राजकीय हवामान तापलेलेच!
अमित शाह हे भारतीय जनता पक्षाचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जातात. या वर्षीच्या मार्च एप्रिलमध्ये झालेल्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागल्याने अमित शाह यांची चाणक्य नीती फसते की काय असे वाटू लागले होते. या तीन राज्यांतील निवडणुकांनंतर काही राज्यांत पोटनिवडणूक झाल्या, त्यात भाजपला संमिश्र यश मिळाले. आता उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत.
मार्च एप्रिलमध्ये भाजप काहीशी बेसावध होती. पश्चिम बंगाल आपण जिंकलाच आहे, फक्त मतदानात शिक्कामोर्तब होणे बाकी आहे, असे त्यांना वाटत होते. ममता बॅनर्जी यांनी त्यांचा पूर्ण भ्रमनिरास केला. त्या वेळेच्या प्रमाणे आता उत्तर प्रदेशात बेसावध राहून चालणार नाही, याची चाहूल भाजपला लागलेली दिसते. म्हणूनच या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अमित शाह यांनी वाराणसी (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ) आझमगढ (समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांचा मतदारसंघ) आणि बस्ती (हरिश्चंद्र द्विवेदी हे भाजप खासदार असलेला मतदारसंघ) अशा तीन मतदारसंघांचा दौरा केला. असंख्य बैठक घेतल्या. या तीन मतदारसंघांत अमित शाह यांचे जवळपास दहा हजार फलक लावण्यात आले असल्याचे वाचनात आले. यावरून हा दौरा कसा झाला असेल याची कल्पना येते. भाजपचे पाय जमिनीवर येत असल्याचे हे चिन्ह होते.
उद्या, सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांकडे बरेच महत्वाचे मुद्दे आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचा पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय, लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडून मारल्याची व त्यात थेट केंद्रीय मंत्र्यांचा पुत्र गुंतला असल्याची घटना, त्या घटनेच्या तपासावर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मारलेले ताशेरे, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करूनही भडकलेली महागाई, राफेल विमान खरेदी व्यवहारात लाचखोरी झाल्याचे आरोप … अशा प्रमुख मुद्द्यांवर उद्यापासून सुरु होणारे अधिवेशन गाजणार हे उघड आहे.
ही आरोपांची मालिका भाजपला भारी पडू शकते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे इतर मोठे नेते याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही कळून चुकले असेल यात शंका नाही. त्यामुळेच अमित शाह यांचा झालेला दौरा, ‘विकासकामांच्या’ उद्घटनासाठी अथवा भूमिपूजनासाठी पंतप्रधानांचा सहभाग आणि पुढील तीन महिने होणारे सर्वच पक्षांच्या नेत्यांचे दौरे यामुळे उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक ही ‘मिनी लोकसभा ‘ निवडणूक म्हणायला हरकत नाही. उत्तर प्रदेशात आपले सरकार परत यायला हवेच, शिवाय २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांच्या नेतृतवाखाली केंद्रातही आपलेच सरकार यायला हवे हा अमित शाह यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा होता, हे स्वाभाविक म्हटले पाहिजे.
मुंबईसह देशभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये उत्तर प्रदेशातील ‘विकासाच्या’ ज्या पानभर (कधीकधी दोन किंवा चार पाने) जाहिराती येत आहेत त्या पाहिल्या तर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृतवाखाली राज्याचा प्रचंड विकास झाला आहे, असा कोणाचाही समाज होऊ शकेल. तसे खरेच असेल तर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष , काँग्रेस यांचे काही खरे नाही. खरे म्हणजे एरवीही या पक्षांच्या काही खरे नाही. विरोधक एकत्र आणि सबळ नाहीत म्हणून केंद्रात काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत राहिली, तसेच आज भाजप सत्तेत आहे. म्हणूनच, उत्तर प्रदेशातही पुन्हा भाजप जिंकले तर आश्चर्य वाटायला नको. कारण निवडणुकीचे राजकारण वेगळे असते. आणि ते मतदारांना कळेपर्यंत मतदान होऊन गेलेले असते. थोडक्यात, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकांमुळे पुढचे चार महिने वातावरण तापलेलेच असेल यात शंका नाही. त्याचे पडसाद संसद अधिवेशनावरही पडतील. त्यामुळे प्रत्यक्ष कामकाज किती होईल याबद्दल साशंकता वाटते.
