क्रीडासंस्कृती रुजविण्यासाठी…
अजित आगरकर… मुंबईकर, भारतीय क्रिकेट कसोटीपटू. २६ कसोटींमध्ये ५८ बळी, १९१ एक दिवसीय सामन्यांमध्ये २८८ बळी, प्रथम श्रेणी ११० सामन्यांत २९९ बाली ही त्याची मैदानावरची कामगिरी. २००६ साली पाकिस्तानविरुद्धची लाहोर कसोटी ही त्याची शेवटची कसोटी. २००७मध्ये ओव्हाळ मैदानावरचा इंग्लंड विरुद्धचा एक दिवसीय सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना. म्हणजे ही कारकीर्द संपून आता १५ वर्षे झाली. सुनील गावस्कर यांच्याप्रमाणेच अजितही आता कमेंटरी बॉक्समध्ये दिसायला लागला आणि एका अर्थाने त्याची वेगळी इनिंग सुरु झाली. त्याची बोलण्याची अशी खास शैली आहे. या नव्या कामामुळे तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला. परंतु आज त्याच्यावर लिहायचे कारण म्हणजे त्याने कालच्या (शनिवार २ ऑक्टोबर) ‘इकॉनॉमिक टाइम्स’ च्या संपादकीय पानावर लिहिलेला लेख. Give Us a Sporting Chance असे या लेखाचे शीर्षक आहे.
भारताची प्रचंड लोकसंख्या असूनही जागतिक स्तरावरचे क्रीडापटू हाताच्या बोटावर मोजता येतात, इतके कमी आहेत. सरकार आणि क्रीडा संघटना यांनी आणखी लक्ष दिले तर विविध खेळांमधून हजारो खेळाडू तयार करता येतील, असे नेहेमीच म्हटले जाते. याच विषयावर हा लेख आहे. आशियाई स्पर्धा असो किंवा ऑलिम्पिकसारखी सर्वश्रेष्ठ स्पर्धा असो, जागतिक पातळीवर भारत बिगरक्रिकेट खेळांमध्ये जास्त प्राविण्य मिळवू शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. क्रिकेटही खऱ्या अर्थाने जागतिक खेळ नाही. म्हणूनच ऑलिम्पिकमध्ये एखादे ब्रॉन्झ पदकाही जरी मिळाले तरी आपल्याला खूप आनंद होतो.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाने आपल्याला अत्यानंद होणे स्वाभाविक आहे, तो अतिशय अभिमानाचा क्षण आहेच, परंतु एवदहा मोठा देश दोन आकड्यांमध्ये पदके का जिंकू शकत नाही याची चर्चा प्रत्येक ऑलिम्पिकनंतर होते आणि सत्कार समारंभ झाल्यावर वीरूनही जाते. अजितने सौम्य शब्दांत त्याची मते मांडली आहेत. आपल्याकडे टॅलेंटची कमतरता नाही, परंतु त्यांना वाव मिळण्यासाठी जागतिक दर्जाचे विद्यापीठ अथवा शाळा / महाविद्यालय नाही, ही अजितला खंत वाटते. जे देश क्रीडा स्पर्धा आणि क्रीडापटू यांत ‘गुंतवणूक’ करतात, ते देश कितीतरी प्रगती साधतात.
आपण सगळ्या पदक विजेत्यांचे तोंड भरून कौतुक करतो (ते करायलाच हवे) परंतु आपल्या घरातला, गावातला, शहरातला नवा खेळाडू शोधून त्याला योग्य ती संधी देऊन , पुरेसे प्रशिक्षण देऊन देशाचे अत्युच्च पातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करतो का हा खरा प्रश्न आहे. सगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था आपला १०० टक्के शैक्षणिक निकाल लागला तर नवे विद्यार्थी मिळण्यात अडचणी येणार नाहीत, हा विचार करतात. मुलांची शैक्षणिक प्रगती व्हायला हवी यात आक्षेपार्ह काहीच नाही, परंतु खेळाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे, असे अजितचे म्हणणे आहे. मूल घडते ते शाळेत.
