…इथे माणुसकी जिंकली!
कोरोनाच्या संकटात सर्वत्र नकारात्मक वातावरण असले तरी काही आशेची बेटेही आहेत. त्यांच्याकडे फारसे समाजाचे लक्ष गेलेले नसले तरी हे आशेचे दीप उजळतच राहणार आहेत. त्याचे कारण म्हणजे माणुसकी.

ब्लॉग – https://ashokpanvalkar.com
महाराष्ट्राच्या काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात येत आहे असे आश्वासक चित्र समोर उभे राहात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर येथील कोरोना रुग्णांमध्ये घाट होते आहे. तरीही इतर काही जिल्ह्यांत कोरोनाच प्रादुर्भाव जेवढा कमी व्हायला हवा होता तेवढा कमी झालेला नाही. तेथील टाळेबंदी आणखी काही दिवस वाढविण्यात आलेली आहे. राज्य सरकार आता या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याने कोरोना प्रादुर्भाव कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. अर्थात त्यासाठी प्रशासनाला जनतेचे संपूर्ण सहकार्य लागेल.
गेल्या सव्वा वर्षाच्या भीषण अनुभवांतून शिकून जनता हे सहकार्य करील अशी आशा बाळगू या. कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिस हा आजारही होत आहे. काळी बुरशी, पांढरी बुरशी, पिवळी बुरशी असे प्रकार यात आहेत. आधी जसा रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा होता तसा आता म्युकरमायकोसिसवरील औषधाचा तुटवडा भासत आहे. हा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल अशीही आशा करू या.
कोरोनाच्या लाटेने खूप काही धडे दिले. शासनाला, जनतेला आणि जगालाही. साधारण दीड वर्षांपूर्वी हा आजार कोणाला माहितही नव्हता. अचानक तो आला आणि अवघ्या जगाला त्याने ग्रासून टाकले. तरीही भारतासह विविध देशांमधील शास्त्रज्ञांनी यावर अपेक्षेपेक्षा लवकर लस शोधून काढली. जगातल्या ७० टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले तरच कोरोनावर मात करू शकू असे गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले असले तरी लसीकरणाचा वेग पाहिला तर अजून किमान दोन वर्षे तरी जगाला कोरोनाचा सामना करावा लागेल असा अंदाज करता येतो.
जगभरातील आरोग्य यंत्रणा त्या दृष्टीने कामाला लागली आहे. गेल्या वर्षभरात शासन, आरोग्य यंत्रणा, पोलिस आणि जवळपास प्रत्येक खाते पूर्णपणे कोरोना निवारणासाठी काम करत आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. परंतु या साऱ्यात सामान्य माणसाने दाखवलेली जिद्द, माणुसकी , कोरोना रुग्णांना विविध प्रकारे मदत करण्याची तयारी यांचेही तितकेच कौतुक झाले पाहिजे असे मला वाटते.
धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू झाला. गेल्या वर्षी त्यांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यावर्षी वडिलांचाही झाला. आणि नंतर स्वतःचाही झाला. मागे होती पत्नी आणि दोन मुले. जगायचे कसे हा प्रश्न पत्नीला भेडसावत असतानाच अचानक तिच्या पतीचे सहकारी पोलिस घरी आले आणि त्यांनी दीड लाख रुपये तिच्या हाती ठेवले. सरकारकडून अधिकृत मदत मिळेपर्यंत रोजच्या खर्चासाठी हे पैसे घ्या, असे या पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी कुठून दिले हे पैसे? त्यांनी या कॉन्स्टेबलच्या मृत्यूनंतर एक whatsapp ग्रुप तयार केला. अधिकाधिक लोकांना विनंती केली आणि हे दीड लाख रुपये जमा केले. पोलिसांनी केलेल्या मदतीचे हे काही एकमात्र उदाहरण नव्हे. राज्यात विविध ठिकाणी पोलिसांनी असे whatsapp ग्रुप तयार करून मदत केली आहे.










