बारा ते चौदा हजार फूट उंचीवर वसलेलं तुंगनाथ हे ठिकाण हिमालयातील गढ़वाल प्रांतातील सर्वांत सुंदर स्थानांपैकी एक आहे. येथे नजर पोहचेल तिथवर पसरलेली मखमली हिरवळ आणि सभोवार फुललेली हजारो प्रकारची लाखो फुलं पाहिल्यावर स्वर्गाचा आभास होतो. यामुळेच अनुभवी पर्यटक या ठिकाणची तुलना स्वित्झर्लंडशी करतात. हेच आहे पंचकेदार मधील तिसरे केदार!
इंडिया दर्पणच्या सुज्ञ वाचकांना आज हिमालयातील पंचकेदार मधील तुंगनाथ मंदिराचे दर्शन घडविणार आहोत. गढ़वाल प्रांतात तुंगनाथ नावाचे एक पर्वत शिखर आहे. या पर्वत शिखराची उंची ३६८० मीटर म्हणजे जवळ जवळ बारा हजार फुटांपेक्षा त्याला जास्त आहे. येथे भगवान शंकरांचे जे मंदिर आहे. त्यास तुंगनाथ मंदिर असे म्हणतात. पंचकेदार मध्ये या मंदिराचा समावेश होतो. तुंगनाथाचे हे मंदिर साधारण हजार-बाराशे वर्षांपूर्वीचे आहे. गढवाली पद्धतीचे हे मंदिर उत्तराखंडात असतात तशा पद्धतीचं आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले आहे, असे म्हणतात.
पंचकेदार मंदिराबाबत सर्वश्रुत अशी आख्यायिका सांगितली की, महाभारतातील युद्धात स्वकीयांना ठार केल्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्याच्या हेतूने पांडव हिमालयात गेले. त्यावेळी नकुल व सहदेव यांना एक महाकाय रेडा दिसला. भीम त्या रेड्याचा पाठलाग करू लागला. भीमाने त्या रेड्याच्या पाठीवर गदेने प्रहार केला. तेव्हा रेड्याने आपले तोंड जमिनीत खुपसले. रेड्याच्या रूपातील भगवान शंकर येथे अंतर्धान पावले. त्यांचा पुढचा भाग नेपाळ मधील काठमांडू येथे प्रकट झाला. ते ठिकाण पशुपतिनाथ नावाने प्रसिद्ध झाले. रेड्याच्या पाठीच्या आकाराचा भाग म्हणजेच केदारनाथ. शिवाचे मुख ‘रुद्रनाथ’ येथे, भुजा ‘तुंगनाथ’ येथे, पोट व नाभीचा भाग ‘मध्यमहेश्वर’ येथे तर जटा ‘कल्पेश्वर’ येथे प्रकट झाल्या. त्यामुळे या पाच स्थानाना पंचकेदार असे म्हणतात. या प्रत्येक ठिकाणी भगवान शंकरांची मंदिरं आहेत. जी पांडवांनी बांधली आहेत अशी मान्यता आहे.
चारधाम यात्रेच्या खालोखाल पंचकेदारची यात्रा पवित्र मानली जाते. पंचकेदार मधील प्रत्येक मंदिर हिमालयातील अतिदुर्गम पर्वतावर आहेत. येथे पोहचणे अवघड आहे. मात्र या प्रत्येक ठिकाणी निसर्गाची जी रूपं दिसतात ती अविस्मर्णीय असतात.
तुंगनाथ मंदिर चोपता या ठिकाणाहून ३ किमी अंतरावर आहे. हा रस्ता चढायला कठीण आहे. पण या रस्त्यावर दिसणारे निसर्ग सौंदर्य हिमालयात सुद्धा फार कमी ठिकाणी पहायला मिळते. चोपताला भारताचं मिनी स्वित्झर्लंड असे म्हणतात ते उगाच नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे गुगल सर्च वर जर आपण ‘चोपता’ हे ठिकाण सर्च साठी टाकले तर दुसर्या चोपता नावाच्या गावाची माहिती मिळते. ‘चोपता मिनी स्वित्झर्लंड’ नाव टाकल्यावर आपल्या तुंगनाथ जवळच्या चोपताची माहिती मिळते.
बारा ते चौदा हजार फूट उंचीवर वसलेलं हे ठिकाण हिमालयातील गढ़वाल प्रांतातील सर्वांत सुंदर स्थानांपैकी एक आहे. जानेवारी-फेब्रुवारीत बर्फाची चादर ओढलेल्या या ठिकाणाचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलते ते जुलै-आॅगस्ट मध्ये. या काळात येथे नजर पोहचेल तिथवर पसरलेली मखमली हिरवळ आणि सभोवार फुललेली हजारो प्रकारची लाखो फुलं पाहिल्यावर स्वर्गाचा आभास होतो. यामुळेच अनुभवी पर्यटक या ठिकाणची तुलना स्वित्झर्लंडशी करतात.
हिमालयातील उंचच उंच पर्वत शिखारांवर बारा ते चौदा हजार फूट उंचीवरील या मऊ मखमली गवताच्या पठारांना गढवाली भाषेत ‘बुग्याल’ म्हणतात. चोपता समुद्रसपाटीपासून बारा हजार फूट उंचीवर आहे. येथून ३ किमी पायी चालल्यावर तेरा हजार फूट उंचीवर तुंगनाथ मंदिर आहे. हेच आहे पंचकेदार मधील तिसरे केदार!
