रेड्याच्या रूपातील भगवान शंकर येथे अंतर्धान पावले. त्यांचा पुढचा भाग नेपाळ मधील काठमांडू येथे प्रकट झाला. ते ठिकाण पशुपतिनाथ नावाने प्रसिद्ध झाले. रेड्याच्या पाठीच्या आकाराचा भाग म्हणजेच आपले केदारनाथ. शिवाच्या भुजा तुंगनाथ येथे, नाभीचा भाग मद्मेश्वर येथे तर जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्या. त्यामुळे या चारही स्थानांसह श्रीकेदारनाथांना ‘पंचकेदार’ असे म्हणतात.
भारतात सर्वांत पुण्यदायक यात्रा म्हणजे चारधाम यात्रा. चारधाम यात्रेत ‘बद्रीनाथ’,’जगन्नाथपुरी’,’द्वारका’ आणि ‘रामेश्वरम’ या चार धामांचा समावेश होतो. आदि कालपासून भारतात प्रत्येक हिंदू भाविक आयुष्यात जन्माला येउन एकदा तरी चारधाम यात्रा करावी याची स्वप्न पहातो. चारधाम यात्रेखालोखाल नंबर लागतो तो ‘छोटा चारधाम’ यात्रेचा. छोटा चारधाम यात्रेत ‘बद्रीनाथ’, ‘केदारनाथ’, ‘गंगोत्री’ आणि ‘यमनोत्री’ या चार धामांचा समावेश होतो. यानंतर ‘पंचकेदार’ आणि ‘पंच-बदरी’ या यात्रांही परम पुण्यदायक समजल्या जातात. पंच-केदार यात्रेत ‘केदारनाथ’, ‘तुंगनाथ’,’मद्मेश्वर’,’कल्पेश्वर’ आणि ‘रूद्रनाथ’ या पवित्र स्थानांचा समावेश केला जातो. पंच-बदरी यात्रा देखील खुपच पुण्यकारक मानतात पंच-बदरी यात्रेत ‘आदि-बदरी’,’बद्रिनाथ’, ‘भविष्य- बदरी’, ‘वृद्ध-बदरी’ आणि ‘योगध्यान’ या पवित्र देवस्थानांचा समावेश केला जातो.
याआधी आपण लॉकडाउन मध्ये घरबसल्या चार धामांची माहिती घेतली. आता आपण हिमालयातील पंचकेदार धामांची माहिती घेऊ या.
भगवान शंकरांचे वसतिस्थान
पंचकेदार यात्रेतील सर्वांत प्रसिद्ध स्थान म्हणजे केदारनाथ. बारा ज्योतिर्लिंगात देखील केदारनाथाचा समावेश होतो. उत्तराखंड राज्याच्या रूद्रप्रयाग जिल्ह्यात हिमालयाच्या हिमाच्छादित पर्वतराजीत समुद्रसपाटी पासून ३५८१ मीटर उंचीवर केदारनाथ वसले आहे. मंदाकिनी नदीचे उगमस्थान येथे आहे. गंगोत्री,यमनोत्री,केदारनाथ आणि बद्रिनाथ हे छोटाचारधाम, तसेच पंचकेदार आणि पंचबदरी ही सर्व पवित्र स्थानं उत्तराखंडाच्या गढ़वाल मंडलात येतात.
पंचकेदारची निर्मिती कथा
महाभारतातील युद्ध संपल्यावर स्वकियांना ठार केल्याच्या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शंकराचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्याच्या हेतूने पांडव हिमालयात गेले.त्यावेळी नकुल व सहदेव यांना एक महाकाय रेडा दिसला. भीम त्या रेड्याचा पाठलाग करू लागला. भीमाने त्या रेड्याच्या पाठीवर गदेने प्रहार केला. तेव्हा रेड्याने आपले तोंड जमिनीत खुपसले. या बाबतीत अशी आख्यायिका सांगितली जाते. रेड्याच्या रूपातील भगवान शंकर येथे अंतर्धान पावले. त्यांचा पुढचा भाग नेपाळ मधील काठमांडू येथे प्रकट झाला. ते ठिकाण पशुपतिनाथ नावाने प्रसिद्ध झाले. रेड्याच्या पाठीच्या आकाराचा भाग म्हणजेच आपले केदारनाथ. शिवाच्या भुजा तुंगनाथ येथे,नाभीचा भाग मद्मेश्वर येथे तर जटा कल्पेश्वर येथे प्रकट झाल्या. त्यामुळे या चारही स्थानांसह श्रीकेदारनाथांना पंचकेदार असे म्हणतात.
