इंडिया दर्पण विशेष लेखमाला
राऊळी मंदिरी
छत्तरपूरचा १०१ फुटी थ्रीडी हनुमान
खरोखरचा हनुमान आपल्याला प्रसन्न झाला तर तो कसा दिसेल हे पहायचे असेल तर दिल्लीतील छत्तरपूर येथील हनुमान पहावा. छत्तरपूरचा १०१ फूटी उंच हनुमान केवळ भव्यच नाही तर तो देशांतील पहिला थ्री -डी हनुमान आहे. दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथील श्री आद्य कात्यायनी शक्तिपीठ हे देवस्थान संपूर्ण देशांत आधीपासूनच सुप्रसिद्ध आहे. दिल्लीचे १०१ एकर जागेवर बांधलेले अक्षरधाम मंदिर २००५ साली सुरु झाले पण त्यापूर्वी देशांतले सर्वांत मोठे आणि जगातले दुसर्या क्रमांकाचे मंदिर म्हणून हेच देवस्थान प्रसिद्ध होते. कारण ७० एकर जागेवर कात्यायनी देवी शक्तिपीठ हे मंदिर उभारलेले आहे. याच मंदिर परिसरांत छत्तरपूरचे हनुमान स्थापन करण्यात आले आहेत.
छत्तरपुर देवस्थान दक्षिण दिल्लीत कुतुबमीनार पासून ४ किमी अंतरावर आहे. ऑफ महरोली -गुरगाव रोडवर हे भव्य मंदिर आहे. छत्तरपूर येथील हनुमान थ्री-डी हनुमान याच नावाने प्रसिद्ध आहेत. दिड वर्षांच्या संशोधन कार्या नंतर हनुमानाचे थ्री-डी मॉडेल तयार करण्यात आले आहे. या थ्री-डी शो मध्ये सप्तरंगी लायटिंगचा प्रथमच वापर करण्यात आला असून येथे अमिताभ बच्चन यांच्या आवाजात हनुमान चालीसा लावली जाते.
देशांतील पाहिले थ्री डी हनुमान!
देशांत थ्री डी रुपांत दिसणारे हे पहिले हनुमान आहेत असे सांगितले जाते. येथील हनुमान मूर्ती १०१ फूट उंच असून या मूर्तीवर थ्री-डी शोच्या वेळी ३० हजार ल्युमन क्षमतेच्या प्रोजेक्टर द्वारे हाय डेन्सिटी लाइट्स सोडले जातात. त्यामुळे छत्तरपूर मंदिरांत हा शो सुरु होताच जणू साक्षात हनुमान प्रकटतात असे म्हटले तर वावगे होणार नाही. थ्री -डी चा प्रभाव इतका पावरफुल असतो की तिथे उपस्थित असलेले शेकडो भाविक जणू मंत्रमुग्ध होतात.
साक्षात आकाशाला भिडलेले हनुमान आपल्या पुढे प्रकट झाले आहे असा आभास निर्माण होतो. पहिल्यांदा हा शो पाहणारा तर हनुमानाचे हे रूप कधीच विसरु शकत नाही. शेकडो भाविकांना एकाच वेळी जणु ईश्वर दर्शन होते. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाचे विराट रूप पाहून अर्जुनाची जशी स्थिती झाली असेल तशीच अवस्था हा हनुमान पाहणारांची होते. अकरा मिनिटे हा लेजर शो चालतो. आठवडयातून तीन दिवस हा लेजर शो दाखविला जातो.
छत्तरपूर येथील हनुमान मूर्ती दोन पायांवर उभी आहे. ही मूर्ती लाल रंगात रंगविलेली आहे. उजवा हात आशीर्वाद देत असून डाव्या हातांत गदा धारण केली आहे. हनुमानाच्या पायात चांदीचे तोड़े असून पायांत खडावा देखील आहेत. हनुमान मूर्ती उंचावर असून अनेक पायर्या चढून वर जाता येते. येथून संपूर्ण परिसर अतिशय विहंगम दिसतो. १०१ फूट उंच हनुमान हे तर इथले एक आकर्षण आहे. मुळांत हे मंदिरच अतिशय विशाल जागेवर स्थापन केलेले आहे. मंदिराचा परिसर काळजीपूर्वक विकसित करण्यात आला आहे. १९७४ मध्ये बाबासंत नागपाल जी यांनी श्री आद्य कात्यायनी शक्तिपीठाची स्थापना केली आहे. येथे दुर्गेच्या नऊ रुपांसोबत भगवान शिवाची अतिशय भव्य पिंड देखील आहे. शिव आणि शक्तीचे इतके सुंदर रूप क्वचितच पहायला मिळते.
या मंदिर समुहातील सर्व मंदिरं संगमरमरी दगड वापरून तयार करण्यात आली आहेत. या परिसरांत विविध देवी देवतांची २०-२२ मंदिरं आहेत. सर्व मंदिरं अतिशय सुंदर कलाकुसर युक्त आहेत. संपूर्ण परिसर पहायला किमान दोन ते अडीच तास वेळ लागतो. २००५ पर्यंत हे दिल्लीतले आणि देशांतले सर्वांत मोठे देवस्थान म्हणून प्रसिद्ध होते. २००५ साली १०१ एकर जागेवर अक्षरधाम मंदिराचे लोकार्पण झाल्यावर तर या दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी वाढू लागली.नवरात्रांत तर छत्तरपूर येथील मंदिरांत पाऊल ठेवायला देखील जागा नसते.
Column Rauli Mandiri India’s First 101 Feet 3D Hanuman By Vijay Golesar