इंडिया दर्पण विशेष लेखमाला
राऊळी मंदिरी
वाल्मिकॠषी आश्रमातील ८० फुटी रामतीर्थ हनुमान!
हनुमानाची पूजा भारतात सर्वत्र केली जाते. शक्तिदाता हनुमान सर्वांनाच अतिशय प्रिय आहे. त्यामुळे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच हनुमान आवडतो.यामुळेच हिमालयापासून काश्मीरपर्यंत आणि गुजरात पासून आसाम पर्यंत सर्वत्र हनुमानाची मंदिरं आणि मूर्ती पहायला मिळतात.
शिख धर्मियांच्या सुवर्णमंदिरासाठी सुप्रसिद्ध असलेल्या अमृतसर येथे देखील हनुमानाची अतिशय भव्य मूर्ती पहायला मिळते.अमृतसर पासून १२ किमी अंतरावर ‘रामतीर्थ’ नावाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे साक्षांत हनुमानाने सीतामाईसाठी एक तलाव निर्माण केलेला आहे असे मानतात.या तलावाला ‘रामतीर्थ तलाव’ असे म्हणतात. याच ठिकाणी बजरंगबलीची ८० फूट उंच मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.

मो. ९४२२७६५२२७
अतिशय प्राचीन ठिकाण
रामायण कालापासून रामतीर्थ हे ठिकाण प्रसिद्ध आहे. कारण रामायण लिहिणारे वाल्मिक ॠषि यांचा आश्रम याच ठिकाणी होता असे मानले जाते. आजही येथे वाल्मिक ॠषि, सीतामाई, कुश लव, यांच्या नावाच्या झोपड्या पहायला मिळतात. प्रभु रामचंद्रानी रावण वधा नंतर आयोध्येला परत आल्यानंतर एका धोब्याचे बोलणे ऐकून सीतेचा त्याग केला. लक्ष्मणाने सीतेला जेथे सोडले ते हेच ठिकाण. पुढे सीतामाई याच ठिकाणी असलेल्या वाल्मिक ॠषींच्या आश्रमात गेली.
येथेच वाल्मिक ॠषिनी सीतामाईला आश्रय दिला. येथेच कुश आणि लव यांचा जन्म झाला. पुढे वाल्मिक ॠषींनी कुश आणि लव यांचे संगोपन केले त्यांना शिक्षण दिले. कुश आणि लव लहान असतानाच इतके शूर होते की त्यांनी खुद्द प्रभुरामचंद्राच्या अश्वमेघ यज्ञाचा अश्व येथेच अडविला आणि रामाच्या सैन्याचे सेनापती असलेल्या शत्रुघ्नला पकडून सीतामाई पुढे उभे केले. त्यानंतर कुश आणि लव यांनी साक्षांत रामालाच काव्यातून रामायण ऐकविले. रामायणातील ही सुप्रसिद्ध कथा याच परिसरांत घडली म्हणून रामकथेत या स्थानाला विशेष महत्व आहे. आधीच वाल्मिक ॠषींचा आश्रम आणि त्यात हनुमानाने स्वत; निर्माण केलेला तलाव म्हणजे सोने पे सुहागा ! त्यामुळेच वाल्मिक ॠषींचा आश्रम पहायला येणारे भाविक आणि पर्यटक अतिशय श्रद्धेने येथील महाकाय हनुमानापुढे नतमस्तक होतात.
आकाशाला भिड्लेला हनुमान
रामतीर्थ येथील हनुमान मूर्ती २४.५ मीटर म्हणजे ८० फूट उंच आहे. येथे वानर रुपांत हनुमानजी पहायला मिळतात. हनुमानजी सर्वश्रेष्ठ रामभक्त तर आहेतच परंतु ते खुद्द भगवान शिवाचा अवतार आहेत अशी मान्यता आहे. ऐंशी फूट उंचीचा हा महाबलशाली हनुमान दोन पायांवर उभा असून अतिशय शक्तीशाली रुपांत दिसतो. जणू आकाशाला भिड्लेला हा हनुमान शेंदरी लाल रंगात रंगविलेला असून त्याच्या डोक्यावर सुवर्णमुकुट आहे. हनुमानजीने उजवा हात उंचावलेला असून डाव्या हातांत प्रचंड मोठी गदा धारण केलेली आहे. हनुमानाच्या दोन्ही खांद्यावर उत्तरीय वस्त्र असून गळ्यात पिवळया फुलांची मोठी माळ घातलेली आहे.
वाल्मिक ॠषींच्या आश्रमातील ८० फूट उंच हनुमान हे इथले प्रमुख आकर्षण आहे. येथील तलाव खुद्द हनुमानजीनी निर्माण केलेला असल्याने या स्थानाला भाविक आणि पर्यटकांच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. उत्तर रामायणातील अनेक प्रमुख प्रसंग येथेच घडलेले असल्यामुळे येथील वाल्मिक ॠषीं, सीतामाई, कुश- लव यांच्या झोपड्या, सीतामाई जेथे स्नान करीत असे ते ‘सीताकुंड’ येथे पहायला मिळतात. विशेष म्हणजे रामायणातील सर्व प्रसंग येथे अतिशय आकर्षकपणे मूर्ती व चित्र रुपांत साकारलेले आहेत.
वार्षिक उत्सव
दरवर्षी दिवाळी नंतर पंधरा दिवसांनी येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. या काळांत येथे लाखो भाविक आणि पर्यटक येतात. यावेळी पौर्णिमेच्या रात्री येथील जलाशयात भाविक तुपाचे दिवे सोडतात. विशाल जलाशयातील तरंगणारे हजारो दिवे हे दृश्य प्रेक्षणीय असते आणि सर्वांत मुख्य आकर्षण असते ते साक्षांत हनुमानाने निर्माण केलेल्या रामतीर्थात स्नान करण्याचे.त्यामुळे या उत्सवाला लाखो भाविक येथे जमतात.
Column Rauli Mandiri Walmik Rishi Ashram Hanuman by Vijay Golesar
Amritsar Punjab 80 Feet Temple Bajrangbali