वाढवण्याचे. काल आसामचे मुख्यमंत्रिपदी हेमंत विश्वकर्मा यांचा शपथविधी झाला. ते आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये असले तरी मूळचे काँग्रेसचे आहेत. २०१४ पर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. परंतु तेव्हाचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी न पटल्यामुळे त्यांनी पक्षत्याग केला.
देशभरात माजी काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या पाहिली आणि त्यातले काही निवडक इतर पक्षांमध्ये मोठ्या जबाबदारीच्या स्थानावर असल्याचे पाहिले की काँग्रेसने इतर पक्षांना किती मोठे केले आहे हे लक्षात येते. याचे ‘श्रेय’ त्यांना द्यायलाच हवे. काँग्रेसची ही कार्यपद्धती नवी नाही. पक्षश्रेष्टींची मर्जी हा सर्वात मोठा गुण ज्याच्यात असतो, तोच मोठा होऊ शकतो, हे काँग्रेसमध्ये दिसून आले आहे. अनेक वेळेला पक्षाचे राज्य आल्यावरही मुख्यमंत्रीपदी कोणाला नेमले जाईल याचे काही ठोकताळे काँग्रेसने बांधले आहेत. त्याने पक्षाचे नुकसान होते हे लक्षात कधी येते कोणास ठाऊक.
आताही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मूळ काँग्रेसच्या होत्या, नंतर त्यांनी वेगळी वाट चोखाळली. या काँग्रेसला ममतांनी नवीन विधानसभेत एकही जागा मिळू दिली नाही. पुदुचेरीमध्ये शपथ घेतलेले रंगास्वामी हेसुद्धा मूळचे काँग्रेसचेच. त्यांना २००८ मध्ये काँग्रेसने राजीनामा द्यायला सांगितले. का, तर एका ज्येष्ठ नेत्याशी मतभेद झाले म्हणून. आपले राजकीय पुनर्वसन होत नाही हे पाहून त्यांनी २०११ मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि आता ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. अरुणाचल प्रदेशचे प्रेमा खंडू आणि मणिपूरचे बिरेन सिंग हेही मूळ काँग्रेसचे आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांची यादी पाहताना देशभराचा विचार केला तर काँग्रेसने इतर पक्षांना आपले उत्तमोत्तम सहकारी ‘निर्यात’ केले आहेत हे लक्षात येते.
गेल्या काही वर्षात काँग्रेसची सर्व बाजूने घसरण होत आहे. निवडणुका जिंकण्यात अपयश येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये विचारमंथन होऊन योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. परंतु त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत असे दिसत नाही. सोमवारी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली आणि तीत काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका पुढे ढकलण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी कोव्हीड १९ चे कारण देण्यात येत असले तरी ते खरे आहे का हा प्रश्नच आहे. आजच ‘टाइम्स ऑफ इंडिया’ तील एका वृत्तानुसार एका नेत्याने वरील बैठकीत सोनिया गांधी यांची भलामण करण्याचा प्रयत्न केला. तुमचे नेतृत्व खूप खंबीर आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सोनिया गांधी यांनी स्वतःच ,”कसले नेतृत्व? आपण सर्वच निवडणुका हरलो आहोत”, असे सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे.
पक्ष कितीही घसरला तरी पक्षश्रेष्टींची भलामण करत राहायचे, आपल्या स्थानाला काहीही धोका पोचत नाही, हे काही ज्येष्ठ काँग्रेसजन चांगलेच जाणतात. याच बैठकीमध्ये, काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांनी पुन्हा विराजमान व्हावे अशी मागणी एका नेत्याने केली. तेव्हा त्यांना राहुल गांधी आजारी असल्यामुळे बैठकीला उपस्थित नाहीत असे सांगण्यात आले. तेव्हा या नेत्याने ‘माझा निरोप त्यांना पोचवा’ असे म्हटले. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष पद नको किंवा त्याची जबाबदारी घेण्याचे ते टाळत आहेत हे अनेकवार दिसले आहे. तरीही त्यांच्या नावाचा आग्रह धरणे यासारखी भलामण दुसरी असू शकत नाही. अध्यक्षपदी राहुल गांधी यावेत ही सोनियाजींनी इच्छा असली तरी स्वतः राहुल गांधी यांना त्यात किती रस आहे आणि पक्ष उभारणीच्या व विस्ताराच्या दृष्टीने ते किती गंभीरपणे काम करू इच्छितात हे अजून स्पष्ट झालेले नाही.
