इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी
शिमल्याचा १०८ फूट उंच जाखू हनुमान!
हिमाचल प्रदेशातील शिमला केवळ थंड हवेचे ठिकाण किंवा इंग्रजांची उन्हाळी राजधानी म्हनुनच प्रसिद्ध आहे असे नाही तर हनुमान मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून हिमाचल परदेशांत शिमल्याचा जाखू हनुमान प्रसिद्ध आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा हा हनुमान अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता आणि जवाई निखिल नंदा यांना देखील पावला आहे त्यामुळेच त्यांनी शिमला येथे जगातील सर्वांत उंच हनुमान स्थापन केला आहे. आज आपण शिमल्याच्या सुप्रसिद्ध जाखू हनुमाना विषयी जाणून घेणार आहोत.
हिमाचल प्रदेशातील शिमला हे गाव इथले निसर्गसौंदर्य आणि प्रदुषण मुक्त थंड हवेसाठी देशांत प्रसिद्ध आहे. इंग्रज तर शिमल्यावर एवढे खुश होते की ते दरवर्षी उन्हाळ्यात आपली राजधानी शिमला येथे हलवायचे. आजही देशातील पर्यटनात शिमल्याचं नाव अग्रभागी आहे. शिमल्याचा निसर्ग, शिमल्याची थंड हवा आणि राजेश खन्नाच्या ‘मेरे सपनो की रानी’ या गाण्यातल्या मिनी ट्रेन प्रमाणेच शिमल्याचा जाखू हनुमान देखील सुप्रसिद्ध आहे.
शिमल्याच्या भोवती सात उंच उंच टेकड्या आहेत. निसर्गाने अगदी मुक्त हाताने या सातही टेकड्यावर सौंदर्याची उधळण केली आहे. या सात टेकड्यात जाखू हिल ही टेकडी सर्वांत उंच आहे. समुद्र सपाटी पासून ८८०० फूट उंचीवर असलेल्या जाखू हिलवर ह्नुमानाचे प्राचीन मंदिर आहे. इ.स. २०१० पर्यंत शिमल्याचा जाखू हनुमान हिमाचल प्रदेशा पुरता मर्यादित होता. या मंदिर परिसरातच १०८ फूट उंचीची हनुमान मुर्ती स्थापना करण्यात आली आहे. या विशालकाय हनुमान मूर्ती मुळे इतके दिवस हिमाचल प्रदेशातील भाविकापुरता मर्यादित असलेला जाखू हनुमान देशांतीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकामध्ये देखील प्रसिद्ध झाला आहे.
हनुमानाच्या या १०८ फूट उंचीच्या मूर्तीच्या स्थापनेसाठी समुद्र सपाटी पासून ८८०० फूट उंचीवर असलेल्या जाखू हिलवर पाया घेण्याचे काम २००८ मध्ये सुरु करण्यात आले ते काम २०१० मध्ये पूर्ण झाले.त्याच वर्षी अभिषेक बच्चन,त्याची बहिण श्वेता नंदा, तिचे पती निखिल नंदा आणि हिमाचल प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमाल यांच्या हस्ते जाखू हिलवरील जगातल्या सर्वांत उंच हनुमान मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले.
१०८ फूट उंचीची ही हनुमान मूर्ती शिमल्याच्या कोणत्याही भागातून नजरेस पड़ते. विशेष म्हणजे ब्राझिल येथील ख्रिस्त द रेदिमर या विश्व प्रसिद्ध पुतळयापेक्षाही जाखू हनुमान उंच आहे.ख्रिस्ताचा पुतळा ९८ फूट उंच आहे तर जाखू हनुमान १०८ फूट उंच आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला हे शहर हिरवागार निसर्ग आणि उंच उंच वृक्षासाठी प्रसिद्ध आहे. अशा या उंच उंच झाडांच्या परिसरांत १०८ फूट उंची चा हनुमान उठून दिसतो हेच एक आश्चर्य म्हणता येईल.
जाखू हनुमान कुणी तयार केला?
शिमला येथील हनुमान मूर्ती भारतातल्या सर्वांत मोठ्या ओरल केअर प्रोडक्ट बनविणारया जे एच एस श्वेंगार्ड लेबोरेटरीज आणि सुप्रसिद्ध उद्योगपती एच सी नंदा ट्रस्ट यांनी तयार केली आहे. हनुमानाची ही मूर्ती कांक्रिट पासून तयार करण्यात आली असून त्यासाठी दिड कोटी रूपये खर्च आला आहे, मूर्तीच्या स्थापने नंतर हा सगळा परिसर पर्यटकासाठी अत्यंत आकर्षकपणे विकसित करण्यात आला आहे. या मंदिरात जाण्यासाठी पूर्वी पासून २०० पायर्या आहेत.बस, टैक्सी, घोडा या साधनांनी तर येथे पोहचता येतेच परंतु येते शिमला आणि जाखू हिल यांना जोडणारी एरियल लिफ्ट हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. थोडक्यात सांगायचे तर शिमल्याच्या आकर्षणात १०८ फूट उंचीच्या जाखू हनुमानाची भरच पडली आहे.
Column Rauli Mandiri Shimla 108 feet Jakhu Hanuman by Vijay Golesar