नोबेल, पुतळे आणि हादरा
आठवड्याभरातील घडामोडींचा परामर्श घेणाऱ्या तरंग या सदरामध्ये नेहमी एकच विषय घेण्याला प्राधान्य दिले. मात्र, असे अनेक विषय असतात की ज्यावर कुठे लिहिले जात नाही की बोलले जात नाही. पण, त्यांची दखल घेणे अगत्याचे वाटते. म्हणूनच आजपासून तरंगमध्ये हा बदल. या आठवड्यात आपण तीन वैशिष्ट्यपूर्ण घटनांचा वेध घेणार आहोत.
शांततेचा नोबेल पुरस्कार
फिलिपाईन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियातील पत्रकार दिमित्री मुरातोव यांना २०२१चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे. ”मुक्त, स्वतंत्र, तथ्याधिष्ठित पत्रकारितेच्या रक्षणासाठी या दोघांनी सत्तेचा गैरवापर, खोटारडेपणा, युद्धखोरीजन्य प्रचार याविरोधात लढा दिला. अभिव्यक्ती आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य, देशांमधील बंधुभाव, नि:शस्त्रीकरण याशिवाय चांगल्या जगाची निर्मिती होऊ शकत नाही, असे पुरस्कार समितीने म्हटले आहे.
याआधी १९३५मध्ये जर्मनीच्या कार्ल वोझीत्की या पत्रकाराला नोबेल मिळाले होते. युद्धानंतरही जर्मनी कसा सशस्त्रीकरण कार्यक्रम गुप्तपणे राबवत आहे, याचे सविस्तर वार्तांकन त्यांनी केले होते. या सर्वांबद्दल सविस्तर माहिती प्रसिद्ध झालीच आहे, पण योगायोगाने याच आठवड्यात एका छायाचित्रकाराशी संबंधित बातमी वाचण्यात आली. छायाचित्रकार हा पत्रकाराइतकाच महत्वाचा असतो असे मी नेहमीच मानत आलो आहे. त्यामुळे त्याचे बातमी उत्सुकतेने वाचली. न्यूयॉर्क टाइम्सचा छायाचित्रकार टायलर हिक्स यांच्याबद्दलची ही बातमी आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये २००१ साली कारवाई केली त्याचे छायाचित्रण करण्यासाठी हिक्स पहिल्यांदा अफगाणिस्तानमध्ये आले. गेल्यागेल्याच त्यांना एका तालिबानला कसे फाशी देण्यात आले ते बघता आले आणि ते हादरून गेले. परंतु नंतर ते सावरले. अमेरिकन सैन्याच्या संरक्षणाखाली त्यांनी अफगाणिस्तान पालथा घातला , विस्तृत छायाचित्रण केले. नंतर गेल्या २० वर्षांत ते ३० पेक्षा अधिक वेळा अफगाणिस्तानात गेले.
अमेरिकन सैन्य लढताना, तालिबानींच्या हल्ल्यात निरपराध अफगाण नागरिक मरताना, वादग्रस्त निवडणूक होताना, मुलींचे शिक्षण परत सुरु होताना, सततचा हिंसाचार, उपासमार आणि संघर्षात अफगाणी माणूस जगताना पाहताना .. अशी अनेकविध रूपे ते कॅमेऱ्यात बंदिस्त करत राहिले. या वर्षीच्या जुलैमध्ये ते परत गेले. विचित्र योगायोग असा की वीस वर्षांपूर्वी ज्या जागेवर (बाग्राम हवाई तळाजवळ) त्यांनी तालिबानी अतिरेक्याला फाशी देताना पाहिले होते त्याच ठिकाणाहून ते अमेरिकेला परत आले. कारण तालिबान पुन्हा सत्ता काबीज करत या हवाई तळाजवळ येऊन पोचले होते.
