अक्षय्यतृतीयेला मध्यमहेश्वर मंदिर उघडल्यावर उखीमठातून भगवान शंकराच्या मूर्ती विधिवत पूजा करून एका सुशोभित डोलीतून किंवा पालखीतून मुख्य मंदिरांत आणतात. यावेळी देवाच्या पूजेच्या सर्व लहान-मोठ्या वस्तू मंदिरासमोरच्या आंगणांत मांडून ठेवतात. डोली तिरपी करून या सर्व वस्तू देवाला दाखवितात. एखादी वस्तू राहिली असेल तर पुजारी ती आणून ठेवतात. सर्व वस्तू मांडल्यानंतर व देवाने पहिल्या नंतरच देवाची डोली मंदिरांत जाते.
पंचकेदार मधील मध्यमहेश्वर नावाचे सुप्रसिद्ध शिवमंदिर हिमालयातील गढ़वाल प्रांतात हिमालयातील बर्फाच्छादित पर्वत रांगांमध्ये समुद्रसपाटी पासून ३४९० मीटर उंचीवर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात बांधलेले मूळ शिव मंदिर पांडवानी बांधलेले आहे असे म्हणतात. मध्यमहेश्वराचे हे मंदिर पांडवांनी या ठिकाणी का बांधले या विषयी एक आख्यायिका सांगितली जाते. महाभारत युद्धानंतर आपल्या चुलत भावांची हत्या आपल्या हातून झाल्यामुळे पांडवांना अपराधी वाटत होते.या भावनेतुन बाहेर पडण्यासाठी वेदव्यासांनी त्यांना भगवान शंकराचे दर्शन घेण्यास सांगितले. त्यानुसार पांडव भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी काशीला गेले. तेथे त्यांना भगवान शंकराचे दर्शन झाले नाही कारण कुरुक्षेत्रातील महायुद्धामुळे भगवान शंकर पांडवावर नाराज झाले होते.
गुप्त काशीत जावून ते गुप्त झाले त्यांनी एका रेड्याचे रूप घेतले आणि अनेक जनावरांमध्ये मिसळून गेले. पांडवांनीही जिद्द सोडली नाही. रेड्याच्या रुपात भगवान शंकरांनी पाण्डवानां ‘केदारनाथ’, ‘मध्यमहेश्वर’, ‘रुद्रनाथ’, ’तुंगनाथ’ आणि ‘कल्पेश्वर’ येथे दर्शन दिले. या सर्व ठिकाणी पांडवानी भगवान शिवाची पूजा केली व या पांच ठिकाणी पांडवानी मंदिरं बांधली तेच हे पंचकेदार.
अवघड पाऊलवाट
हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये समुद्रसपाटी पासून सुमारे बारा ते चौदा हजार फूट उंचीवर मध्यमहेश्वर मंदिर आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ यांच्या मधल्या वाटेवर मध्यमहेश्वर आहे. ॠषिकेष पासून १८१ किमी अंतरावर उखीमठ आहे. उखीमठ पासून जवळच उन्नाव नावाचे छोटेसे गाव आहे येथून २१ किमीचा डोंगर रस्ता चढून मध्यमहेश्वर येथे जाता येते. मध्यमहेश्वर मार्गावर ‘गौधर’ आणि ‘कालीमठ’ ही दोन महत्वाची स्थानं आहेत. आत्मिक शांति मिळविण्यासाठी यात्रेकरू कालीमठ येथे येतात. या स्थानाला ‘सिद्धपीठ’ म्हणतात. महाकाली आणि महालक्ष्मी देवी मंदिरांसाठी कालीमठ प्रसिद्ध आहे. घनदाट अरण्यात वसलेल्या या सिद्धपीठांत नवरात्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी होते.