एकीकडे टाइम्समधील ही बातमी आणि दुसरीकडे हिंदुस्तान टाइम्स’ ने दिलेल्या बातमीत काय म्हटले आहे बघा. अलीकडेच झालेल्या विधानसभांच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला त्याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावर काँग्रेसमधील गटबाजी आणि स्थानिक पातळीवर योग्य नेतृत्वाचा अभाव ही दोन कारणे असल्याचे सांगण्यात आले. मात्र सोनिया यांनी स्पष्ट सांगितले की, काँग्रेसच्या सद्यस्थितीची मला जाणीव आहे. आणि काँग्रेसच्या पराभवाची सर्वांनी गंभीर दखल घ्यावी. या पराभवामुळे आम्ही सर्वच अत्यंत दुःखी आहोत. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी. तरीही आपण जर वस्तुस्थितीचा सामना केला नाही तर आपण या निकालातून काहीच शिकणार नाही हे लक्षात घ्यावे”, असेही ठणकावून सांगितले आहे. एकदा तर आपल्या नेतृत्वाखाली पराभव झाला असल्यामुळे मी हंगामी अध्यक्षपद सोडू इच्छिते असेही सोनिया गांधींनी सांगितले परंतु सलमान खुर्शीद यांनी हस्तक्षेप करून त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली असेही या बातमीत म्हटले आहे. ही सगळी कार्यपद्धती काँग्रेसला अजिबात नवीन नाही. प्रश्न एवढाच आहे की, या सगळ्यातून ते काही शिकणार आहेत की नाही?
निवडणुकीच्या पराभवाच्या संदर्भात चर्चा करताना त्याच्या राज्याचे प्रभारी असणाऱ्या नेत्यांनी अनेक कारणे सांगितली. त्यातली किती खरी हे त्यांनाच माहीत, परंतु ही घसरण रोखण्यासाठी काँग्रेसने आताच उपाय केले नाहीत तर कोणीही अध्यक्षाने मला तरी काँग्रेसला भवितव्य नाही हे दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्ट होत चालले आहे.
काँग्रेसला गांधी घराण्यातील अध्यक्ष हवा हा हट्ट त्यासाठी सोडून द्यावा लागेल आणि एखाद्या तुलनेने तरुण तडफदार नेत्याकडे पक्षाची सूत्रे द्यावे लागतील राज्या-राज्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अनेक वर्षे खुर्चीवर बसलेल्या काँग्रेस नेत्यांना बाजूला करून नवीन माणसे आणावी लागतील. या सगळ्या उपाययोजना करताना वस्तुस्थितीची जाणीव ठेवावी लागेल.
कोव्हीड प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि एकंदरीतच भारतीय जनता पक्ष अडचणीत आलेला आहे. राज्यांचा विचार केला तर स्थानिक पक्ष त्या त्या राज्यात अधिक प्रबळ होत आहेत. अशा वेळी राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या काँग्रेसपुढे दुहेरी आव्हाने उभी आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले तर त्यांना फायदा होईल. हे सगळे काँग्रेस नेतृत्वाला कळत नसेल असे मला वाटत नाही. परंतु काळ बदलला आहे हे लक्षात न घेता जुन्या पद्धतीने काम करत राहणे हे काही योग्य धोरण नाही.
आज महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्यानंतरचा तिसरा घटक म्हणून काँग्रेस सत्तेत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कामाबद्दल काँग्रेसने कितीही वेळा नाराजी व्यक्त केली तरी सत्तेतून बाहेर पडले त्यांना परवडणारे नाही आहे ती सत्ता टिकवून ठेवायची एवढेच काम त्यांना करावे लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला हे चांगले माहीत आहे. त्यामुळेच या सरकारला धोका नाही असे ते ठामपणे सांगत आहेत.. यातूनही काँग्रेस काही शिकत नाही.
महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्ये काँग्रेसची व्यवस्था अधिकाधिक दारुण होत चालली आहे. अशा स्थितीत परवा महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे, ”आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढेल आणि राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून अस्तित्वात येईल”, अशी घोषणा केलेली ऐकली. हे कसे शक्य आहे याचा विचार आज प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता करत आहे. काँग्रेसजन या भ्रमात नेहमीच राहतात. यामुळेच त्यांच्या पक्षाचे अस्तित्व सगळीकडून कमी कमी होत चालले आहे. परंतु वेळ गेलेली नाही. तुलनेने तरुण, काँग्रेसच्या विचारप्रणालीशी एकनिष्ठ राहणारे, पक्ष भवितव्याबाबत मनापासून विचार करणारे व मदत करणारे अनेक चांगले काँग्रेसजन आजही त्या पक्षात आहेत. गरज आहे टी त्यांना सूत्रे सोपविण्याची.
काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुका आता लांबणीवर पडल्यामुळे पुन्हा एकदा ‘पुढे काय’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका आहेत. त्यावेळीही काँग्रेसला चांगली कामगिरी करून दाखवता येईल अशी अजून तरी चिन्हे दिसत नाहीत. उत्तर प्रदेश निवडणुकीतही काँग्रेस मागे पडली तर २०२४ लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जाणार हा मोठा प्रश्न काँग्रेस नेतृत्वालाच नव्हे तर सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यालाही पडलेला असेल यात शंका नाही.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!