क्षीररामा
(भगवान विष्णुंनी स्थापन केलेले शिवलिंग!)
पंचराम क्षेत्रातील चौथे शिव मंदिर म्हणजे क्षीरराम. भगवान विष्णुंनी हे शिवलिंग स्थापन केल्याची मान्यता आहे. मुख्य मंदिर १२० फूट उंच असून ९ मजली आहे. हे मंदिर श्रीवेलुपथी यांनी १० व्या शतकांत बांधले असून येथे भगवान शंकराला क्षीररामलिंगेश्वर स्वामी म्हणतात. येथील पांढऱ्या शुभ्र शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष भगवान विष्णुंनी केली आहे. त्यामुळे क्षीरराम येथे एक दिवस राहिल्यास वर्षभर काशीत राहिल्याचे पुण्य मिळते, असे सांगितले जाते. आंध्र प्रदेशात पंचरामक्षेत्र नावाने महादेवाची पांच मंदिरे सुप्रसिद्ध आहेत. येथे शिवमंदिरांची स्थापना कशी झाली, याविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका स्कंध पुराणात सांगितली आहे.
स्कंध पुराणातील आख्यायिका
तारकासुराने महादेवाची आराधना करून एक शिवलिंग मिळविले होते. ही शक्ती मिळाल्यावर त्याने तिन्ही लोकांत हाहाकार माजविला. तेव्हा त्याचा पाडाव करण्यासाठी कुमारस्वामी पुढे सरसावले. त्यांनी आपल्या शस्त्राने तारकासुराचे अनेक तुकडे केले. पण शिवलिंगाची शक्ती असल्यामुळे तारकासूर पुन्हा जोडला जाई आणि जिवंत होई. तेव्हा भगवान श्री नारायण स्वामी (भगवान विष्णू) प्रकटले. त्यांनी सांगितले की, तारकासुराच्या ताब्यातील शिवलिंगाचे तुकडे करुन त्यावर मंदिर बांधल्यानंतर तारकासुराचा वध केला तरच त्याचा मृत्यू होईल. कुमारस्वामींनी तसेच केले. त्याने तरकसुराच्या ताब्यातील शिवलिंगाचे आपल्या हातातील वज्राने पाच तुकडे केले. त्यावर इंद्र, सूर्य, चंद्र, विष्णू आणि कुमारस्वामी यांनी पाच भव्य मंदिरे बांधली. विष्णूसह सर्व देवांनी शिवाची पूजा केली. शिवाला प्रसन्न केले. त्यानंतर कुमारस्वामीने तारकासुराचा वध केला. पाच देवांनी भगवान शंकरांची जी मंदिरं बांधली तीच पंच रामा क्षेत्र या नावाने प्रसिद्ध आहेत.
तेलुगु भाषेची जन्मभूमी
पंचरामा क्षेत्रातील चौथे शिवमंदिर क्षीररामा नावाने प्रसिद्ध आहे. ते आंध्र प्रदेशांतील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात नरसापूर जवळ असलेल्या पलकोल्लू येथे आहे. पलकोल्लू हे गाव पलकोले किंवा पलकोल्लू या नावानेही प्रसिद्ध आहे. १ एप्रिल १९२० रोजी स्थापन झालेली आंध्र प्रदेशातील सर्वांत जुनी म्युनिसिपालिटी पलाकोल येथे आहे. पद्मश्री डॉ. अल्लू रामलिंगय्या आणि सुप्रसिद्ध फिल्मस्टार दासरी नारायण राव हे पलाकोलचेच. पलकोल्लू हे व्यापारी केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. पूर्वी या स्थानाला दुग्धोपरनपुरम उपमन्युपुरम क्षीरराम पुरम या नावाने संबोधित असत. नंतर त्याला पाला कोलानू म्हणजे दुधाचं तळं म्हणू लागले. भगवान शिवाची स्थानं असलेल्या श्रीशैलम, द्राक्ष रामम आणि कालेश्वरम या त्रिकोणी पट्ट्यात क्षीरराम लिंगेश्वर स्वामी मंदिर वसलं आहे. या पट्ट्यात लोक जी भाषा बोलतात ती तेलुगु. त्या अर्थाने तेलुगु देसमचा हा बालेकिल्लाच म्हणता येईल. कारण तेलुगु भाषेचा जन्मच या भागात झाला आहे.
