पावसाने केली मुंबईकरांची वाताहत
बहुप्रतिक्षित मान्सूनचे आगमनाने सर्वच सुखावले असले तरी राजधानी मुंबईची मात्र वाताहत झाली आहे. अर्थात त्यासाठी पावसाला दोष देणे योग्य नाही. तर पावसाळा पूर्व उपाययोजना कारणीभूत आहेत. राजधानीची ही अवस्था काही पहिल्यांदाच होत नाही, हेच दुर्देव आहे.

ब्लॉग – https://ashokpanvalkar.com
मुंबईची वाताहत हा प्रश्न अनेक वेळा चर्चिला गेला आहे. अनेक खर्चिक उपाय सुचविण्यात आले आणि प्रत्यक्षात केलेही गेले. परंतु मुंबई काही सुधारली नाही. प्रचंड लोकसंख्या, वाहतुकीवर येणार ताण, पाणीपुरवठ्याचे प्रश्न, घरांची समस्या अशा अनेक अडचणी मुंबईला भेडसावत आहेत. मुंबईचा आडवा विस्तार व्हायला जागा नाही, म्हणून उभा विस्तर व्हायला लागला, परंतु तो सर्वांच्या आवाक्यात नव्हता. अजूनही नाही. अशा या मुंबईत पावसामुळे साठणारे पाणी, त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या दरवर्षी येतात. हे पाणी वाहून जावे म्हणून नालेसफाई आवश्यक असते. ती आम्ही चोखपणे केली असे देशात सर्वात श्रीमंत असणारी मुंबई महापालिका म्हणते, तर ‘ही नालेसफाई नव्हे, तर हातसफाई’, अशी टीका विरोधी पक्ष करतो.
पावसाळा तोंड देण्यासाठीची यंत्रणा सज्ज आहे असे पालिका सांगत असतानाच गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने हा दावाच वाहून जाऊन समुद्राला मिळाला. दोन्ही दावे -प्रतिदाव्यांमध्ये हाल होतात ते मुंबईत राहणाऱ्या नागरिकांचे. सध्या कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ चालू असल्याने बऱ्याच जणांना पाण्यात उतरावे लागले नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. परंतु, अत्यावश्यक सेवांमधील लोकांना जावेच लागले, त्यांचे हाल झालेच.
मुंबईची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर जास्त पाऊस झाल्यावर पाणी साठणार हे उघड आहे. त्यामुळे महापालिका हेच कारण नेहेमी सांगते. ‘पाऊसच एवढा पडला, आम्ही काय करू’, ही सबब मुंबईकर गेली काही वर्षे ऐकत आहेत. परंतु, पूर्ण नालेसफाई, रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी साफ गटारे या सोयी आपण खरेच नागरिकांना देतो का याचा विचार महापालिकेला करावा लागेल.

मुंबईत पाणी साठू नये म्हणून मुंबईत काही मोठे प्रकल्प राबविण्यात आले. आता तर भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रयोगही करून पाहण्यात आला. परवाच्या पावसात या टाक्याही लगेच भरून गेल्या, कारण अजून काम अर्धवट आहे. आता हे काम यावर्षी पूर्ण झाले नाही तर पुढच्या वर्षी या टाक्यांचा नक्की फायदा होईल, असे स्वप्न महापौरांनी दाखवले आहे.
काही वर्षांपूर्वी २६ जुलैच्या जलप्रलयानंतर राज्य सरकारने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाची शिफारस केली होती. मागील तब्बल १५ वर्षांपासून हा प्रकल्प उभारणे सुरु आहे. मुंबईत पर्जन्यजलवाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची प्रतितास क्षमता २५ मिमीवरून ५० मिमी करण्यात आली. मात्र १५ वर्षांत स्थितीत बदल झालेला नाही. प्रकल्पाचा खर्च वाढत चालला आहे. या प्रकल्पावर आत्तापर्यंत २,२३८.०४ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
२६ जुलैच्या जलप्रलयाला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक असलेल्या मिठी नदीचे काम तब्बल पंधरा वर्षांनंतरही सुरूच आहे. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासोबत पालिका व एमएमआरडीएतर्फे नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. एकूण १७.८४ किमी लांबीच्या मिठी नदीतील ११.८४ किमीचे क्षेत्र पालिकेच्या तर सहा किमी एमएमआरडीएच्या अखत्यारित आहे. एमएमआरडीएचे काम पूर्ण झाले असून पालिकेचे काम अद्याप पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाहीत. या प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे.
अतिवृष्टीच्या काळात समुद्राला येणाऱ्या मोठ्या भरतीच्या वेळेत पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी स्टेशन प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी सहा पम्पिंग स्टेशनची कामे पूर्ण होऊन सुरू झाली आहेत. उर्वरीत दोन पम्पिंग स्टेशनसाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. सर्व पम्पिंग स्टेशनसाठी ५०० कोटींहून अधिक खर्च झाला आहे. यासोबतच नालेसफाईसाठी दरवर्षी ७० ते १०० कोटी रुपये खर्च केले जातात. त्यानंतरही पाणी तुंबण्याची समस्या कायम आहे.