डोंगरातील पायी चालण्याचे शेवटचे गाव म्हणजे गौधर किंवा गौण्डार. इथपर्यंत सरळ उतार आहे. घनदाट जंगलातून इथवर येण्यासाठी पायवाटा आहेत. येथील मंदिराजवळ मध्यमहेश्वरगंगा आणि मार्कगंगा या नद्यांचा संगम आहे. रांसी गाव आणि गौधरच्या मधल्या जंगलातील डोंगरावरुन अनेक झरे वाहताना दिसतात. गौण्डार पासून दीड किमीवर चढ़ाई चढून आल्यावर खटार चट्टी येते.’चट्टी’ म्हणजे यात्रेकरुना थांबण्याचे ठिकाण. येथून ७ किमी वर आहे मध्यमहेश्वर. येथून थोडं पुढे गेल्यावर येते – नानूचट्टी. येथून पुढचा थांबा म्हणजे कुनचट्टी. यानंतर रस्ता दाट जंगलातून जातो. हे जंगल संपल्यावर अर्धा किमी अंतरावर दिसू लागते मध्यमहेश्वर मंदिर.
उत्तर भारतीय शैलीचे भव्य दगडी मंदिर
पहाडातील हिरव्यागार मैदानात उत्तराखंडात सर्वत्र आढळणाऱ्या वास्तुकला शैलीतील साधारण केदारनाथ मंदिरा सारखे दिसणारे काळसर दगडांचे शिवमंदिर आहे. याठिकाणी पांडवांना भगवान शंकरांनी बैलाच्या रूपातील पोट आणि नाभीचे दर्शन झाले होते. त्यामुळे या मंदिरांत काळया पाषाणातून घडविलेले नाभीच्या आकाराचे शिवलिंग स्थापन केलेले आहे. येथे दोन तीर्थ आहेत. एक शिव पार्वतीसाठी तर दुसरे अर्धनारीनटेश्वरासाठी. शिवपिंडी प्रमाणेच अर्धनारीनटेश्वराची मूर्ती येथे पुजली जाते. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला सरस्वती देवीची संगमरवरी मूर्ती आहे.
देव आपल्या सगळ्या वस्तू चेक करतो!
हिमालयातील इतर पंचकेदार मंदिराप्रमाणेच मध्यमहेश्वर मंदिर मे महिन्यात उघडते आणि हिवाळयात नोव्हेंबर अखेर बंद केले जाते. हिवाळयात मध्यमहेश्वर येथील शिवमूर्ती उखीमठ येथील मंदिरांत स्थानान्तरीत केल्या जातात. सहा महिन्यानंतर अक्षय्यतृतीयेला मंदिर उघडल्यावर उखीमठातून भगवान शंकराच्या मूर्ती विधिवत पूजा करून एका सुशोभित डोलीतून किंवा पालखीतून मुख्य मंदिरांत आणतात. यावेळी देवाच्या पूजेच्या सर्व वस्तू, आरती व धुपारतीच्या वस्तू, घंटा, निरंजने, प्रसादालयातील धातूची व मातीची सर्व भांडी व लहान-मोठ्या वस्तू मंदिरासमोरच्या आंगणांत मांडून ठेवतात.
डोली तिरपी करून या सर्व वस्तू देवाला दाखवितात. एखादी वस्तू राहिली असेल तर पुजारी ती आणून ठेवतात. सर्व वस्तू मांडल्यानंतर व देवाने पहिल्या नंतरच देवाची डोली मंदिरांत जाते. हा एक पहाण्यासारखा विधि असतो. डोली मंदिरांत आल्या नंतर मुख्य शिवलिंगाची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतरच भाविकांना व यात्रेकरुंना दर्शन घेता येते.
दक्षिण भारतीय लिंगायत पुजारी
मध्यमहेश्वर येथील पुजारी केदारनाथ मंदिरांच्या पुजर्यांप्रमाणेच दक्षिण भारतातील लिंगायत समाजाचे असतात. विशेष विधि करुनच या पुजार्यांची नियुक्ती केली जाते. पंचकेदार मधील रुद्रनाथ, तुंगनाथ आणि कल्पेश्वर येथे मात्र स्थानिक ब्राह्मण पुजारी मंदिरातील देवांची पूजा करतात.
मनोकामना पूर्ती
मध्यमहेश्वर येथे भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात. विशेषत: संतति प्राप्तीसाठी भगवान शिवाला साकडे घालणारया भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात असे अनेकांचे अनुभव आहेत.
