सोमराम (पौर्णिमेला स्फटिकाप्रमाणे उजळणारे शिवलिंग!)
भिमावरम येथील सोमरामा स्वामींचा रथोत्सव पाहिल्यावर जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेची आठवण येते. सोमराम स्वामींचा रथ लाकडी असून तो सुमारे चाळीस फुटापेक्षा उंच आहे. यात्रेच्या वेळी विविध प्रकारच्या वनस्पती व पाना-फुलांनी सजविलेला असतो. रथ ओढण्यासाठी लांबच लांब नाड़े -दोरखंड रथाला जोडलेले असतात. हजारो भाविक हा रथ आपल्या हातांनी ओढतात. यावेळी रथाभोवती अक्षरश: लाखो भाविक उपस्थित असतात. भगवान शंकराचा जयजयकार करीत सोमेश्वर स्वामींच्या रथाची मिरवणूक काढतात. आज याच अनोख्या मंदिराची महती आपण जाणून घेणार आहोत.
आंध्र प्रदेशातील पंचरामक्षेत्र नावाने महादेवाची पांच मंदिरं प्रसिद्ध आहेत. कार्तिक महिन्यात आंध्र प्रदेश राज्य परिवाहन मंडळ या पाचही शिव मंदिरांचे एकाच दिवसात दर्शन घडविण्यासाठी विशेष एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून देते. पंचराम क्षेत्रातले तिसरे शिवमंदिर ‘सोमरामा’ या नावाने प्रसिद्ध आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भिमावरम गावाजवळच्या गुनुपिडी नावाच्या लहानशा गावात हे मंदिर आहे.
येथे शिवाला सोमेश्वर स्वामी किंवा सोमरामा नावाने ओळखतात. येथील शिवलिंगाची स्थापना चंद्राने केली असून पहिली पूजाही चंद्राने केली म्हणून भगवान शिव चंद्राला प्रसन्न झाले. त्यांनी वर दिला की येथील शिवलिंग दर शुक्ल पक्षांत उजळ होईल. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षांत इथले शिवलिंग उजळू लागते. पौर्णिमेच्या दिवशी ते पूर्णपणे शुभ्ररंगाचे होते. तर आमवस्येच्या रात्री ते काजळून जाते. दर पौर्णिमेला आणि आमवस्येला हा चमत्कार घडतो. इतर पंचराम मंदिरांप्रमाणे इथले शिवलिंग आकाराने फार अवाढव्य नाही. दर पौर्णिमेला चंद्र प्रकाशाप्रमाणे उजळून निघणारे शिवलिंग पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
सोमरामा किंवा सोमेश्वराची स्थापना येथे कशी झाली या विषयी स्कन्दपुराणात एक कथा सांगितली आहे. त्यानुसार, एकदा गंधर्वांनी बळाने चंद्र त्यांच्या गंधर्व नगरीत पळवून नेला. त्यामुळे पृथ्वीवर चंद्राची उणीव भासू लागली. सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि चंद्र दिसत नाही त्याचा शोध घेण्याची विनंती त्यांनी ब्रह्मदेवाला केली. ब्रह्मदेवाने अंतर्ज्ञानाने सांगितले की, चंद्र गंधर्व लोकी आहे. आता तिथून चंद्राला कसे परत आणणार? ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती म्हणाली, ‘तुम्ही माझ्या बदल्यांत चंद्राला परत आणा.’ त्याप्रमाणे देवांनी गंधर्वांना सरस्वतीच्या बदल्यांत चंद्र परत दिला. पण थोड्याच दिवसांत सरस्वती ब्रह्मलोकी परत गेली. आपली फसगत झाल्याचे पाहून गंधर्व चिडतील आणि देवांना शाप देतील याची देवांना भीती वाटली. त्यावर ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, ‘चंद्राने जर गुनुपिडी येथे जावून भगवान शिवाची प्रार्थना केली तर भगवान शंकर त्याला अभय देतील व गंधर्वांच्या तावडीतून त्याची सुटका होईल.’
ब्रह्मदेवाचा सल्ला मानून चंद्राने गुनुपिडी येथे भगवान शिवाची आराधना केली. भगवान शिवशंकर त्याला प्रसन्न झाले. त्यांनी त्याची गंधर्वांच्या तावडीतून मुक्तता केली. याठिकाणी लोक मला तुझ्या म्हणजेच सोमेश्वराच्या नावाने ओळखतील असा वर दिला. म्हणूनच दर पौर्णिमेला येथील शिवलिंग स्फटिकाप्रमाणे चकाकते. पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात.
