सध्या भारतातच नव्हे तर जगभरात कोव्हिड- १९ मुळे नैराश्याचे वातावरण आहे. कुठूनही चांगली बातमी येत नाही. भारतात दुसरी लाट आली ती त्सुनामीच्या वेगाने. ही लाट येईल याची भीती आधीपासून होती, पण ती इतक्या वेगाने येईल, लहान मुले व तरुणांनाही त्याचा फटका बसेल, प्राणवायूसाठी धावपळ करावी लागेल अशी कल्पना कोणालाच नव्हती.
गुजरात व महाराष्ट्रात कोव्हिड रुग्णालयांना लागलेल्या आगी, नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूची गळती झाल्याने घडलेला भीषण प्रकार, अमुक एका रुग्णालयात प्राणवायू मिळाला नाही म्हणून इतक्या इतक्या रुग्णांनी प्राण सोडला अशा रोजच्या रोज येणाऱ्या बातम्या …या सगळ्यातून आपण लवकर बाहेर येऊ असे दिसत नाही. आजच काही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार या लाटेतून बाहेर येण्यासाठी अजून किमान तीन महिने लागतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे आणखी किती प्राण हकनाक जातील त्याच्या कल्पनेनेच अंगावर शहारा येतो.
सर्वच सरकारे यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरली असली तरी या साऱ्या निराशाजनक वातावरणातही समाजमाध्यमांचा वापर करून एकमेकांना मदत करण्याचे प्रयत्न शेकडो जणांनी केले. ताच्या बातम्या रोजच्या रोज आपण वाचत आहोत आणि अजून माणुसकी जिवंत आहे याची खात्री होत असते. शीख बांधवांचा लंगर सर्वज्ञात आहे, परंतु पंजाबमधील एका गुरुद्वाराने प्राणवायूचा लंगर सुरु केला आणि त्यांनी एक वेगळे उदाहरण घालून दिले. गुरुद्वारात जाणाऱ्या व प्राणवायूची निकड असणाऱ्या कोणालाही तो पुरवला जातो. तुम्ही मोटारीतून गेलात तर मोटारीच्या शेजारी प्राणवायूचा सिलेंडर आणून ठेवला जातो, व गाडीतच बसून तो तुम्ही घेऊ शकता. गाडी नसेल तर समोरच्या बाकावर बसून घेऊ शकता, अक्षरशः कुठेही बसून प्राणवायू घेऊ शकता. रुग्णालयात जागा मिळणे जवळपास अशक्यप्राय असल्याने परंतु प्राणवायू मात्र तातडीने घेणे गरजेचे असल्याने आपण हा प्राणवायू लंगर सुरु केला असे गुरुद्वाराच्या प्रमुखांनी सांगितले.
मूळच्या बेंगळुरूच्या परंतु राहायला हैद्रबादला असलेल्या एका तरुणाच्या कुटुंबाला कोरोनाने ग्रासले. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नव्हती, तरी रुग्णालयाची माहिती मिळवणे, त्यात किती बेड उपलब्ध आहेत, कोणती औषधे किती प्रमाणात उपलब्ध आहेत याची माहिती सर्वसामान्याला नसते असे या तरुणाच्या लक्षात आले. त्याने एक वेबसाइट सुरु केली आणि त्याच्या भागातल्या रुग्णालयांची स्थिती, औषधांची स्थिती द्यायला सुरुवात केली. दर अर्ध्या तासाने ही वेबसाइट अपडेट केली जाते. त्यासाठी किमान ३० स्वयंसेवक २४ तास काम करत असतात. अक्षरशः लाखो लोक त्याचा फायदा घेतात. अशी अनेक उदाहरणे वाचायला मिळाली की सध्याच्या काळातही मनाला उभारी येते. Whatsapp, ट्विटर, फेसबुक आणि अगदी इंस्टाग्रामवरूनही सामान्य लोक एकमेकांची मदत करत आहेत हे बघून खरेच बरे वाटते.
त्याचवेळी मनात हाही विचार येतो की कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, कोणत्याही मूलभूत सोयीसवलती नसताना सामान्य माणूस हे करू शकतो तर सरकारच्या पातळीवरून हे का होत नाही? त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ आहे, यंत्रणा आहे. तरी ते कमी पडले. कोरोनाने आपल्याला आरोग्यविषयक मोठा धडा दिला तसाच आणखी एक धडा दिला. तो म्हणजे आरोग्यविषयकच नव्हे तर सर्व प्रकारच्या मूलभूत सोयीसुविधा सुधारण्याची गरज आपल्या लक्षात आली. हे सारे देशसला लागू होते, केवळ महाराष्ट्र अथवा एखाद्या विशिष्ट राज्यापुरते हे मर्यादित नाही.