मंदिर परिसरांत ‘शनि-शिळा’ नावाची निळसर रंगाची शिला आहे. या शनीशिलेचे दर्शन घेतल्यास शनिदशा टळते अशी मान्यता आहे. मंदिराचे मागे भैरवनाथ आणि क्षेत्रपाल यांची लहानशी मंदिरं आहेत. हे या ठिकाणचे पहारेकरी आहेत. या ठिकाणी भैरवनाथाची प्रत्येक कार्यासाठी पूजा करून परवानगी घेतली जाते.
कुंडातील औषधी पाणी
मंदिराजवळ एका पितळी गोमुखातून जलधारा पडतांना दिसते. पांडवांनी याठिकाणी तपश्चर्या करून गंगा येथे आणली. येथे अमृतकुंड नावाचे एक दगडी कुंड आहे. वर्षभर येथील पाणी जेवढे आहे तेवढेच रहते. ते कमी किंवा जास्त होत नाही. भाविक याच अमृतकुंडातील तीर्थ आपल्या घरी नेतात. त्वचा विकारांवर हे जल उपयुक्त ठरते असे म्हणतात.
अमृतकुंडा जवळच गौरी-शंकर मंदिर आहे. येथे गौरी आणि शंकर यांच्या पाषण मूर्ती आहेत. बाजूला शिवाची शक्ती असलेल्या पार्वतीचे लहानसे मंदिर आहे. माता भगवतीची विविध रूपं येथे पहायला मिळतात. एका खडकावर गाईचे पाऊल उमटलेले दिसते त्याला ‘गोखुर’ म्हणतात. मंदिराच्या उजवीकडे सरस्वती कुंड आहे. येथील पाणी देखील औषधी आहे. हा सगळा परिसर वनौषधींच्या झाडाझुडूपांनी बहरलेला आहे. त्यामुळे या झाडांच्या मुळांना स्पर्श करून येणारे पाणी औषधी गुणवत्ता घेउन येतात. त्यामुळे सरस्वती आणि अमृत या दोन्ही कुंडातील पाणी औषधी आहे.
बुढामध्यमहेश्वर
मध्यमहेश्वर मंदिरापासून दीड-दोन किमी. अंतरावर एक शिखर आहे. रस्ता कमी उताराचा आहे. वाटेत एकही झाड़ नाही. एक प्रकारचा बुग्याल म्हणजे गवताचे पठार आहे. या शिखराला बुढामध्यमहेश्वर म्हणतात. जसं जसं पुढे जावं तसे चौखंब्याचे दर्शन होते. वर गेल्यावर आपल्या लक्षांत येते आपण जगाच्या छतावर येउन पोहचलो आहोत. येथून सगळ्या परिसराचे विहंगम दृश्य पहायला मिळते. येथून हिमालयाच्या कुशीत दडलेली उखीमठ आणि गुप्तकाशी ही गावं दिसतात. आणि चौखंबा शिखर तर जणु हाताला लागेल इतके जवळ दिसते.
कसे जावे
दिल्ली, हरिद्वार,ॠषिकेष मार्गे रुद्रप्रयागला जावे. रुद्रप्रयाग पासून केदारनाथला जाणार्या मार्गावर गुप्तकाशीच्या थोडं अलिकडे ‘कुंड’ नावाचे ठिकाण येते. येथून उखीमठ साठी वेगळा रस्ता आहे. उखीमठ पासून ‘उनियाना’ किंवा ‘रांसी’ गावापर्यंत टँक्सी,जीप,बसेस मिळतात. रांसी हे बर्यापैकी मोठ्ठ गाव आहे. येथे निवासासाठी भरपूर लॉजेस उपलब्ध आहेत. इथवर रस्ता खूप चांगला आहे. रांसी पासून २३ किमी डोंगरावरील वाटेने पायी चढून मध्यमहेश्वर मंदिराजवळ जाता येते.
केव्हा जावे
साधारणपणे केदारनाथ मंदिरासोबतच मध्यमहेश्वर मंदिराची कपाटं उघडतात आणि केदारनाथाचे कपाट बंद झाल्यानंतर मध्यमहेश्वरचे कपाट बंद होते. त्यामुळे केदारनाथला जातांना मध्यमहेश्वरला सहज जाता येते. चारधाम यात्रा सीजन शिवाय मध्यमहेश्वरला जायचे असेल तर रुद्रप्रयाग या जिल्ह्याच्या ठिकाणावरून परवानगी घ्यावी लगते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!