आई वडील आणि कुटुंबानंतर शाळा हा मुलाचा पहिला टप्पा असतो. या टप्प्यावर त्याची क्रीडा क्षेत्राशी पाळख झाली तर ते मूल भावी क्रीडापटू म्हणून देशाला उपयोगी पडेल. आज शहरी भागांमध्ये खेळाडूंना चांगले प्रशिक्षण, संधी मिळण्याची शक्यता असते. ग्रामीण भागांमध्ये ती फार कमी मिळते. तिकडे टॅलेंट जास्त असले तरी. ज्यांना संधी मिळते ते मोठे होतात. परंतु ज्यांना आणखी मोठे व्हायचे असते त्यांना स्वखर्चाने स्वतंत्र प्रशिक्षक अथवा विशेष प्रशिक्षणाची सोय करावी लागते. ते सगळ्यांना जमते असे नाही. त्यामुळे प्रत्येक खेळामध्ये दोनचार प्रमुख खेळाडू सोडले तर ते आणि त्यांच्या खेळातले इतर खेळाडू यांच्यातली दरी खूप मोठी असते.
खेळांसाठी शाळा / महाविद्यालय अथवा विद्यापीठ याना प्रयत्न करायचे असले तर आर्थिक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावतात. शाळेची, शिक्षकांची कितीही इच्छा असली तरी आर्थिक निर्बंधांमुळे त्यांचे हात बांधले जातात. ‘पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप’ (PPP) हा त्याच्यावरचा मार्ग असला तरी तेही सगळ्यांना शक्य असते असे नाही.
क्रीडा क्षेत्रासाठीची अनेक राज्यांची तरतूद इतकी कमी असते की जणू काही या क्षेत्राशी आपला संबंधच नाही. (याबद्दल आधीच्या एका ‘तरंग’मध्ये लिहिलेच होते) ओडिशासारखे गरीब राज्य क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देते, मग इतर राज्यांना ते का जमत नाही हा प्रश्नच आहे. त्यासाठी क्रीडाप्रेमी दृष्टी लागेल आणि राजकारणापलीकडेही काही जग असते हे राज्यांना कळावे लागेल.
केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ द्वारे याची सुरुवात केली होती. परंतु ज्या सातत्याने खेळाडूंकडे लक्ष द्यायला हवे, नवनवीन खेळाडूंचा शोध घेऊन ते खेळाडू घडवायला हवेत ते काम कशा पद्धतीने चालू आहे ते लोकांसमोर येत राहायला हवे. तरच क्रीडाप्रेमी वाढतील आणि खेळाडूही.
आज किती पालक आपल्या मुलगा अथवा मुलगीकडे टॅलेंट असल्यास ते क्रीडापटू व्हावेत म्हणून प्रयत्न करतात? इच्छा असली तरी आर्थिक कारणास्तव क्ती जण ती पूर्ण करू शकतात हा प्रश्नच आहे. देशात क्रीडा संस्कृती रुजविणे हे एका दिवसात होत नाही. स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षात आपण ते करू शकलो का याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल.
अजितने त्याच्या लेखात जे विचार मांडले आहेत त्यात फार नवीन असे काही नसले तरी एखादा खेळाडू क्रिकेटच्या पलीकडे जाऊन काही कळकळीने सांगायचं प्रयत्न करत आहे हे महत्वाचे आहे. विविध खेळांमधील खेळाडूंनाच पुढे येऊन हे प्रश्न हाती घ्यावे लागतील. परंतु शेवटी त्यांना सरकारची मदत लागेल. तिथे ठाम उभे राहून खेळाडू हवे ते पदरात पडून घेऊ शकतील का हे बघण्यासारखे आहे.
खेळाडूंनी प्रयत्न करायला हवेत असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा राज्य अथवा केंद्र सरकारची ती जबाबदारी नाही, असे मला अजिबात सुचवायचे नाही. ती त्यांचीच जबाबदारी आहे, परंतु ते ती नीट पार पाडत नसतील, तर खेळाडू आणि क्रीडाप्रेमी जनता यांनी देशपातळीवर पुढे येऊन काहीतरी करावे लागेल, असेच आजचे चित्र आहे. कारण कोणतेही असो, भारतात असलेल्या टॅलेंटला योग्य वाव मिळायला हवा हा संदेश सगळ्यांपर्यंत पोचायला हवे हे महत्वाचे आहे.