पंचभूत स्थलम् – दुसरे शिवमंदिर- जम्बुकेश्वर मंदिर
पाण्यात असलेले पाण्याचे शिवलिंग!
तामिळनाडूतल्या पंचभूत स्थल दर्शन मधील पाच प्रमुख शिवमंदिरातील हे दुसरे शिवमंदिर. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंच तत्वांपासून ही पांच शिव मंदिरं बनलेली आहेत. त्यातील पाणी, जल किंवा नीर या तत्वापासून थिरुवनैकवल येथील शिवपिंडी बनलेली आहे. आज या अनोख्या मंदिराविषयी जाणून घेऊया..
तमिळनाडूतील त्रिची किंवा त्रिचनापल्ली येथे थिरुवनैकवल किंवा जम्बुकेश्वरम नावाचे सुप्रसिद्ध शिव मंदिर आहे. हे मंदिर सुमारे १८०० वर्षांपूर्वी शक्तिशाली हिंदू चोल राजवंशातील कोंकेगानन चोला या सुरुवातीच्या चोल राजाने बांधले आहे. सुप्रसिद्ध रंगनाथ स्वामी मंदिर असलेल्या श्रीरंगम बेटावर हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर चोल राजांच्या राजवटीत बांधले आहे. त्यामुळे अकरा-बाराव्या शतकातील शिलालेख येथे पहायला मिळतात.
जम्बुकेश्वर शिव मंदिरातील शिवलिंग केवळ जमिनीपासून खाली आहे असे नाही तर ते पाण्यातच आहे. पाण्यापासून बनलेले पाण्यातील शिवलिंग हा एक चमत्कारच आहे. येथे शिवलिंगावर वरून अभिषेक करण्याची वेळच येत नाही. कारण इथलं शिवलिंग सदैव पाण्यातच असतं.
शिवलिंग येथे कसे आले?
याठिकाणी शिवलिंग कसे प्रकट झाले त्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. जगाच्या कल्याणासाठी माता पर्वतीने भगवान शिवाची खोडी काढली. तेव्हा शंकरांनी तिला कैलास सोडून पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली. भगवान शिवाच्या इच्छेनुसार पर्वतीने अकिलानंदेश्वरीच्या रुपात जम्बुवनात म्हणजेच हल्लीच्या थिरुवनैकोईल येथे जन्म घेतला. या जागेवर पर्वतीने वेन नवल नावाच्या वृक्षाखाली कावेरी किंवा पोन्नी नदीच्या पाण्यात शिवलिंग तयार करुन त्याची आराधना केली. तेव्हापासून या शिवलिंगाला अप्पूलिंग किंवा पाण्याचे लिंग असे म्हणतात. तिची भक्ती पाहून भगवान शिव अकिलानंदेवर प्रसन्न झाले. त्यांनी तिला शिवज्ञान सांगितले. पश्चिमेकडे मुख करुन उभ्या असलेल्या शिवाकडे पूर्वेला मुख करून अकिलानंदेश्वरीने शिवाचा उपदेश ग्रहण केला तो याच ठिकाणी! या प्रसंगाची आठवण म्हणून येथे शिवलिंग प्रकटले.
जम्बुकेश्वर नाव कसे पडले?
येथे शिवाला जम्बुकेश्वर हे नाव कसे पडले याविषयी एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. ‘मालयान’ आणि ‘पुष्पदंत’ नावाचे दोन शिवभक्त होते. पण ते दोघं एकमेकांशी नेहमी भांडायचे. एकदा ते असेच भांडत असतांना त्यांनी एकमेकांना शाप दिला. त्यामुळे पुष्पदंत हत्तीच्या तर मालयान मकड़ी म्हणजे कोळीच्या रुपांत पृथ्वीवर जन्माला आले. हत्ती आणि कोळी जम्बुकेश्वर येथे येऊन शिवाची पूजा करू लागले. हत्ती सोंडेने पिंडीवर पाणी टाकत असे तर कोळी शिवाला उन्हाचा व झाडांच्या पानांचा त्रास होऊ नये यासाठी शिव पिंडीवर जाळं विणीत असे. त्यांची भक्ती पाहून भगवान शंकर त्यांना जम्बुकेश्वराच्या रुपांत प्रसन्न झाले. त्यांनी त्या दोघांना शापमुक्त केले. शिवाने येथे जम्बुकेश्वराचे रूप धारण केले. त्यामुळे या ठिकाणाला ‘जम्बुकेश्वर’ तर हत्तीने येथे शिवाची पूजा केली. त्यामुळे या स्थानला थिरुवनैकवल असे नाव पडले.
