श्री चालुक्य कुमाररामा भिमेश्वर मंदिर
(सोळा फूट उंचीचे पांढरेशुभ्र शिवलिंग!)
चालुक्य राजा भिमा याने हे मंदिर सर्वप्रथम बांधले म्हणून येथे शिवाला भिमेश्वर म्हणतात. मंदिरातील चालुक्य राजवटीतील आणि काकतीय राजवटीतील बांधकामातील फरक स्पष्टपणे दिसून येतो. तेराशे वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर द्राक्षराम मंदिराच्या तुलनेत आजही नवीन आणि आकर्षक दिसते. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत…
हिमालयातील शिवमंदिरांप्रमाणेच दक्षिण भारतातही भगवान शिवाची मोठमोठी देखणी मंदिरं आहेत. आंध्र प्रदेशातील पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील पंचरामा मंदिर उत्तरेतील पंचकेदार मंदिराप्रमाणेच भाविकात पूजनीय आहेत. गुंटूर जिल्ह्यातील अमरावती येथील अमरलिंगेश्वर स्वामी, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील द्राक्षराम येथील द्राक्षरामा मंदिर, पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पलकोल्लू येथील क्षीररामा मंदिर, तसेच भिमावरम येथील सोमरामा मंदिराप्रमाणेच पूर्व गोदावरी जिल्ह्यातील समळकोट येथील कुमारराम किंवा भिमेश्वर स्वामी मंदिराचा या पंचराम मंदिरांत समावेश होतो.
समळकोट पासून १ किमी अंतरावर पंचराम क्षेत्रातील पांचवे शिवमंदिर आहे. येथील शिवाला कुमाररामा किंवा भीमराम स्वामी म्हणतात.या मंदिरातील शिवलिंग लाईमस्टोन (चुनकळी) पासून घडविलेले आहे. शिवपिंडीचा मूळ बेस जमिनीवर असून पिंडीवरील शाळुंका १६ फूट उंच आहे. येथील शिवाची पिंड ग्राउंड फ्लोर पासून दुसऱ्या मजल्याच्या छतापर्यंत उंच असल्याने येथूनच भगवान शंकरांची रूद्रभग पूजा केली जाते. येथे शिव मंदिर का स्थापन करण्यात आले या विषयी स्कन्द पुराणातील एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते.
स्कन्ध पुराणातील आख्यायिका
तारकासुराने महादेवाची आराधना करून एक शिवलिंग मिळविले होते. ही शक्ती मिळाल्यावर त्याने तिन्ही लोकांत हाहाकार माजविला. तेव्हा त्याचा पाडाव करण्यासाठी कुमारस्वामी पुढे सरसावले. त्यांनी आपल्या शस्त्राने तारकासुराचे अनेक तुकडे केले. पण शिवलिंगाची शक्ती असल्यामुळे तारकासुर पुन्हा जोडला जाई व जिवंत होई. तेव्हा भगवान श्री नारायण स्वामी (भगवान विष्णु) प्रकटले. त्यांनी सांगितले तारकासुराच्या ताब्यातील शिवलिंगाचे तुकडे करुन त्यावर मंदिर बांधल्या नंतर तारकासुराचा वध केला तरच तो मृत्यू पावेल. कुमारस्वामींनी तसेच केले. त्याने तारकासुराच्या ताब्यातील शिवलिंगाचे आपल्या हातातील वज्राने पाच तुकडे केले. त्यावर इंद्र, सूर्य, चंद्र, विष्णू आणि कुमारस्वामी यांनी पाच भव्य मंदिरं बांधली. विष्णूने व सर्व देवांनी शिवाची पूजा केली. शिवाला प्रसन्न केले. त्यानंतर कुमारस्वामीने तारकासुराचा वध केला. पाच देवांनी भगवान शंकरांची जी मंदिरं बांधली तीच पंचरामा क्षेत्र या नावाने प्रसिद्ध आहेत.
समळकोट येथील कुमाररामा किंवा भिमेश्वर स्वामी मंदिरातील भगवान शंकरांच्या पिडीची स्थापना खुद्द कुमारस्वामी यांनी केली आहे.