उत्तराखंडातील तुंगनाथ महादेव मंदिराची रचना अदभुत अशा गढवाली स्थापत्य शैलीतील आहे. दगडांनी बनविलेले जगातील सर्वाधिक उंचीवरील भगवान शंकरांचे हे मंदिर खुपच आकर्षक आहे. खालूनच मंदिराकडे पाहिल्यावर एका कमानीवर ‘तुंगनाथ मंदिरांत आपले स्वागत आहे’चा बोर्ड पाहून मन सुखावते. जगातील सर्वाधिक उंचीवरील भगवान शिवाच्या मंदिरांत आपण आपल्या पायांनी चालत येऊन पोहचलो हे समजल्यावर स्वत:चाच अभिमान वाटतो.
आपण काहीतरी जगावेगळं उद्दिष्ट गाठलंय याचं समाधान वाटतं. मंदिरांत प्रवेश करण्यापूर्वी भगवान शंकरांकडे नजर लावून बसलेले दोन दगडी नंदी आपले लक्ष्य वेधून घेतात. मंदिरासमोरील लोखंडी त्रिशुल आणि जाळीला लाल छोट्या चुनरी बांधलेल्या दिसतात. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी लाल रंगाच्या चुनरी येथे बांधतात.
मंदिराचे निमुळते होत जाणारे उंच छत दगडी आहे. सर्वांत वर चौकोनी आकाराचा लाकडी घुमट आहे. याच्या चारी दिशांना प्रत्येकी चारचार अशा सोळा महिरपी खिडक्या आहेत. हा लाकडी घुमट विविध आकर्षक रंगांनी रंगविलेला आहे. जगातल्या सर्वांत उंच मंदिरांत भगवान शिवाच्या भुजा आणि हृदयाचे दर्शन घेता येते.
मंदिरातील गर्भगृहात भगवान शंकराची बसलेली पूर्णाकृती चांदीची अतिशय आकर्षक मूर्ती आहे. मंदिरांत पांडवांची चित्रं रंगविलेली आहेत. मंदिरांत प्रवेश करतांना उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती आहे. बाजूला पाच छोटया दगडी देवळया आहेत. त्याच्या बाजूला भैरवनाथाचे लहानसे दगडी मंदिर आहे.
तुंगनाथ महादेव मंदिराशेजारीच पार्वती मातेचे मंदिर आहे. भगवान शंकर पती मिळावा यासाठी पार्वतीने या ठिकाणी तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. त्यामुळे येथे पार्वतीच्या दर्शनाचे महत्व आहे.
तुंगनाथ मंदिर केदारनाथ मंदिर समितीद्वारे निश्चित केलेल्या दिवशी उघडले जाते. साधारणत: एप्रिल-मे महिन्यात अक्षय्य तृतीया नंतर मंदिर उघडले जाते. हिवाळ्यात नोव्हेंबरमध्ये मंदिराची कपाटं बंद केली जातात. त्यावेळी मंदिरासह सगळा परिसर बर्फाच्छादित होतो. मंदिर बंद झाल्यावर १९ किमी अंतरावरील मुकुटनाथ मंदिरांत भगवान शिवाची पूजा मूर्ती ठेवली जाते. मुकुटनाथ मंदिराचे पुजरीच तुंगनाथ मंदिराचे पुजारी आहेत.
चंद्रशिला मंदिर
तुंगनाथ मंदिरापासून तीनशे फूट उंचीवर चंद्रशिला नावाचे मंदिर आहे. यालाच रावण शिला किंवा स्पीकिंग माउंटन असेही म्हणतात. रावणाला मारल्यामुळे झालेल्या पापापासून भगवान शिवाने रामाला येथे मुक्ती दिली असे म्हणतात.
तुंगनाथ कधी जावे
मे ते नोव्हेंबर पर्यंत येथे यात्रा करता येते. येथील बहरलेल्या फुलांचा व निसर्गाचा नजारा पहायचा असेल तर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये येथे यावे.
कसे जावे
तुंगनाथला जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत.
१) ॠषिकेश ते गोपेश्वर अंतर २१२ किमी गोपेश्वर पासून ४० किमी अंतरावर चोपता आहे. सडक मार्ग आहे.
२) ॠषिकेश ते उखीमठ अंतर १७८ किमी, उखीमठ पासून २४ किमी अंतरावर चोपता आहे. येथेही सडक मार्ग अतिशय चांगला आहे. वरील दोन्ही मार्गांवर बस, टॅक्सी, जीप, खाजगी कार उपलब्ध असतात. चोपता पासून ३ किमी अंतरावर तुंगनाथ महादेव मंदिर आहे.
निवास सुविधा
गोपेश्वर आणि उखीमठ या दोन्ही ठिकाणी गढ़वाल मंडल विकास निगमची विश्रामगृहे उपलब्ध आहेत. याशिवाय खाजगी होटेल्स, धर्मशाळा सहजगत्या उपलब्ध होतात. चोपता येथेही निवास सुविधा उपलब्ध असतात. स्थानिक लोकांची दुकानं येथे आहेत.
महत्वाची सूचना
सध्या मात्र करोना लॉकडाउनमुळे केदारनाथ किंवा पंचकेदार यात्रांना परवानगी नाहीये. सर्व मंदिरं उघडली आहेत. पण तेथे भाविकांना प्रवेश दिला जात नाही. परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यावर संपूर्ण चौकशी करुनच या ठिकाणी जाण्याचे नियोजन करावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!