न्यूयॉर्क टाइम्सने आता हे सगळे फोटो एकत्र केले आहेत आणि लोकांसमोर ठेवले आहेत. अफगाणिस्तानसारख्या अशांत देशात सतत जाऊन छायाचित्रण करणे ही सोपी बाब नाही. मध्यंतरीच्या काळात तालिबानी राजवट नव्हती आणि आधीच्या तुलनेत शांतता होती हे मान्य केले तरी एखादा छायाचित्रकार सलग वीस वर्षे एका संघर्षमय देशात जातो आणि हजारो छायाचित्रे काढतो ही बाब विशेषच म्हणायला हवी. परवा नोबेल मिळालेल्या मारिया रेसा आणि दिमित्री मुरातोव यांच्या कामापेक्षा हे काम खूप वेगळे आहे, त्याची तुलना होणार नाही, हे खरे असले तरी टायलर हिक्स यांच्यासारखे बरेच पत्रकार एका वेगळ्या ध्येयाने काम करत असतात, हे जगासमोर यायला हवे.
पुतळे, अतिक्रमण आणि देखभाल
ही बातमी चेन्नईची म्हणजे तामिळनाडूची आहे. परंतु अनेकांना बोध घेता येईल. वीरराघवन नावाच्या एका वकिलाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा एका गावात मुख्य रस्त्यातच उभारला होता. २०१४मध्ये स्थानिक प्रशासनाने हा पुतळा हलविण्याचे आदेश दिले. अर्थात त्यांचा आक्षेप डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना नव्हते, तर रस्त्यात कोणताही पुतळा उभारला जाऊ नये असा होता. त्याविरुद्ध हे वकीलमहाशय मद्रास उच्च न्यायालय गेले. त्यावर गेल्या आठवड्यात म्हणजे सात वर्षांनी निकाल आला.
न्यायालयाने हा पुतळा हटविण्यास सांगितलेच, परंतु संपूर्ण राज्यात जिथेजिथे रस्त्यात, सरकारी जमिनीवर, महामार्गांवर पुतळे उभारले आहेत ते तीन महिन्यांत हटवावेत. राज्यात एक ‘लीडर्स पार्क’ तयार करावे आणि सगळे पुतळे तिथे नेऊन ठेवावेत. सरकारी जमिनीवर झालेली सगळी अतिक्रमणे हटवावीत. यापुढे सरकारी जमिनीवर कोणत्याही पुतळ्याला परवानगी देता कामा नये, असं आदेश न्यायालयाने दिला. लीडर्स पार्कमध्ये सगळे पुतळे उभारल्यावर त्याची देखभाल कोण करणार ? ते-ते पुतळे उभारण्यासाठी ज्या संस्थेने परवानगी घेतली होती, त्यांनीच देखभाल करावी असे न्यायालयाने म्हटल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’ वृत्तपत्राने म्हटले आहे. ही सगळी प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण झाली पाहिजे असे न्यायालयाने बजावले आहे.
यावर तामिळनाडूत काय प्रतिक्रिया उमटली ते कळू शकले नाही. हा विषय भावनात्मक आणि राजकीय, सामाजिक संदर्भ असणाराही आहे. परंतु थेट न्यायालयानेच हा आदेश दिल्याने उघड विरोध होणे कठीण असावे. आता हे प्रकरण वरच्या न्यायालयात गेले तर मला आश्चर्य वाटणार नाही. तामिळनाडूत प्रत्यक्ष काय होईल तो भाग वेगळा, परंतु पुतळे हा प्रश्न सगळ्या देशालाच भेडसावणारा आहे. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांचे पुतळे, हत्तीचे पुतळे हे तर अनेकवेळा वादाला निमंत्रण देणारे ठरले आहेत. त्यावर प्रत्यत्तर म्हणून मायावती यांनी २०१९मध्येच गुजरातेतील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, राममंदिरातील पुतळा, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा यांवर आक्षेप घेतला होता. हे सारे राजकारण चालूच असते. इतर राज्यांमध्येही पुतळ्यांचे प्रश्न वेळोवेळी येताच असतात. आता आणखी कोणी राज्य ‘लीडर्स पार्क” सारखी कल्पना राबविते का हे बघणे औत्सुक्याचे ठरेल!
