गुलशन कुमार निर्मित
नागेश्वरची ८५ फूटी शिवमूर्ती!
‘जगातील सर्वांत मोठ्या शिवमूर्ति’ ही लेखमाला इंडिया दर्पणच्या वाचकांच्या पसंतीस पड़त आहे. याविषयी आपण ज्या अनेक प्रतिक्रिया पाठवित आहात याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपल्या देशांत महादेवाच्या मंदिरांची परंपरा अतिशय प्राचीन आहे. केदारनाथ पासून रामेश्वरम पर्यंत अनेक मोठी पवित्र शिव मंदिरं सर्वांना माहित आहेत. परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षांत देशांत अनेक ठिकाणी भगवान शंकरांच्या मोठ मोठ्या मूर्ती तयार होत आहेत.या मुर्तींचीही अनेक वैशिष्ट्य आहेत आणि या मुर्तींचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पर्यटक आवर्जून जातात.
आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेली ही आधुनिक श्रद्धास्थानं भाविकांच्या मनांत घरं करीत आहेत. पूर्वीची मंदिरं राजे महाराजे बांधत असत.हल्लीची ही पूजनीय स्थानं आपल्या सारखी सामान्य माणसं तयार करतात.आज २९-३० वर्षांचे वय असलेल्या ‘देवदाथन’ नावाच्या केरळी युवकाने केरळ मधील सर्वांत उंच भगवान शंकराची मूर्ती तयार केली आहे. शिल्पकलेचा गंध नसतांना, घरातल्या सात पिढ्यात कुणी साधा मातीचा गणपती सुद्धा बनविला नसेल अशा घरातील मुलाने चक्कं जगभर फेमस होईल अशी शिवाची दगडी मूर्ती तयार केली. त्यांची श्रद्धा आणि चिकाटी यांची ही प्रेरणादायी प्रतिकं आहेत.
बंगलुरु येथील ‘शिवोहम शिव’ मूर्ती पाहून प्रेरित झालेल्या जबलपुरच्या अरुण कुमार तिवारी या बांधकाम व्यावसायिकाने जबलपुर येथे ‘कचनार सिटी महादेवाची’ 76 फूट उंचीची मूर्ती तयार करवून घेतली .त्यासाठी त्यांना किती यातायात करावी लागली. त्यांच्या श्रद्धेचे आणि चिकाटीचे ‘इंडिया दर्पण’च्या चोखंदळ वाचकांनी कौतुक केले. ‘इंडिया दर्पण’ मराठीत सर्व प्रथम या आधुनिक श्रद्धा स्थानांची माहिती देणारी लेख मालिका सादर करीत आहे. वाचकांना ही लेखमाला आवडत आहे हे वाचकांच्या प्रतिक्रियांवरून समजते. वाचकांच्या प्रतिक्रिया या लेखकाचे टॉनिक असते. आपल्या प्रतिक्रियांचे आम्ही मनापासून स्वागत करतो.

मो. ९४२२७६५२२७
दहावे ज्योतिर्लिंग नागेश्वर
आज आपण जाणार आहोत गुजरात मधील नागेश्वर येथील शिव मंदिरांत. बारा ज्योतिर्लिंगातील दोन ज्योतिर्लिंग गुजरात मध्ये आहेत. ज्योतिर्लिंगांच्या सुप्रसिद्ध श्लोकातील पाहिले ‘सोमनाथ’ आणि दहावे ‘नागेश्वर’ ही दोन ज्योतिर्लिंगे गुजरातमध्ये आहेत. शिवभक्तांना ही दोन्ही ज्योतिर्लिंग सारखीच पूजनीय असली तरी आज आपण ‘जगातील सर्वांत मोठ्या शिवमूर्ती!’ या विशेष मालिकेत नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्व जाणून घेणार आहोत. याचे कारण म्हणजे देशांतील सर्वांत उंच शिवमुर्तींमध्ये समाविष्ट असलेली २५ मीटर म्हणजेच ८२ फूट उंचीची महादेवाची मूर्ती येथे स्थापन करण्यात आलेली आहे.
