आता मुलांकडे लक्ष देण्याची गरज
कोव्हिड-१९ची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असतानाच तिसरी लाट येणार आणि ती मुलांसाठी जास्त घातक ठरणार असे म्हटले जात आहे. दुर्दैवाने हा अंदाज खरा ठरला तर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

ब्लॉग – https://ashokpanvalkar.com
मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत आतापर्यंत ११,१४४ मुलांना कोव्हिड-१९ ची लागण झाली आणि आतापर्यंत १७ मुलांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे उच्च न्यायालयात देण्यात आल्याची बातमी वाचून कोणीही अस्वस्थ होईल. आधी साठ वर्षांवरील लोकांचे , मग ४५ वर्षांवरील लोकांचे, आता १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्याचे प्रयत्न होत असताना या मुलांकडेही लक्ष द्यायला हवे हे ठळकपणे अधोरेखित करणारी ही बातमी आहे. मुंबई शिवाय महाराष्ट्राच्या इतर भागातली माहिती माझ्याकडे नाही, पण ती गृहीत धरली तर हा आकडा आणि ही समस्या खूप मोठी असू शकेल असे वाटते. एकंदर कोव्हिड-१९ प्रकरणात लहान मुलांचा फार विचार झालेला नाही, हे मान्य करायला हवे. आता कोव्हिड-१९ची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत असतानाच तिसरी लाट येणार आणि ती मुलांसाठी जास्त घातक ठरणार असे म्हटले जात आहे. दुर्दैवाने हा अंदाज खरा ठरला तर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.
कोव्हिड-१९ सारख्या भीषण साथीमुळे घरातील वयाने मोठी व मध्यमवयीन माणसे कमालीच्या मानसिक ताणाखाली वावरत होती. तरुण पिढी व १८ वर्षांखालील अल्पवयीन पिढी वेगळ्या अर्थाने तणावाखाली आली. तरुण पिढीला ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे मानसिक व शारीरिक ताणाला तोंड द्यावे लागले. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांचा ताण अधिकच होता. अल्पवयीन मुलांचा मुख्यतः शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. ऑनलाईन शिक्षणाचा त्रास अनेकांसाठी पेलण्याच्या पलीकडचा होता. त्याने धड शिक्षण झालेच नाही. अशात परीक्षा न झाल्याने वर्षभर विविध मार्गाने झालेल्या अभ्यासाचा कस लागलाच नाही. कोव्हिड-१९ पासून खबरदारी म्हणून घराबाहेर पडत येत नाही, मित्रमंडळी असली तरी त्यांना भेटता येत नाही, घरात कोंडून घ्यावे लागल्याने मानसिक कोंडीही झाली. अगदी लहान मुलांना तर कोणी सखासोबतीही नाही, अशी परिस्थिती झाली. वर्ष दोन वर्षांपूर्वी जन्मलेल्या मुलांना किती एकलकोंडे वाटत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी.प्रत्येक वयोगटाच्या प्रश्न वेगळे, ताण वेगळा, तो पेलण्याची शक्ती वेगवेगळी हे खरे असले तरी मुलांचे जे हाल झाले असतील ते नीट व्यक्त तरी झाले असतील का अशी शंका येते.
दहावी, बारावी आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा ताण आणखी वेगळा. त्यांच्या आयुष्याला एक दिशा देणाऱ्या या परीक्षा असतात. त्यांचा अभ्यास करूनही दहावीच्या परीक्षा कोव्हिड-१९मुळे रद्द झाल्या. आता हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. तिथे काय निकाल लागतो, न्यायालयाने परीक्षा घ्यायला सांगितल्या तर त्या कधी होणार, उशिरा झाल्या तर पुढील शैक्षणिक वर्षाचे काय, न्यायालयाने परीक्षा घेऊ नका असे सांगितल्यास इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचे काय असे एक ना अनेक प्रश्न साधारण १४ ते १८ वयोगटापर्यंतच्या मुलांपुढे आहेत.
सध्या एक मेपासून १५ जूनपर्यंत शाळांना अधिकृत सुट्या जाहीर झाल्या आहेत. अशा वेळेस नेहमी चालणारी शिबिरे, पर्यटन व इतर मौजमजा आता करता येणार नाही. कोव्हिड-१९मुळे नाट्यगृहे बंद असल्याने बालरंगभूमीही थंडावली आहे. त्यामुळे स्वतःचे टॅलेंट दाखवणे अथवा दुसऱ्याचे टॅलेंट बघणे यापैकी काहीच होणार नाही. यावर ऑनलाईन मार्ग काढले जात आहेत, पण ते काही खरे नाहीत. आता मैदाने मुळात कमी उरली आहेत, जी आहेत तिथे मुलांना जात येत नाही अशी स्थिती आहे.
पुढील वर्षाची पुस्तके आणून त्या विषयांचा अभ्यास करू असे ठरवले तर कोव्हिड-१९ मुळे पुस्तकांची दुकानेही बंद आहेत. अवांतर वाचन करू म्हटले तरी नवीन पुस्तकांसाठी दुकाने उघडी नाहीत. या सगळ्यातून मुलांची जास्त घुसमट होत आहे. मग मोबाईलचे वेड वाढण्याची शक्यता अधिक वाढते. वर्षभर हा मोबाईल शिक्षणासाठी वापरला, आता खेळण्यासाठी वापरला जातो. म्हणजे मुलेही अशांत आणि त्यांचे पालक अधिकच अस्वस्थ!
