इंडिया दर्पण विशेष
– राऊळी मंदिरी –
वडोदराचा १२० फूटी सर्वेश्वर महादेव!
भगवान शंकरांच्या जगभरातील शंभर फुटांपेक्षा उंच मूर्ती मध्ये वडोदरा येथील मूर्ती सर्वांधिक प्रसिद्ध आहे. आजच्या घडीला ही जगातली सर्वांत किंमती महादेव मूर्ती मानली जाते कारण या मूर्तीला चार वर्षांपूर्वी सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. या मुर्तीची लोकप्रियता एवढी अफाट आहे की परदेशातील मॉरीशस येथील भाविकांनी वडोदरा येथील सर्वेश्वर महादेव मुर्तीचीच हुबेहूब प्रतिकृती त्यांच्या येथील ‘गंगा तलाव’ येथे स्थापन करुन या शिवमूर्तीला वन्समोअर दिला आहे.
सर्वेश्वर महादेव नावाने जगभरातील शिवभक्तांत प्रसिद्ध असलेली ही जगातील सर्वांत उंच सुवर्ण लेपन केलेली शिव मूर्ती गुजरात मधील वडोदरा शहराच्या मध्यभागी असलेल्या ‘सुरसागर लेक’ या तलावाच्या मध्यभागी स्थापन करण्यात आलेली आहे. या तलावाचे नाव पूर्वी चन्दन तलाव होते. इ.स. १८७० ते १८७५ या कालावधीत सरदार मल्हारराव गायकवाड यांनी या तलावा भोवती दगडी भिंती आणि घाट बनविले.त्याच वेळी तलावाचे पाणी वाढल्यावर ते जवळच असलेल्या विश्वामित्रा नदीत सोडण्यासाठी अनेक आउटलेट्स तयार करण्यात आले. पूर्वी वडोदरा शहराला आणि आसपासच्या गावांना या तलावातूनच वर्ष भर पाणी पुरवठा केला जात असे. सध्या ‘सूरसागर’ नावाने प्रसिद्ध असलेला हा तलाव १०५७ फूट लांब, ६६५ फूट रुंद आणि १२ फूट खोल आहे.कोल्हापुरच्या रंकाळा तलावाप्रमाणेच हा तलाव प्रसिद्ध असून सायंकाळी अनेक नागरिक येथे फिरायला येतात आणि तलावा भोवतीच्या भिंतीवर तासन तास पाय सोडून निवांत बसतात.
या सूरसागर तलावाच्या मध्यभागी वड़ोदरा महानगर सेवा सदन या संस्थेने २००२ मध्ये ३७ मीटर म्हणजे १२० फूट उंचीची शिव मूर्ती स्थापन केली आहे. भगवान शंकराची सर्वेश्वर महादेव नावाने जग प्रसिद्ध झालेली ही मूर्ती तयार करण्यासाठी सहा वर्षे लागली. १९९६ मध्ये ही मूर्ती घडविण्यास सुरुवात झाली आणि २००२ मध्ये तिची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. तलावाच्या मध्यभागी ७८ फूट खोलीच्या २३ खांबावर सर्वेश्वर महादेव मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. स्टील , तांब्याच्या पटटया आणि सिमेंट कॉन्क्रीट पासून ही मूर्ती घडाविण्यात आली आहे.
२०१८ मध्ये सोन्याचा मुलामा देण्यासाठी ही मूर्ती पुन्हा चर्चेत आली. गुजरात मधील मंजलपुरचे आमदार योगेश पटेल यांच्या नेतृत्वखाली या मूर्तीला सुवर्ण लेपन करण्यात आले तसेच तलावाच्या भिंतींचे आणि घाटाचे देखील नुतनीकरण करण्यात आले. या कार्यासाठी आमदार योगेश पटेल यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण संकल्प फौन्डेशनची स्थापना करण्यात आली. या फौन्डेशनने सर्वेश्वर महादेव मूर्तीला सोन्याचा मुलामा देण्यासाठी सात कोटी रूपये देणगी मिळविली. अमेरिकेतील अनिवासी भारतीय डॉक्टर किरण पटेल यांनी या कार्यासाठी साडेचार कोटी रूपये दान दिले आहेत. इतर दानशूर व्यक्तींनी अडीच कोटी रूपये देणगी दिली. आमदार योगेश पटेल यासाठी अमेरिकेला गेले होते. तेथील दानशूर व्यक्तींना आवाहन केल्यावर ही रक्कम जमा झाल्याचे त्यांनी सांगितले.
येथील प्रमुख उत्सव महाशिवरात्रीला असतो. त्यावेळी शिवमुर्ती , संपूर्ण तलाव आणि आसपासचा परिसर फुलांच्या माळा आणि नयन मनोहर लायटिंगने सुशोभित करण्यात येतो. हजारो भाविक यावेळी भगवान शिवाची ही १२० फूट उंचीची सुवर्णलेपन केलेली मूर्ती पहायला आवर्जून येतात.
संपर्क : सर्वेश्वर महादेव वड़ोदरा – कोठीरोड, बंगलो, सयाजी गंज, वडोदरा, गुजरात -390001
Sarveshvar Mahadev Temple 120 Feet Vadodara Gujrat