चार धामातील रामेश्वरम दक्षिण भारतात तमिलनाडुतील रामनाथपुरम जिल्ह्यात आहे. येथील शिवलिंगाचा बाराज्योतिर्लिंगातही समावेश होतो. हिंदी महासागर आणि बंगालची खाड़ी यांनी घेरलेल हे एक स्वतंत्र परन्तु निसर्ग संपन्न शंखाकृती बेटच आहे. हिंदूधर्मियांना काशी किंवा वाराणशी जेवढी पवित्र वाटते तेवढेच महत्व रामेश्वमलाही दिले जाते. म्हणुनच तर रामेश्वमला दक्षिण काशी म्हणतात.
दोन शिवलिंगाची कथा
रावणाशी युद्ध करून आल्या नंतर ब्रह्महत्त्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी श्रीरामाने सीता व् लक्ष्मणासह शिवाची पूजा करण्याचे ठरविले. रावण हा विश्रवा याचा मुलगा आणि ब्रह्माचा नातू होता. रावणाला मारल्याने रामाला ब्रम्ह्मह्त्त्येचे पातक लागले होते. शिवपूजेसाठी योग्य तो मुहूर्तही शोधण्यात आला. पूजेसाठी आवश्यक असणारे शिवलिंग हिमालयातील कैलासावरून आणण्याची जबाबदारी अन्जनेयावर सोपविण्यात आली. अंजनेय शिवलिंग आणायला कैलासकडे गेला. पण जसजसा मुहूर्त जवळ येऊ लागला तशी सितामाईने वाळूचे शिवलिंग बनवून त्याचीच श्रीराम,सीता व लक्ष्मणाने पूजा केली. पूजा झाल्यानंतर हनुमान कैलासावरून शिवलिंग घेउन आला. त्यामुळे रामेश्वमला गाभार्यात आजही दोन शिवलिंग पहायला मिळतात. हनुमानाने आणलेल्या शिवलिंगाचे त्याला ‘विश्वलिंग’ म्हणतात. दर्शन घेतल्या नंतर सितेने बनविलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्याची प्रथा येथे आहे.
असे आहे मंदिर
रामेश्वरम आणि इथला रामसेतू अतिप्राचीन असले तरी इथली मंदिरं दिड-दोन हजार वर्षांपूर्वीची आहेत. रामनाथमंदिर सुमारे आठशे वर्षांपूर्वी बांधलेले आहे. रामेश्वरम येथील दगडी कॉरिडोर (गॅलरी) जगातली सर्वांत लांब कॉरिडोर (गॅलरी) आहे. मंदिराची उत्तर दक्षिण लांबी १९७ मीटर, पूर्व-पश्चिम लांबी १३३ मीटर आहे.इथल्या प्रकारची रुंदी ६ मीटर तर ऊँची ९ मीटर आहे.मंदिराच्या प्रवेशद्वारा वरील गोपुरम ३८.४ मीटर उंच आहे.सुमारे सहा हेक्टर जागेवर मंदिर उभारलेलं आहे.
मंदिराच्या विशालाक्षी गर्भगृहाजवळ लंकाधिपति बिभीषनाने स्थापन केलेली ९ ज्योतिर्लिंग आहेत.रामनाथ मंदिरातील ताम्रपत्रावरून इ.स. ११७३ साली श्रीलंकेचा राजा पराक्रम बाहुले याने मूळ लिंग असलेल्या गर्भग्रुहाची निर्मिती केली. त्यावेळी या गर्भगृहांत एकट्या शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे या मंदिराला नि:संगेश्वराचं मंदिर म्हणत असत.
शिल्पकलेचा सुंदर नमुना
रामेश्वरमचं मंदिर भारतीय निर्माण कला आणि शिल्पकला यांचा सुंदर नमूना आहे. रामेश्वरम् येथील मंदिर दगडी असून सुमारे एक हजार खांबावर ते आधारलेले आहे.मंदिराचे प्रवेशव्दार ४० फूट उंच आहे. मंदिर प्राकारांत एक हजार विशाल कोरीव कलाकुसर काम केलेले खांब आहेत. दुरून हे खांब एकसारखे असल्याचे दिसते परन्तु बारकाईने निरिक्षण केल्यावर प्रत्येक खांबावरील कलाकुसर वेगवेगळी असल्याचे लक्षांत येते. परदेशी पर्यटक तर खास या खांबांचा अभ्यास व् निरिक्षण करण्यासाठी येथे येतात. येथे २४ कुंड असून या सर्व कुंडातील पाण्यात स्नान केल्या नंतर शिवलिंगाचे दर्शन घेतले जाते. अनेक मंदिरं येथे पहायला मिळतात.
अन्य प्रेक्षणीय स्थाने
रामनाथस्वामी मंदिर हे इथले प्रमुख मंदिर आहे. त्याच प्रमाणे अग्नितीर्थम, कोथान धर्मस्वामी मंदिर, जटातीर्थम, पंचमुखी हनुमान, धनुष्यकोढ़ी मंदिर, रामतीर्थम, जटायु तीर्थम, गंधमादन पर्वतम, लक्ष्मण तीर्थम, विल्लन्धी तीर्थम, हनुमान मंदिर, नम्बू नयागिअम्मन मंदिर ही पौराणिक मंदिरं प्रेक्षणीय आहेत.
समुद्रावरील सर्वांत लांब पूल
रामेश्वमचं वैशिष्ट्य म्हणजे इथला अन्नाई इंदिरागांधी रोड ब्रिज! हा सुमारे ४ किमी. लांबीचा समुद्रावर बांधलेला पुल. रामेश्वमला जातांना आणि परत येतांना पहायला मिळतो. प्रवासी आपल्या गाड्या थांबवून या पुलावर उतरतात. रामाने तर हजारो वर्षांपूर्वी कोणतीही साधनं नसतांना केवळ वानरांच्या मदतीने समुद्रावर पुल बांधला होता असे म्हणतात. पण रामेश्वरमचा सध्या वापरात असलेला हा मानवनिर्मित पुल पाहून खालून समुद्रातून मोठ-मोठी जहाजं जा-ये करतात. तसेच मंडपमला येणारी रेल्वे देखील याच समुद्रातील दुसर्या पुलावरून दिसते.
कसं जावं
रामेश्वमला विमानाने जाण्यासाठी जवळचं विमानतळ मदुरै येथे १६३ किमी वर आहे. रेल्वेने मंडपम हे रामेश्वमपासून २ किमी वर असलेले रेल्वे स्टेशन चैनई, कोइमतुर, मदुरै,तंजावूर आणि त्रिचिला रेल्वे मार्गाने जोडलेली आहेत. शहरं त्याच प्रमाणे तामिळनाडूतील कन्याकुमारी, मदुरै, त्रिची आणि तंजावूर ही शहरं रामेश्वमशी बस मार्गानेही जोडलेली आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!