इंडिया दर्पण विशेष – ज्ञानेश सोनार यांची कथामाला
अशीही आई
सखा शेतात काम करीत होता. काम करता करता त्याने रस्त्याकडे पाहिले. त्याची बहिण तिन्ही लहान मुलांना घेऊन त्यांच्या घराकडे चालली होती. दुपारचे टळटळीत बारा वाजले होते. तिला त्याने हटकले नाही. घरी सखाची बायको होतीच. तो पुन्हा कामाला जुंपला. सखाचे घर अर्धा फर्लांगावर होते. सुनंदाने, सखाच्या बायकोने नणंदेला घराकडे येताना पाहिले. तिच्या कपाळावर आठी पडली. भर उन्हात ही बया कशाला कडमडली. आली गरिबीच्या रड कथा सांगायला. सुनंदाने भरभर धान्याची पोती गोधड्या टाकून लपवली.
डाळीसाळी गुळ, साखर, भाज्या बाजेखाली लपवून ठेवल्या. आणि उदास तोंडाने दारातच बसून राहिली. नणंदेला तिने ओट्यावरच अडविले. डोक्यावर कसे कर्ज झाले, घरात अन्न नाही, सावकार कर्जावू पैशांसाठी कसा तगादा करतोय, पिकावर रोग पडला अशा सुरस कथा तिने नणंदेला डोळ्यांत पाणी आणून सांगायला सुरुवात केली. नणंद उपाशी, तहानेल्या पोरांना घेऊन पुन्हा माघारी फिरली. भावाने बहिणीला तिच्या गावाकडे माघारी जाताना पाहिले.
सहा साडेसहाला सखा घरी आला तो हंबरडा फोडीत कपाळ बडवित. सुनंदा गोंधळली. तिने विचारले, काय झाले? तुला ठाऊक नाही का… अगं तुझ्या माहेरच्या घराला आग लागली. सगळं जळून खाक झालं. गुरांचा गोठा, गवत सगळ जळालं. घरातले उघड्यावर रडत बसलेत. सु
नंदा धाय मोकलून रडू लागली म्हणाली, “लगेच जाऊ चला.” वेडे तुला पाहून आणखी रडारड होईल. त्यापेक्षा गाडीत थोडं धान्य, सामान टाकून मी एकटाच जातो. सुनंदाने गाडीत सामान भरायला सुरुवात केली. गहू, तांदळाची पोती. डब्यात डाळी, साखर त्यात लपवून काही नोटा. गळ्यातली मोहनमाळ वगैरे. गाडी गच्च भरली. रडवेला सखा गाडी घेऊन निघाला. सुनंदाच्या डोळ्यांत अश्रू मावत नव्हते. रात्री उशिरा सखा घरी आला. म्हणाला, आता ते बरेच सावरलेत. बरं झालं तू भरपूर सामान दिलंस. तुमचं घर गावाबाहेर असल्याने फारशी मदत मिळालेली नव्हती. दुसरे दिवशी सकाळीच सखा शेतावर निघून गेला.
सुनंदाची तगमग थांबलेली नव्हती आईला कधी भेटते असे तिला झालं होतं. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. वाट बदलून ती मैलभर दूर असलेल्या आईच्या घराकडे निघाली. लगबगीने निघालेली सुनंदा सखाने लांबूनच पाहिली. ती माहेर गावाच्या वेशीजवळ पोचली. तिला रडताना पाहून लोकांनी विचारले, “काय झालं” ती न बोलताच झपझप पुढे झाली. दूरवरून तिला आई, घर, मळा दिसला. आईने दूरवरून तिला येताना पाहिले. इतक्या सकाळीच ही पोरं एकटीच इकडे कुठे? आई भांबावली.
न राहवून पुढे झाली. वाटेतच दोघींनी एकमेकीना मिठी मारली. आई असं कसं आक्रीत झालं… कशी आग लागली, मुलं माणस, गुरंढोरं ठीक आहेत ना? आई गोंधळली. तिला शांत करत म्हणाली, हे काय बडबड करते आहेस. शांत बस आणि काय झाले ते नीटपणे मला सांग. अगं तुमचं घर जळालं, गोठा जळाला, माणसं उघड्यावर आलीत असं मला समजलं. आई असं कसं झालं?” रडतच तिने विचारले.
असं तुला कुणी सांगितलं? माझ्या नवऱ्याने.
सखा तसा खूप समजदार होता. आई विचारात पडली. नक्कीच सुनंदा काही चुकली होती. आईने विचारलं, “सखाच्या घरचं एवढ्यात कुणी तुझ्या घरी आलं होतं का?” हो. काल माझी नणंद भर दुपारी पोरांना घेऊन आली होती. मग तिला घरात घेऊन गुळ पाणी, उपाशी पोरांना जेवायला दिलंस का?” ” अजिबात नाही ती नणंद आली की चार दिवस जातच नाही. पोरं सारखी भूक भूक करतात. तिला तर नेसायला नीटसं धुडकही नसतं. तशीच बोंबलत येते”.
आईला मुलीच्या अंदाज आला. ती म्हणाली, सुनंदे ते माझं घर बघ. सगळं शाबूत आहे. आम्ही सुना मुले सगळे आनंदात आहोत. आता तू आल्या पावली तुझ्या घरी निघून जा. माझ्या घरी येऊ नको.” ” अगं आई असं वाटेतूनच का पाठवतेस? तुझ्या घरी येऊ तर दे. बेटा, आज तू माझ्या घरी घेऊ नको. तू नणंदेशी असं वागलीस हे माझ्या सुनांना समजलं तर त्या सुद्धा उद्या तुला घरातून अस्सं उपाशी पोटी हुसकून देतील. तुझी सावली माझ्या भरल्या घरावर पडायला नको. सखा समजदार म्हणून त्याने तुला मारझोड केली नाही. माघारी जा.
सखाची क्षमा माग. नणंदेला, मुलांना मानाने बोलव. गोडधड जेऊ खाऊ घाल. तिला साडी चोळी, पोरांना कपडे दे. आणि असं केल्यावर माझ्या घरी येऊन सुना मुलांना अभिमानाने सांग. मला ते आवडेल. असं सांगून आई एकटीच घराकडे वळली.