मंदिराची वैशिष्ट्ये
पंचराम मंदिरांतील इतर चार मंदिराप्रमाणेच हे मंदिर देखील अतिशय भव्य आहे. मंदिराचा मुख्य सभामंडप विशाल असून तो शंभर दगडी खांबांवर आधारलेला आहे.प्रत्येक खांबांवर अतिशय देखणी व नाजूक कलाकुसर पहायला मिळते. दगडावरील हे कोरीव काम पाहून त्यावेळच्या कारागीरांचे कौतुक वाटते. मंदिरासमोर अखंड शिलेतून कोरलेला नंदी आहे. मंदिरासमोर एक तलाव असून त्यात कमळांची फुलं सदैव फुललेली असतात. हे मंदिर ऐतिहासिक आहे. चालुक्य राजवटीत इ. स. ८९२ साली या मंदिराच्या निर्मितीचा शुभारंभ झाला. इ. स. ९२२ मध्ये मंदिराची निर्मिती पूर्ण झाली. द्राक्षराम येथील द्राक्षरामा मंदिराप्रमाणेच हे मंदिर दिसते. परंतु इतर पंचराम मंदिरापेक्षा हे मंदिर वेगळेही आहे. येथील शिवलिंग १६ फूट उंच असून पांढरे शुभ्र आहे. येथे कालभैरव ही प्रमुख देवता आहे तसेच या मंदिरातील देवीला बालासुंदरी म्हणतात.
कुमाररामा मंदिर सुस्थितीत आहे. नवव्या शतकातील या मंदिराला आजही कुठेही तडा गेलेला नाही की मंदिराचा कुठला दगड निसटलेला नाही. त्यामुळेच नॅशनल हेरिटेज साईटमध्ये या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. द्राक्षराम मंदिराप्रमाणेच हे मंदिरही दोन मजली आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूंना दुमजली दगडी ओवऱ्या आहेत. विशेष म्हणजे या ओवऱ्यांच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याचा स्लॅब दगडी आहे. आधाराचे सर्व खांब दगडी असून प्रत्येक खांबावर कलाकुसर केलेली दिसते.
मंदिर द्रविडीयन पद्धतीने बांधलेले आहे. चालुक्य राजा भिमा याने हे मंदिर सर्वप्रथम बांधले म्हणून येथे शिवाला भिमेश्वर म्हणतात. यानंतर इ. स. १३४० ते १४६६ या कालखंडात काकतीय राज्यकर्ते मुसूनुरी नायक यांनी या मंदिरात अनेक सुधारणा केल्या. मंदिराचे अनेक खांब त्यांनी तयार करून बसविले. अतिशय सुरेख शिल्पकला असलेले खांब त्यांनी बनविलेले आजही पहायला मिळतात. मंदिरातील चालुक्य राजवटीतील आणि काकतीय राजवटीतील बांधकामातील फरक स्पष्टपणे दिसून येतो. तेराशे वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर द्राक्षराम मंदिराच्या तुलनेत आजही नवीन आणि आकर्षक दिसते. इ. स. ११४७ ते १४९४ या काळात सासना राजांच्या राज्यवटीत मंदिरांत अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यांच्या काळातील प्रत्येक खांबांवर शिलालेख कोरलेले दिसतात. काही वर्षांपूर्वी केलेल्या उत्खाननात सापडलेल्या अनेक दगडी मूर्ती, प्रतिमा, शिल्पे मंदिराच्या आतल्या प्राकारात जपून ठेवलेले पहायला मिळतात. त्याचप्रमाणे सर्व शक्तीपिठांतील देवता आणि ज्योतिर्लिंगयांचे दर्शन येथे होते.
उत्सव
दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी लाखो भाविक भगवान शिवाच्या दर्शनाला येतात. फेब्रुवारी-मार्च महिन्यांत माघ बहुला एकादशीला कल्याण महोत्सव साजरा केला जातो. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत येणाऱ्या कार्तिक-मार्गशीर्ष महिन्यात नित्य अभिषेक केला जातो. मंदिर सकाळी ६ ते १२ आणि दुपारी ४ ते ८ वाजेपर्यंत उघडे असते.
पंचराम दर्शन स्पेशल बसेस
आपल्याकडे जसे आषाढी एकादशीला पंढरपूर येथे स्पेशल बसेस सोडतात. तसे येथे आंध्र प्रदेश परिवहन मंडळाने (APSRTC) काकिनाडा बस डेपोतून पंचराम देवस्थान दर्शन विशेष बस सोडल्या जातात. दर रविवारी सकाळी ८ वाजता या स्पेशल बसेस काकिनाडा येथून सुटतात. अमरावती येथील अमरलिंगेश्वर, भीमावरम येथील सोमरामा, पलकोल्लू येथील क्षीररामा, द्राक्षराम येथील द्राक्षरामा आणि समळकोट येथील श्री चालुक्य कुमाररामा येथील शिव मंदिरांचे दर्शन घेऊन सुमारे ७०० किमीचा प्रवास होतो. दर माणशी ३५०/-रूपये भाडे असते. यात मंदिरातील प्रवेश पासेसचा देखील समावेश असतो. सध्या कोविड लॉकडाऊनमुळे ही योजना बंद आहे.
संपर्क : Shri Chalukya Kumararama Bhimeswara Swamy Temple, Jaggamma Garipeta, Samarlkota, Andhra Pradesh- 533440 (Mob. 08897205858)