कसे आहे इथले ज्योतिर्लिंग
रेड्याच्या पाठीच्या आकारासारखा डोंगराचा भाग म्हणजेच केदारनाथ ज्योतिर्लिंग. येथे कोणतीही मूर्ती किंवा शिवलिंग नाही. त्रिकोणात्मक खडकाची आकृति म्हणजेच पवित्र व् जागृत केदारनाथ होय.येथे येणारे भाविक समोरून केदारनाथाचे दर्शन घेतात आणि मागे जावून तूप चोळतात. चार हात लांब आणि दिड हात रुंद असलेल्या केदारेश्वराला मिठी घालून भेटतात.
हिमालयाच्या कुशीतील भव्य मंदिर
केदारनाथाचे हे मंदिर सहा फूट उंचीच्या भव्य दगडी चबुतरयावर बांधलेले आहे. दगडापासून बनविलेले कत्युरी शैलीचे हे मंदिर नक्की कधी आणि कुणी बांधले याचा लिखित पुरावा नाही.परन्तु पाण्डवांच्या वंशातील जनमेजय राजाने हे मंदिर बांधले आणि आठव्या शतकांत आदि शंकराचार्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे मानतात.
मंदिराचे तीन प्रमुख भाग आहेत. गर्भगृह,मध्यभाग आणि सभामंडप. गर्भगृहात मध्यभागी भगवान श्रीकेदारेश्वराचे अतिप्राचीन स्वयंभू ज्योर्तिर्लिंग आहे.त्याच्या समोर गणेशजी आणि माता पार्वती यांची श्रीयंत्रं आहेत.या ज्योतिर्लिंगाच्या पृष्ठभागावर नैसर्गिक रूपातील यज्ञोंपवित आणि स्फटिकमाला स्पष्टपणे दिसतात. श्रीकेदारेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये नव लिंगाकार विग्रह विद्यमान आहेत असे मानले जाते त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला नवलिंग केदार असे म्हणतात. स्थानिक लोकगीतात याचा उल्लेख मिळतो.
अखंड जळणारा नंदादीप
श्रीकेदारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या चारी बाजूंना अतिभव्य असे चार स्तंभ (खांब) आहेत. यांना चार वेदांचे प्रतिक मानतात.या चार स्तंभांवर मंदिराचे विशाल घुमट टेकलेले आहेत. ज्योतिर्लिंगाच्या पश्चिमेला एक अखंड तेवणारा नंदादीप आहे. हजारो वर्षांपासून हा दिवा अखंडपणे जळतो आहे. कार्तिक महिन्यात जोरदार हिमवर्षाव सुरु झाल्यानंतर श्री केदारेश्वराचे सिंहासन मंदिराच्या बाहेर आणून मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर चैत्र महिन्यापर्यंत केदारनाथाचे निवास डोंगराच्या खाली ६० किलोमीटर अंतरावरील उखी मठ येथे असतो.
वैशाख महिन्यात बर्फ वितळल्यावर जेव्हा केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडतात त्यावेळी दरवाजे बंद करतांना प्रज्वलित केलेला नंदादीप जसाच्यातसा जळत असलेला दिसतो असे म्हणतात. या दिव्य ज्योतीचे दर्शन घेण्यासाठी शिवभक्त गर्दी करतात. तोच हा अखंड जळणारा नंदादीप!
मंदिराच्या भिंतीवर पौराणिक कथा व् देवदेवतांच्या प्रतिमा चित्रित करण्यात आलेल्या आहेत. गर्भगृहाच्या भिंतीवर आकर्षक फुलं आणि कलाकुसर यांचे कोरीव कम केलेले आहे. गर्भगृहातील चार विशाल खांबांच्या मागून स्वयंभू ज्योतिर्लिंग भगवान श्रीकेदारेश्वराला प्रदक्षिणा घातली जाते. या मंदिरच्या मागे आदि शंकराचार्यांची समाधी आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला गांधी सरोवर आहे. येथून युधिष्ठिर सदेह स्वर्गात गेले असे म्हणतात. येथून २० किमी अंतरावर सोनगंगा आणि मंदाकिनी नद्यांचा संगम आहे.
यावर्षी १७ में २०२१ रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. हिंदीत याला कपाट खुलना असे म्हणतात. परन्तु चारधाम यात्रा सुरु करण्याबद्दलचे आदेश अजुन आलेले नाहीत. त्यामुळे भाविकांनी घरुनच मनापासून श्रीकेदारनाथाचे दर्शन घ्यावे आवाहन मंदिराच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
कसे जावे
केदारनाथाला जाण्यासाठी पारंपरिक मार्ग म्हणजे दिल्लीहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५८ ने रुद्रप्रयाग येथे यावे.येथून मार्ग क्रमांक १०९ ने गौरीकुंड पर्यंत जाता येते. येथून केदारनाथ पर्यंतचा १४ किमी चा रस्ता पायी पार करावा लागतो. अर्थात हिमालयातल्या या अवघड रस्त्यांवर यात्राकाळात घोडा आणि पालखी यांची सुविधा उपलब्ध असते.सध्या यात्रा बंद असल्याने येथे सर्वत्र निरव शांतता आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!