सोमरामा किंवा सोमेश्वर स्वामींचे मंदिर दुसऱ्या शतकात बांधल्याच्या नोंदी आहेत. आजही ते अगदी नव्यासारखेच दिसते. याचे कारण म्हणजे मंदिराच्या सर्व भिंतींवर दगडी शिल्प व इतर कलात्मक चित्रं कोरलेली आहेत. परंतु ही सर्व चित्र ऑइलपेंट सारख्या डार्क रंगांनी रंगविलेली असल्याने हे मंदिर अतिशय आकर्षक दिसते. मंदिर अतिशय विशाल व भव्य आहे. मंदिरासमोर ‘चंद्रकुंडम’ नावाचा एक मोठा तलाव आहे. या तलावात सदैव कमळं उमललेली असतात.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भव्य गोपूर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला दगडी खांबावर आधारलेला भव्य सभामंडप आहे. येथे श्रीराम आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला दुमजली भव्य सभामंडप आहे. खालच्या मंडपात मंदिराचे ऑफिस असून वरच्या मंडपात गर्दीच्या वेळी पुजारी हे भाविकांकडून पूजा, अभिषेक इत्यादी धार्मिक विधी करवून घेतात.
मंदिरासमोरच्या प्रमुख दगडी मंडपात एका मोठ्या दगडात कोरलेला आकर्षक नंदी आहे. मंडपाच्या बाजूला अन्नपूर्णा मातेचे मंदिर आहे. येथे भगवान शंकर सुंदर शिवलिंग स्वरूपात पहायला मिळतात. इतर पंचरामा क्षेत्राच्या तुलनेत येथील शिवलिंग आकाराने लहान आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग अमावस्येच्या दिवशी काळपट रंगाचे तर शुक्ल पक्षांत पौर्णिमेला चक्क उजळून निघते. आजही हा चमत्कार याची देही याची डोळा पाहण्यासाठी भाविक गर्दी करतात.
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे येथे भगवान शंकरांच्या मंदिरावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. देशात अशा प्रकारे शिव मंदिरावर कोठेही अन्नपूर्णा मातेची मूर्ती पहायला मिळत नाही. विशेष म्हणजे, अन्नपूर्णा मातेच्या गळ्यात पवित्र धागा आहे. तिच्या चरणाशी लहान बाळाची देखील प्रतिम आहे.
साक्षात चंद्राने येथे शिवलिंगाची स्थापना केल्यामुळे येथे भगवान शंकराला सोमेश्वर स्वामी म्हणतात. प्रमुख गर्भगृहाच्या दक्षिणेला आदिशक्ती मातेचे मंदिर आहे. याठिकाणी दोन मजली भव्य सभागृहात विवाह विधी संपन्न होतात. मंदिराच्या पूर्वेकडील पुष्करणीला ‘सोमागुंडम’ म्हणतात. मंदिरांत अंजनेय स्वामी, कुमारस्वामी, नवग्रह, सूर्य आणि श्रीगणेश यांच्या मूर्ती आहेत. मुख्य प्रवेशव्दारासमोर १५ फूट उंचीचा दगडी स्तंभ आणि बाराही महिने उमललेल्या कमळांनी बहरलेला विशाल चंद्रकुंडम तलाव आहे.
उत्सव
येथे महाशिवरात्री आणि सरन्नावराथ्री हे उत्सव साजरे केले जातात. भिमावरम येथील सोमरामा स्वामींचा रथोत्सव पाहिल्यावर जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेची आठवण येते. सोमरामा स्वामींचा रथ लाकडी असून तो सुमारे चाळीस फूटापेक्षा उंच आहे. यात्रेच्या वेळी विविध प्रकारच्या वनस्पती व पाना-फुलांनी सजविलेला असतो. रथ ओढण्यासाठी लांबच लांब नाड़े -दोरखंड रथाला जोडलेले असतात. हजारो भाविक हा रथ आपल्या हातांनी ओढ़तात. तर हजारो भाविक रथाच्या मागेही नाडे पकडून रथाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. वाटेत येणाऱ्या विजेच्या तारा किंवा इतर अडथळे दूर करण्यासाठी रथाच्या शिखरावर प्रत्येक पाच-सहा फूट उंचीवर ५ ते ६ सेवक उभे असतात. यावरून रथाच्या भव्यतेची कल्पना येते. अक्षरश: यावेळी रथाभोवती लाखो भाविक उपस्थित असतात. भगवान शंकराचा जयजयकार करीत सोमेश्वर स्वामींच्या रथाची मिरवणूक काढतात. हा रथोत्सव पाहून जग्न्नाथाच्या रथ यात्रेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कसे जावे
विजयवाडा आणि इलुरू येथून भिमावरमला जाण्यासाठी नियमित बसेस आहेत. भिमावरम पासून २ किमी अंतरावर सोमेश्वर स्वामी मंदिर आहे. भीमावरम येथे लहानसे रेल्वे स्टेशन आहे. पण एक्सप्रेस गाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेने जाण्यापेक्षा विजयवाडा किंवा इलुरू येथून बसने किंवा खाजगी गाडीने जाणे अधिक सोईचे होते.