सर्वात उंच शिव मंदिर
येथे भगवान शंकर क्षीररामलिंगेश्वर स्वामी या नावाने सर्वज्ञात आहेत. पंचराम क्षेत्रातील इतर चार शिवमंदिरं देखील आंध्र प्रदेशातच आहेत. यात भिमावरम येथील सोमरामा, द्राक्षरामम येथील द्राक्षराम , समळकोट येथील कुमारराम आणि अमरावती येथील अमरराम स्वामी या शिवमंदिरांचा समावेश होतो. क्षीरराम लिंगेश्वर स्वामी हे इथले प्रसिद्ध दैवत. या मंदिराचे ३६.६ मीटर उंचीचे अवाढव्य गोपूर लांबूनच नजरेस पडतं. क्षीररामाचे मुख्य मंदिर १२० फूट उंच असून ९ मजली आहे. मंदिराचे प्राकार श्रीवेलुपथी यांनी १० व्या शतकांत बांधले असून त्यावर चालुक्य राजवटीतील वास्तुशास्त्राची छाप पडलेली दिसते. गोपुरमची रचना श्री अल्लाडू रेड्डी यांनी १४ व्या शतकात केली. १७ व्या शतकांत कल्याण मंडपम बांधून अष्टभुजा लक्ष्मी आणि नारायण स्वामी यांची स्थापना करण्यात आली. हे मंदिर या भागात राज्य करणाऱ्या चालुक्य राजा भिमा यांनी बांधले असून सध्या ते पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे.
काळ्या दगडाचे ७२ खांब
येथे भगवान शंकराला क्षीररामलिंगेश्वर स्वामी म्हणतात. येथील शिवलिंगाची स्थापना प्रत्यक्ष भगवान विष्णुंनी केली आहे. त्यामुळे क्षीरराम येथे एक दिवस राहिल्यास वर्षभर काशीत राहिल्याचे पुण्य मिळते, असे सांगितले जाते. या मंदिरातील शिवलिंग पांढरेशुभ्र आहे. मंदिराच्या मंडपात ७२ काळ्या दगडाचे खांब आहेत. गाभाऱ्यात गोकर्णेश्वर आणि विघ्नेश्वर यांच्या मध्यभागी भगवान विष्णुंनी स्थापन केलेले शिवलिंग आहे. हेच ते सुप्रसिद्ध क्षीररामलिंगम! शिवलिंगाच्या उजव्या बाजूला सुब्रमणीयम स्वामी आणि जनार्दन स्वामी यांच्या मूर्ती असून समोर शिवाचे वाहन नंदी आहे.गर्भगृहाच्या चारी बाजूंच्या खिडक्यांमधून मूळ शिवलिंग पाहता येते.
देवतांची मांदियाळी
मंदिरांत अनेक देवतांच्या मूर्ती आणि मंदिरं आहेत. यात सूर्य, काशी विश्वेश्वर, पार्वती माता, लक्ष्मी माता, नागरेश्वर लिंगम, धुंडी विघ्नेश्वर, वीरभद्र, सप्त मातृका ,कनक दुर्गा, ब्रह्मा, सरस्वती, कुमारस्वामी, कार्तिकेय, महिषासुरमर्दिनी, कालभैरव, नागसर्प, नटराज, दत्तात्रेय, नागेश्वर, शनिश्वर, राधाकृष्ण आणि शंकर यांचा समावेश आहे. पलकोल्लू हे गाव गोस्तनी नदीच्या काठावर वसले असून नसरापुर जवळच्या संगमावर ही नदी गोदावारीला मिळते. तिथून पुढे अंतरवेडी येथे या नद्या सागराला मिळतात.
उत्सव
महाशिवरात्री हा इथला प्रमुख उत्सव. त्यावेळी लाखो भाविक मंदिरांत दर्शनाला येतात. सकाळी ५.३० वाजता मंदिर उघडते. ५.३० ते ११.३० आणि सायंकाळी चार ते साडे आठ वाजे पर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले असते. कोविड लॉकडाऊनमुळे मंदिर बंद होते. आता सुरू झाले असले तरी भाविकांनी संपूर्ण चौकशी करुनच येथील भेटीचे नियोजन करावे.
कसे जावे
आंध्र प्रदेश परिवाहन मंडळाच्या बसेस हैदराबाद, विशाखापट्टणम, विजयवाडा आणि तिरुपती येथून पलकोल्लूला नियमितपणे येतात. नरसापुर-विजयवाडा रेल्वेमार्गावर पलकोल्लू रेल्वे स्टेशन आहे. येथेही ३ एक्सप्रेस ट्रेन्स नियमितपणे धावतात.