नैसर्गिक फटका सर्वांनाच, पण…
मुंबई, कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीची भीषणता आपण पाहत आहोत. अक्षरशः हृदय पिळवटून जावे अशा घटना, घडामोडी आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, आपत्ती आल्या आहेत. पण, आपण यातून काही धडा घेणार आहोत की नाही
आणखी सुमारे १०० दिवसांनी ब्रिटनमधल्या ग्लासगो येथे पर्यावरणविषयक परिषद होणार आहे. जगभरातील पर्यावरणविषयक प्रश्नांवर इथे चर्चा होते. काही निर्णय घेतले जातात आणि ते सर्व देशांनी पाळावेत अशी अपेक्षा असते. कारण प्रश्न सर्वच देशांच्या अस्तित्वाचा आहे. ही परिषद का महत्वाची आहे हे जगातील बऱ्याच देशांमधील सध्याच्या परिस्थितीवरून दिसते. भारत आणि चीनमध्ये काही शहरांमधील भयावह पूरस्थिती, काही युरोपीय देशांमधले पूर, अतिउष्णतेने अमेरिकेत काही ठिकाणी जंगलांना लागलेले वणवे आणि त्याच देशात काही भागांत आलेली अतिउष्णतेची लाट ही सध्याची स्थिती आहे. जगभर हवामानाचे हेलकावे बघायला मिळत आहेत. वेळीअवेळी प्रमाणाबाहेर पडणारा पाऊस, कधी कमालीची उष्णता अशा स्थितीत अनेक देश सापडत आहेत. निसर्गाने हे रूप अचानक धारण केलेले नाही. गेल्या २५ -३० वर्षांत माणूस निसर्गावर मात करू पाहात होता, त्याला निसर्गाने दिलेले हे उत्तर आहे.
भारतात महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवा या राज्यांना पुराचा अथवा खूप जास्त पाऊस पडल्याचा फटका बसला आहे. आपल्याकडे चिपळूण, कोल्हापूर, सांगली येथील स्थिती भयानक आहे. कोल्हापूरची भौगोलिक स्थिती लक्षात घेतली तर तिथे पूर येणे हे काही पहिल्यांदा घडत नाही. २०१९च्या पुराच्या आठवणी ताज्या असतानाच यंदा परत पूर आला आहे. तळये गावात दरड कोसळून ३५ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यातही जीवितहानी होत आहे. या सगळ्या भागांमधील भयावह स्थितीची दृश्ये टीव्हीवर पाहूनच अंगावर काटा येतो. मग प्रत्यक्ष तिथे राहणारे लोक याचा सामना कसा करत असतील सांगणे कठीण आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांतील शेतकऱ्यांचे नुकसान हीसुद्धा खूप काळजीची बाब आहे. सर्व समस्यांना तोंड देऊन हा शेतकरी पीक घेतो आणि निसर्ग क्षणार्धात ते त्याच्याकडून हिरावून घेतो. पीक गेले ही चिंता आणि नंतर तुटपुंजी नुकसानभरपाई मिळाल्यावर नवे पीक कसे घ्यायचे ही त्याहून मोठी चिंता त्याला भेडसावत असते.
महाबळेश्वरमध्ये दोन दिवसांपूर्वी २४ तासांत ६०० मिमी पाऊस पडला. या शहराच्या इतिहासात इतक्या कमी वेळात इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नव्हता. रायगड जिल्ह्यातही पावसाने झालेली वाताहत आपण पाहात आहोत. मुंबई, पुणे ही शहरेही अतिपावसापासून वाचली नाहीत. बाहेर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली या शहरांनाही पावसाचा फटका बसला आहे. दिल्लीत पाऊस उशिरा दाखल झाला. आणि अधूनमधून दणके देत राहिला.
चीनमधील एका प्रांतात आलेल्या पुराची चित्रे आपण टीव्हीवर पाहिली आहेतच. त्या भागात एक हजार वर्षांत असा पूर आला नाही असे म्हणतात. देशविदेशातील हे चित्र पाहिले की पुढच्या ५० नव्हे, दहाच वर्षांत या जगाचे काय होणार असा प्रश्न पडतो. पर्यावरण असमतोल वाढत चालला आहे, काँक्रीटची जंगले विस्तारात आहेत, शहरांमधली नियोजनबद्धता कमी होत आहे, निकृष्ट बांधकाम साहित्य अथवा तशाच प्रकारच्या बेपर्वाईमुळे अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत.