सोशल हादरा
गेल्या आठवड्यात फेसबुक, व्हॉट्सएप आणि इंस्टाग्राम ही तीन अतिशय महत्वाची समाजमाध्यमे सुमारे सात तासांसाठी बंद पडली आणि जणू जगाची संपर्कव्यवस्था बंद पडली. ही तीन अँप्स जगभरातील जवळपास निम्मी लोकसंख्या म्हणजे साडेतीन अब्ज लोक वापरतात. यावरून या अँप्सचे महत्व लक्षात येतेच परंतु फेसबुक या अतिबलाढ्य कंपनीने जगावर किती पकड मिळविली आहे तेही लक्षात येते. फेसबुकची माजी कर्मचारी फ्रांसिस हौजेन यांनी फेसबुकवर केलेल्या गंभीर आरोपांचे पडसाद उमटत असतानाच ही अँप्स बंद पडली हा निव्वळ योगायोग झाला, तरी जग फेसबुकवर किती अवलंबून आहे आणि हौजेन यांचे आरोप खरे मानायचे तर फेसबुक सांगेल तसे वागत आहे, हे भीषण सत्य लोकांसमोर आले.
तंत्रज्ञान हे नेहेमीच दुधारी अस्त्र असते. ज्यांनी ‘द सोशल डायलेमा’ ही डॉक्यूमेंटरी पाहिली आहे, त्यांना फेसबुकबाबत कल्पना येईल. तरीही आपण फेसबुक वापरतो, व्हाट्सएपचे तर आपण गुलामच झालो आहोत, इंस्टाग्रामने तरुण पिढीबरोबरच वयस्कर लोकांनाही आकर्षित केले आहे. रशिया आणि चीन यांनी स्वतःच्या देशापुरती वेगवेगळे पर्याय उभे केले आहेत. त्यामुळे वरील तीन अँप्स बंद पडल्यावर त्यांचे अजिबात काही बिघडले नाही. या समाजमाध्यमांवर सगळ्याच गोष्टी वाईट आहेत असे मला अजिबात म्हणायचे नाही, याचा सकारात्मक वापर करणारे लाखो लोक आहेत, परंतु, एकंदरच या साऱ्या गोष्टी आपण किती वापरायच्या याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. जग खूप वेगवान झाले आहे आणि तो वेग आपण काहीही केले तरी कमी होणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळे आठपंधरा लोकांनी त्यांचा वेग कमी केला तरी फेसबूकसारख्या अतिविशाल कंपनीला काडीचाही फरक पडणार नाही, हे नक्की.
जगभरात इंटरनेटचा वापर वाढत आहे, या व अशा अँप्सचा वापरही वाढत आहे. या प्रक्रियेला ब्रेक लावणे आता जवळपास अशक्य आहे. प्रत्येक अँपमधले धोके ओळखून त्यापासून सावध राहणे एवढेच आपण करू शकतो. इंटरनेट बंद पडले की त्याची बातमी होते, आणि फेसबुक, व्हाट्सएप आणि इंस्टाग्राम बंद पडले की जग हादरते. या परिस्थितीपासून पळून जाणे तुम्हाआम्हाला अशक्य आहे. हे भीषण असले तरी वास्तव आहे.
या सगळ्या अँप्सना आपण आपली खासगी माहिती पुरवत असतो. या अर्थाने आपला खासगीपणा आपण आधीच घालवून बसलो आहोत. नवनवीन फोन येत आहेत तेही कदाचित तुमचे आयुष्य रेकॉर्ड करत आहेत. त्यामुळे एकंदरच इंटरनेट, अँप्स या संदर्भात सावध राहण्याची गरज आहे.
जाता जाता – नाशिकमध्ये आधी लांबणीवर पडलेले साहित्य संमेलन १९, २०, २१ नोव्हेंबरला होणार आहे, अशी बातमी ऐकली. साहित्य संमेलन आणि राजकारणी हा वाद जुना आहे. नाशिकला त्याचा पुढचा अंक बघायला मिळणार की नवा पायंडा पडणार हे लवकरच दिसेल!