अवघ्या दोन वर्षांपूर्वी जगाला कोरोना माहीत नव्हता. अचानक ही त्सुनामी आल्याने अमेरिका, ब्रिटनसारखे देशही हादरले तर त्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आरोग्यसुविधा असणारा भारत तर अधिकच हादरला. तरीही उपलब्ध सोयीसुविधांमध्ये आपण पहिली लाट बऱ्यापैकी थोपवून धरली. सुरुवातीला जी भीती होती, मृतांची संख्या लाखांत होईल अशी भीती होती, ती सर्व फोल ठरवली. उपलब्ध तोकड्या सोयीसुविधांचा वापर करून भारताने हे करून दाखवले. कोरोनावर तातडीने लस शोधणारे संशोधक, डॉक्टर, परिचारिका, सारा सपोर्ट स्टाफ , पोलीस, आणि तुम्हीआम्ही सामान्य लोक याना हे श्रेय जाते. सगळ्याच राज्यात हे झाले. महाराष्ट्रातही Lockdown वेळेवर झाला आणि परिस्थिती अपेक्षेपेक्षा लवकर सुधारली. इथेच देशभर थोडा गाफीलपणा आला का असा प्रश्न येतो.
‘आपण कोरोनावर मात केली, आता घाबरायचे कारण नाही,” असे वाटून आपण निर्धास्त झालो का ? पहिली लाट ओसरायला सुरुवात झाल्यावरच आरोग्यविषयक मूलभूत सोयी पुरविण्याकडे लक्ष द्यायला हवे होते असे वाटत नाही का ? या सुविधा उभारायला वेळ लागतो, पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये फार वेळ नव्हता असे यावर म्हणता येईल. ते खरेही आहे, पण कोणत्याच सरकारचा भर मूलभूत आरोग्यविषयक सोयीसुविधा तातडीने उभारण्याकडे नव्हता असे म्हणायचे का? कोरोना हा राजकारणाचा विषय होऊच शकत नाही, तरी तो झाला का ? सामान्य माणूस धर्म, जात भेदाभेद विसरून केवळ माणुसकीच्या नात्याने एकसंध झाला, तिथे सर्वच पक्षांचे राजकारणी कमी पडले का ? या कोरोनाने जे अनेक प्रश्न आपल्यापुढे उभे केले त्यातले हे प्रश्न नक्कीच आहेत.
भारताने लस तयार केल्यावर जगभरातून मागणी आली. आपण लस डिप्लोमसीच्या नावावर शंभरावर देशांना त्या पुरविल्याही. त्यात मला काही चुकीचे वाटत नाही. अमेरिका, ब्रिटन, फ्रांस सह अनेक देशांना आपला हेवा वाटलं असणे शक्य आहे. परंतु आता आपल्याला लस करण्यासाठी लागणारा कच्चा माल कमी पडत आहे आणि तो माल देण्यास अमेरिका तयार नाही असे चित्र दिसत आहे.
‘आमचे धोरण ‘अमेरिका फर्स्ट’ असे आहे, त्यामुळे आमच्या लोकांना लस देऊन झाल्यावरच तुम्हाला मदत करू”, असा काहीसा सूर अमेरिकेने आळवला. यावर पुण्याच्या सीरम इन्स्टिटयूट च्या आदर पूनावाला यांनी थेट अमेरिकन अध्यक्षांना कच्चा माल देण्याची विनंती केली, इतकेच नव्हे तर सामान्य माणसांनीही बायडेन यांना टॅग करून ट्विट केले. लस डिप्लोमसी करताना सध्याचे संकट आपल्या लक्षात आले नव्हते असे म्हणायचे की भारत लस प्रकरणात वरचढ ठरलेले अमेरिकेला पाहवत नाही असे म्हणायचे ? अर्थात याबाबत प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात.
कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरेल हे सांगणे अवघड आहे. पहिल्या लाटेवेळी दिसणारे चित्र पुन्हा दिसायला लागले आहे. मजूर लोकांचे गावाकडे स्थलांतर, lockdown मुळे बुडालेले रोजगार हे चित्र देशभर दिसत आहे. ते अपरिहार्य आहे असे म्हणून सोडून देता येणार नाही. या सगळ्या कोरोना प्रकरणातून मूलभूत आरोग्य सुविधा खूप मोठ्या प्रमाणावर वाढवणे, देशाचा / राज्याचा अर्थसंकल्पाचा विचार करताना भरीव तरतूद त्यासाठी करणे हे करावेच लागेल.
आपण देशात जम्बो कोव्हिड केंद्र केव्हाही उभारू शकतो, पण त्यासाठी उत्तम डॉक्टर व परिचारिका एका दिवसात तयार होत नाहीत. हे कुशल मनुष्यबळ उभारण्यासाठी काही वर्षे लागतात. भविष्यात याचाही विचार सरकारला करावा लागेल. वैद्यकीय शिक्षण एवढे महाग आहे की अनेक हुशार मुले / मुली केवळ आर्थिक साह्य नाही म्हणून दूर राहतात. वैद्यकीय शिक्षण सर्वांच्या आवाक्यात आणणे हाही विचार करावा लागेल. हे सगळे उपाय दीर्घकालीन आहेत, एकदोन महिन्यात ते होणारे नाही याची मलाही कल्पना आहे, परंतु हाच मोठा धडा आपण कोरोनापासून घ्यायला हवा असे मला वाटते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!