टी-सेरिज या कॅसेट कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्या मुळे’ वैष्णो देवी’ या स्थानाला देशभर प्रसिद्धी मिळाली हे सर्वज्ञात आहे. पण याच गुलशन कुमार यांच्या भरघोस देणगीतून गुजरात मधील नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि मंदिराच्या प्रांगणात देशातील सर्वांत मोठी शिव मूर्ती देखील तयार करण्यात आली हे अनेकांना माहित नाही.
द्वारका धामची यात्रा करणारा प्रत्येक भाविक नागेश्वरला जातोच.याचे कारण म्हणजे द्वारके हुन बेट द्वारका येथे जातांना याच वाटेवर नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे.
विशेष म्हणजे लांबूनच भगवान शिवाची मूर्ती दिसते आणि भाविकाला कधी एकदा या ठिकाणी पोहचतो असे होते. पौराणिक काळात मंदिर परिसर ‘दारुकावन’ या नावानेही प्रसिद्ध होता. नागेश्वर येथील भगवान शंकरांचे मंदिरही अतिशय भव्य आणि लाल पांढरया रंगांनी रंगविलेले असून आकर्षक दिसते. मंदिराच्या प्रांगणात भगवान शंकरांची ८२ फूट उंचीची विशाल शिवमूर्ति आहे. या स्थानाचे विशेष म्हणजे टी-सेरिज या सुप्रसिद्ध संगीत कंपनीचे मालक गुलशन कुमार यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून या मंदिराचे नुतनीकरण करण्यात आले.
गुलशन कुमार जेंव्हा प्रथम येथे आले तेंव्हा या ज्योतिलिंग क्षेत्राची विपन्न अवस्था त्यांना पहावली नाही. सोरटी सोमनाथ आणि नागेश्वर या दोन्ही ज्योतिर्लिंगांना गुलशन कुमार यांनी तीन कोटी रूपये देणगी दिले असे म्हणतात. याविषयी अधिकृत माहिती मात्र कोठेही मिळत नाही. मात्र नागेश्वर मंदिराच्या आवारात प्रवेश करताच गुलशन कुमार यांचा मोठा फोटो पहायला मिळतो. येथील पुजारी आणि व्यवस्थापक मात्र याविषयी काही सांगत नाहीत. फक्त ‘गुलशन कुमारजीने मंदिरको डोनेशन दिया’ एवढंच ते सांगतात.
ज्योतिर्लिंगा विषयी पौराणिक कथा
मंदिराच्या माहिती पत्रकांत आणि संकेत स्थळावर या ज्योतिर्लिंगा विषयी पौराणिक कथा सांगितली जाते.
नागेश्वर येथील ज्योतिर्लिंग कसे अवतीर्ण झाले या विषयी ‘रूद्र संहिते’ मध्ये एक कथा सांगितली आहे. फार पूर्वी येथील वनांत दारुका नावाचा असुर रहत होता. शिव भक्तांना तो अतोनात त्रास देत असे. एकदा सुप्रिय नावाचा वैश्य शिवभक्त नावेत बसून तीर्थ यात्रेला जात असतांना ‘दारुका’ने त्याला व त्याच्या सोबतच्या लोकांना बंदी बनवून तुरुंगात टाकले.
तेथून सुटकेचा मार्ग दिसेनासा झाल्यावर सुप्रियने आपल्या साथीदारांसह ‘ॐ नमो शिवाय’ या मंत्राचा जप सुरु केला. यामुळे क्रोधित झालेल्या ‘दारुका’नं त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु भगवान शंकरांनी शिवलिंग स्वरूपात प्रकट होउन त्याचे रक्षण केले. तेव्हा पासून येथे ज्योतिर्लिंग स्वरूपातील शिवाची येथे नागेश्वर रुपांत पूजा केली जाते.