असे आहे मंदिर
जम्बुकेश्वर मंदिर अतिशय भव्य आहे. या मंदिराची वास्तुकला, शिल्पकला श्रीरंगम रंगनाथ स्वामी मंदिरापेक्षा कित्येक पट सरस आहे. खरं म्हणजे दोन्ही मंदिरांचा निर्मिती कालखंड एकच आहे. मंदिराभोवती पाच कोट किंवा प्रकार आहेत. सर्वात बाहेरच्या दगडी कोटाचे नाव विबुदी प्राकार असून तो एक मैल लांबीचा असून २५ फूट उंच आणि २ फूट रुंद आहे. हा दगडी कोट बांधताना साक्षात भगवान शंकरांनी मजुराच्या रुपांत मदत केली, असे म्हणतात. त्यामुळे हा कोट अतिशय भक्कम झालेला आहे. आज १८०० वर्षानंतर देखील या कोटाला कुठे तडा गेलेला नाही की त्याचा एखादा दगड निखळलेला नाही.
मंदिराच्या आत २४३६ फूट लांब, १४९३ फूट रुंद आणि ७९६ खांब असलेले एक भव्य सभामंडप आहे. येथे बाजूला जिवंत पाण्याचे झरे असलेला एक लहानसा तलाव आहे. त्यानंतर तिसरे कम्पाउंड ७४५ फूट लांब आणि १९७ फूट रुंद असून ३० फूट उंच आहे. या प्रकरातून प्रवेश करण्यासाठी ७३ आणि १०० फूट उंचीची दोन गोपुरं (प्रवेशव्दार) आहेत. येथे नारळाची झाडं आणि एक तलाव आहे. यानंतर ३०६ फूट लांब आणि १९७ फूट रुंदीची तटबंदी असून तिला ६५ फूट उंचीचा गोपुरम आहे. तसेच या प्रकरात अनेक लहान लहान मंदिरं आहेत. सर्वांत आतली तटबंदी १२६ फूट लांब असून १२३ फूट रुंद आहे. त्याच्या आत गाभारा असून येथे पाण्यात जम्बुकेश्वराचे शिवलिंग आहे. मंदिराचा प्रमुख गाभारा चौकोनी आकाराचा असून गाभाऱ्याच्या छतावर विमान कोरलेले आहे.
या मंदिरांत विवाह का होत नाहीत?
पंच भूत स्थलम मधल्या एकाम्बरेश्वर मंदिरांत कल्याण उत्सवाच्या वेळी हजारो तरुण-तरुणींचे विवाह लावले जातात. मात्र ज्म्बुकेश्वराच्या मंदिरात विवाह लावणे निषीद्ध मानले जाते. याचे कारण असे सांगितले जाते की, या मंदिरातील मूर्ती एकमेकांच्या विपरीत स्थापित केलेल्या आहेत. अशा प्रकारच्या मंदिरांना ‘उपदेश स्थलम’ म्हणतात. या मंदिरांत देवी पार्वती शिष्येच्या रुपात तर जम्बुकेश्वर गुरूच्या रुपात उपस्थित आहेत. त्यामुळे या मंदिरात थिरु कल्याणम म्हणजे विवाह लावले जात नाहीत. या मंदिरात एकपथाथा तिरुमुथि, शिव, विष्णु आणि ब्रह्मा देखील उपस्थित आहेत.
कसे जावे?
त्रिचनापल्ली हे तामिळनाडूतील प्रसिद्ध शहर आहे. ते विमान, रेल्वे आणि रस्ते मार्गाने सर्व मोठ्या शहरांशी जोडलेले आहे. त्रिची किंवा त्रिचनापल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे ३ किमी अंतरावर थिरुवनैकोईल हे ठिकाण आहे. येथून जवळच श्रीरंगम हे लहानसे ऐतिहासिक शहर आहे. ही दोन्ही ठिकाणं कावेरी आणि कोलेरून नद्यांच्या बेटावर वसली आहेत.
(फोटो सौजन्य – विकिपीडिया)