इंडिया दर्पण विशेष लेखमाला – मोरपंखी
हे गाढव आपलेच का?
असा प्रश्न आपणास कुणी केला तर राग येईल की नाही.. नक्कीच येईल. कारण आपण पडलो पांढरपेशे, प्रतिष्ठित. पण हा प्रश्न मला विचारला गेला. त्यादिवशी मुलगी काॅलेजातून आली. मी टेबलाशी बसून चित्रे काढीत बसलो होतो. ती म्हणाली, पप्पा, रस्त्यावर एक गाढव जखमी होऊन पडलं आहे. मला वाटतं, त्याला पाणी द्यायला हवंय. मी म्हटले, ” जाऊन पाज की!” मी एकटी कशी जाऊ, लोक मला हसतील ना”? मग नको पाजू। ती हिरमुसली होऊन आत गेली. चित्र पुर्ण करु लागलो. पण लक्ष लागेना. खरंच गाढवाचा पाण्यासाठी जीव तळमळत असेल तर. दरवेळी काय एकनाथांनी येऊनच पाणी पाजायला हवे का. आपण का नाही?
मी मुकाट उठलाे अंजूला हाक मारुन म्हटले, बादलीभर पाणी घेऊन चल. रस्त्याच्या कडेला गाढवी निश्चेष्ट पडली होती. फक्त मधूनच किंचित मान वर उचली व टाकून देई. डोळे आकाशी लागले होते. पण यमाच्या घड्याळात अजून अवकाश होता. मोटार किंवा रिक्षाने रात्री तिला बहुधा धडक दिली होती. गाढवाजवळ माझ्यासारखा माणूस बसलेला पाहून चिल्ले पिल्ले, दोन चार रिकामटेकडे गोळा झाले. मी ग्लासने तिला पाणी पाजायचा प्रयत्न केला, पण रात्रभर पाण्याविना सुकलेला जबडा कडक झाला होता. एवढ्यात दोन-तीन तरुण मुले पुढे झाली. त्यांनी तिचा जबडा ताणून धरला. एकाने बाटलीतून पाणी तिच्या तोंडात ओतले. एक बाटली, दोन बाटली, चार ते सहा बाटल्या झाल्या तरी ती पाणी पीत होती.
गाढवीच्या उराजवळ मोठी जखम झालेली होती. तिथे शेकडो माशांच्या रुपातली गिधाडे तुटून पडली होती.आमच्या भोवती जाणारा येणाऱ्यांची गर्दी वाढली. कुणीतरी म्हटले, “हे गाढव आपलेच का?” अहो, दिवसरात्र कष्ट करून घेता आणि उपाशीपोटी उकिरड्यावर चरायला सोडता. एकजण म्हणाला, जखमेवर बोंबली तंबाखूची भुकटी व बी.एच.सी. पावडरचा लेप लावा. नाहीतर जखमेत किडे पडतील. मला ते शक्य नव्हते. पण मनाशी म्हटलं, किळस न येणाराला लेप द्यायला सांगू. अशी कामे हिरीरीने करणारी बरीच मंडळी असतात. गाढवी आता थोडी थोडी मान उचलू लागली होती. तिच्या डोळ्यांत माझ्याविषयी कृतज्ञता होती असं लेखकी वाक्य लिहिणे मठ्ठपणा ठरेल. कारण खोल जखम, पोटात बाळ, घासभर अन्न नाही तिचे प्राण कंठाशी आलेले. असो.
चार-साडेचारला मी पुन्हा बादलीभर पाणी घेऊन गेलो. मनातली भूतदया आता धीट झाली होती. जखमेवर अंजू व पत्नीने एक जाडसर चादर आधीच टाकलेली होती. तरीही चादरीच्या छोट्या मोठ्या गॅप्स शोधून माशा आत घुसत होत्या. पुन्हा थोडीफार गर्दी वाढली. गाढवी आता हळूहळू का होईना पाणी घोटत होती. बरे वाटले. पत्नीने हळूच दुधाची एक वाटी माझ्या हातात दिली .व म्हणाली, “जाऊ द्या दोन जीवांशी आहे पाजा बिचारीला.” दूध मी तिच्या मुखी रिते केले .जराशाने पोरांनी विचारलं,” काका, आता पुन्हा पाणी पाजायला कधी येणार? आठ साडेआठला.
पण ती वेळ आलीच नाही. आठ वाजता गल्लीतली दोन-तीन मुले माझ्या घरी ओरडत आली व म्हणाली, ” काका, काका.. तुमचं गाढव मेलं. मी पाहायला गेलो नाही. विशेष कौतुकाची गोष्ट, महापालिकेने ते सकाळी उचलून नेलेले होतं. पत्नी हळहळत उद्गारली, “बिचारी दोन जिवांशी होती. पोटातल्या बाळाला जग पाहायला मिळालं नाही. पोटातल्या पोटातच गेलं .!” मनात विचार आला, गाढवाचंच पोर ते. जन्माला आलं असतं तर जगाने काय त्यांच बारसं केलं असत ..? असच आईच्या मागेमागे उकिरडय़ावर चरत राहीलं असत. वयात आल्यावर मरेस्तोवर दगड विटा वाहत राहिल असतं. कधी मधी आनंदाने वा उन्मादाने खिंकाळलं असतं, बेफाम होऊन रस्त्यावर आलं असतं तर गाडी खाली गेलं असत. वा मालकाने पायात दोरी अडकवून लंगडायला भाग पाडलं असत. हाच जर त्यांचा भविष्यकाळ होता तर त्याने तो पहायला हवा होता का? जिथे माणसांची मुले उकिरड्यावर टाकून देतात… हे तर गाढवाच पोर दया, माया माहित नसलेलं ..बरं झालं मेलं.