प्रवेशव्दारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला मंदिराचा मोठा सभामंडप लागतो. मंदिर अतिशय प्रशस्त, स्वच्छ आणि नीटनेटके आहे. सर्वत्र टाइल्स आणि स्टीलच्या बैरीकेड लावलेल्या आहेत.सर्व प्रथम नंदीचे आणि त्याच्या अगदी समोरच शिवलिंगाचे दर्शन होते.
येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंगदर्शनाने सर्व प्रकारच्या विष बाधेपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. जे भाविक या नागेश्वर शिवलिंगाची प्रार्थना करतात ते विष मुक्त होतात असे म्हणतात. येथील शिवलिंग ‘द्वारका शिला’ नावाच्या विख्यात दगडा पासून तयार करण्यात आले आहे. या शिवलिंगावर लहान लहान चक्र आहेत.या शिवलिंगाचा आकार अंडाकृती त्रिमुखी रुद्राक्षा सारखा आहे. जो या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून या ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती आणि महात्म्य वाचतो किंवा जाणून घेतो तो शेवटी सर्व भौतिक सुखांचा त्याग करून शिव लोकांत जातो असे शिव पुराणांत सांगितले आहे.
शिवलिंग दक्षिणेला तर ‘गोमुगम’ पूर्वेला
नागेश्वर येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग दक्षिण मुखी आहे आणि ‘गोमुगम’ म्हणजे शिवलिंगाला अभिषेक केल्या नंतर त्यावरील पाणी बाहेर निघून जाण्याची जागा.तर येथे ‘गोमुगम’ पूर्वेला आहे. याबाबत येथे एक कथा सांगितली जाते.नामदेव नावाचा एक भक्त शिवा समोर भजन करीत होता. अन्य काही भाविकांनी त्याला देवा समोरून बाजूला उभं रहायला सांगितलं.नामदेव म्हणला मला अशी जागा दाखवा जिथे भगवान नाही. रागावलेल्या लोकांनी त्याला दक्षिणे कड़े उभं रहायला सांगितलं. नामदेव दक्षिणेला उभं राहून भजन म्हणू लागला.थोड्या वेळात सर्वांना दिसले की,शिवलिंग आता दक्षिणेला होतं आणि गोमुगमचं तोंड पूर्वेला होतं.
मंदिर उंचावर शिवलिंग खाली
सभामंडपा पासून मंदिराचे गर्भगृह बरच खाली आहे. अनेक पायर्या उतरून गर्भगृहांत जावे लागते. पूर्वी मंदिर लहान होतं. त्याचे नुतनीकरण करतांना पूर्वीचे शिवलिंग जसे आहे तसे ठेवून त्याच्या भोवती मंदिर बांधले आहे. त्यामुळे येथील शिवलिंग खाली आहे. त्याची भर येथील सर्वांत उंच शिव मूर्तीने भरून काढली आहे.
गुजरात मधील सर्वांत उंच शिवमूर्ती
८२ फूट उंचीची येथील शिवमूर्ति अतिशय आकर्षक आहे. येथे भगवान शंकर पद्मासनात बसलेले आहेत. शिवाच्या मागील उजव्या बाजुच्या हातांत त्रिशूल तर डाव्या बाजुच्या हातांत डमरू आहे. मूर्ती चतुर्भुज असून चारही दंडांना नागबंध आहेत. पुढच्या उजवा हात अभय मुद्रेत आहे.तर डाव्या हातांत जपमाळ धारण केलेली आहे. भगवान शिवाच्या गळ्यात नाग आणि रुद्राक्ष माला आहेत. डोक्या वरील जटावर चंद्र आणि गंगा विराजमान आहेत. ही शिवमूर्ति अतिशय प्रसन्न असून तिचे दर्शन होताच मन प्रसन्न होते.
कसे जावे:
नागेश्वर शिव मंदिर सकाळी ६ ते दुपारी १२.३० आणि सायंकाली ५ ते रात्री ९.३० पर्यंत खुले असते. द्वारका पासून हे मंदिर १६ किमी अंतरावर आहे. बेट द्वारकेला जाताना नागेश्वर शिव मंदिराचे दर्शन घेतले जाते.