शहरांमध्ये मूलभूत सोयींवर पडणारा ताण कमालीचा वाढत आहे. या समस्या कोना एका शहरापुरत्या अथवा देशापुरत्या नसून जगभर भेडसावत आहेत. एकीकडे रिचर्ड ब्रॅन्सन आणि जेफ बेझोस सारखे अब्जाधीश अंतराळ पर्यटनाची कल्पना पुढे आणत असताना पृथ्वीची अवस्था मात्र दयनीय झाली आहे.
महाराष्ट्रात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दरड कोसळून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. गेले काही वर्ष कोकण किनारपट्टीला वादळ, पाऊस यांचे जास्त तडाखे बसत आहेत. यंदा तर मुंबईतही ‘तौक्ते’ वादळ मोठी भीती निर्माण करून गेले. मुंबई-पुणे असो व कोकण किनारपट्टी, रायगड जिल्हा असो की सातारा, अनेक रहिवासी अतिपावसामुळे येणाऱ्या संकटांचा नाईलाजाने सामना करायचा प्रयत्न करतात. अंगावर कधी बाजूची संरक्षक भिंत अथवा दरड कोसळेल हे माहीत नसते. अशा लोकांचे कायमचे पुनर्वसन सुरक्षित जागी होणे गरजेचे आहे. परंतु, पुनर्वसन हा खूप मोठा गंभीर प्रश्न आपल्याकडे आहे. तो अनेक प्रसंगात वेगवेगळ्या स्वरूपात दिसला आहे. कायम भीतीच्या छायेत राहणे कोणालाच आवडत नाही , परंतु बहुतांश वेळा त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नसतो.. हा सगळाच प्रश्न खूप गुंतागुंतीचा आहे.
सध्या कोरोनाची साथ चालू आहे. तशात हे पावसाचे संकट आले आहे. रुग्णालयात पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद झालामी परिणामी व्हेंटिलेटरवर असलेले काही रुग्ण दगावले, ही बातमी आजच वाचनात आली. काही महिन्यांपूर्वी काही ठिकाणी आगीमुळे रुग्ण दगावले होते, आता पावसामुळे दगावले. निसर्गापुढे माणूस हतबल होत चालला याचेच हे निदर्शक आहे.
या पावसाच्या तडाख्यामुळे धरणांच्या क्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा होत आहे एवढेच समाधान मानायचे. त्याचवेळी छोट्या व मोठ्या शहरांमध्येही पुरपरिस्थितीमुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न अधिक चिंतेत पाडतात. कोरोंना निर्बंध असल्याने कोल्हापूरसारख्या ठिकाणी दुकाने उघडण्यास परवानगी नव्हती. या निर्णयाविरुद्ध तिथे आंदोलनही चालू होते. आता पावसाने संपूर्ण शहराची कोंडी केली, तशी दुकानांत पाणी जाऊन अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असण्याची शक्यता आहे. चिपळूणला तर ते झालेच.
बाजारपेठेत अनेक दुकाने पाण्याखाली गेली अथवा सहा ते आठ फूट पाण्यात होती. त्यामुळे आतील सामानाचे काय झाले असेल याची आपण कल्पना करू शकतो. गेले काही महिने कोरोनामुळे धंदा नाही, आणि आता जरा कुठे बरी परिस्थिती येते आहे असे वाटत असतानाच पावसाने दुकानाची अक्षरशः वाट लावली अशी अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पावसामुळे फटका बसलेला शेतकरी, पुरामुळे घरे उद्ध्वस्त झालेले नागरिक आणि दुकाने पाण्याने भरल्याने हताश झालेला व्यापारी या सगळ्यांना योग्य ते निकष लावून नुकसानभरपाई मिळायला हवी. परंतु पुढे जाऊन ज्यांचे पुनर्वसन शक्य आहे तेही झाले पाहिजे. हे नैसर्गिक संकट आहे, पाऊस एवढा पडला तर आम्ही काय करू असे राजकीय उत्तर न देता, कायमस्वरूपी तोडगा काढता येतो का या दृष्टीने विचार व्हायला हवा.