मोदी-शाह आणि आदित्यनाथ यांच्याबरोबरच गेले १५ दिवस दुसरी व्यक्ती चर्चेत होती व आहे ती म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. काँग्रेस दिवसेंदिवस कमजोर पडत आहे. नरेंद्र मोदी यांना सक्षम पर्याय म्हणून काँग्रेसचा एकही नेता उभा राहू शकत नाही, हे ममता दीदींनी चांगले ओळखले आहे. विरोधकांच्या ऐक्याचे अनेक प्रयत्न आतापर्यंत झाले. परंतु, काँग्रेस आधीइतका सक्षम नाही आणि बाकीच्या पक्षांमध्ये देशपातळीवर काही दम नाही, हेही दीदींच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ममतांनी देश पातळीवर आपला ‘तृणमूल काँग्रेस” पक्ष वाढविण्यास सुरुवात केली आहे.
गोव्यात त्यांनी पहिला प्रयत्न केला आहे. पंजाबमध्ये करून पाहात आहेत. मेघालयमध्ये एका रात्रीत काँग्रेसच्या बारा आमदारांनी ‘तृणमूल काँग्रेस”ला जवळ केले. गोवा, मेघालय ही छोटी राज्ये देश जिंकून देणार नाहीत ही बाब ममतांनी माहीत नाही असे अजिबात नाही. परंतु या निमित्ताने हळूहळू हातपाय पसरायचे त्यांनी ठरवलेले दिसते. म्हणतात ना, दुसऱ्याचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपले अस्तित्व कसे वाढेल याचा विचार करायला हवा ! काँग्रेस आपोआप कमी होतेच आहे. काँग्रेसने राजस्थानात गेल्या आठवड्यात जो मंत्रिमंडळ फेरबदल केला तो सरकार वाचविण्याचा अखेरचा प्रयत्न होता असे म्हणावे लागेल. हीच नीती ते अन्यत्र वापरते झाले असते तर पक्षाची अवस्था आजच्याइतकी वाईट झाली नसती.
काँग्रेसने उद्या, सोमवारी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे दुर्लक्ष करून ममतांनी त्याच दिवशी कालीघाट येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ‘तृणमूल’ आता स्वतःचा जास्त विचार करणार हे स्पष्ट संकेत देण्याची ही कृती आहे. त्याचवेळी ममता शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, द्रमुक, राजद, डावे पक्ष यांच्याही संपर्कात आहेत. शरद पवार आणि ममता यांची भेट हा नेहेमीच चर्चेचा आणि ‘बातमी’चा विषय असतो. या सगळ्यात काँग्रेस एकटी पडत चालली आहे, तरीही तो पक्ष यातून काहीही शिकत नाही, असे चित्र दिसते आहे. एकंदरीत, पुढचे चार महिने राजकारणाचे, असेच म्हणायला हवे. उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांना आपण नेमके कुठे आहोत हे लक्षात येईल, अशी आशा करू या! जागतिक हवामान परिषदेत कसलेही निर्णय होवोत, भारतीय तप्त राजकीय हवामानावर काही तोडगा आहे का कोणाकडे?
जाता जाता – ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात सध्या लहान मुलांना ‘हॉट सीट’वर बसण्याची संधी मिळत आहे. शुक्रवारी हिमाचल प्रदेशच्या अरुणोदय शर्मा या नऊ वर्षाच्या गोड मुलाला अमिताभ यांनी प्रश्न विचारला. मोठा झाल्यावर कोण व्हायचे आहे? अरुणोदयचे उत्तर होते- अजून ठरले नाही. माझे निर्णय बदलत असतात. एक मात्र नक्की. मी अजिबात राजकीय नेता होणार नाही. अजिबातच नाही!
(देशाच्या राजकारणावर यापेक्षा नेमकी टिप्पणी दुसरी काय असू शकते ?)