श्रावण मास विशेष
हरिद्वारचा १०१ फुटी शिवशंभो!
जगातील मोठ मोठ्या भगवान शिवाच्या मुर्तींचा विषय सुरु आहे आणि अजून हरिद्वारचं नाव नाही असं कसं होईल? जिथे साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश म्हणजे भगवान शंकर यांचा सदैव निवास असतो त्या हरिद्वार मध्ये भगवान शिवाची मूर्ती असणार नाही असं कधी होईल का? आज ‘इंडिया दर्पण’च्या वाचकांना हरिद्वारच्या १०१ फूट उंचीच्या भगवान शिव मूर्तीचे दर्शन घडविणार आहोत.
हरिद्वार म्हणजे भारतातलं सर्वांत प्राचीन, पवित्र आणि पूजनीय तीर्थक्षेत्र.पण कुणी याला ‘हरिद्वार’ म्हणतं तर कुणी ‘हरद्वार’.आता ‘हरी’ म्हणजे विष्णु तर ‘हर’ म्हणजे महादेव. आपल्या मराठीत तर ‘हर हर महादेव!’ अशी गर्जनाच प्रसिद्ध आहे.कुणी काहीही म्हणो, वैदिक काळात येथे भगवान विष्णु आणि भगवान शंकर प्रकट झाले होते आणि ब्रह्मदेवाने येथे यज्ञ केला होता अशी मान्यता आहे. तीर्थक्षेत्रांत जसे हरिद्वारला महत्व आहे तसं हरिद्वार मध्ये सर्वांत पवित्र स्थान समजलं जातं ते ‘हर की पौड़ी’ किंवा ‘हर की पौरी’ या घाटाला. हिंदीत कुणी याला ‘पौरी’ म्हणतं तर कुणी ‘पौड़ी’ मराठीत आपण याला पायरी म्हणतो. हरीची पायरी!
हरीची पायरी हे नाव कसं पडलं?
राजा विक्रमादित्य याचा भाऊ भर्तुहरी याने अनेक वर्षे हरिद्वार येथील गंगा तटावर तपस्या केली. त्याच्या मृत्यु नंतर राजा विक्रमादित्य याने भर्तुहरिच्या स्मरणार्थ या घाटाची निर्मिती केली.तपस्या करतांना ज्या मार्गाने भर्तुहरी गंगेत स्नानाला जायचा त्या त्या मार्गांवर राजा विक्रमादित्य याने पायर्या तयार केल्या.या पायरींना ‘भर्तुहरी की पौड़ी’ किंवा ‘भर्तु हरीची पायरी’ असे म्हणत. कालांतराने लोक ‘भर्तुहरी’चे नाव विसरले आणि केवळ ‘हरी की पौड़ी’ किंवा ‘हरीची पायरी’ म्हणू लागले.
‘भगवान विष्णु’चे पाऊल!
हरिद्वार येथील ‘हरी की पौड़ी’ किंवा ‘हरीची पायरी’ या नावाच्या उत्पती विषयी दुसरीही एक कथा सांगितली जाते. हरी या शब्दाचा दुसरा अर्थ होतो नारायण किंवा श्रीहरी. असं म्हणतात की वैदिक काळात भगवान शिव येथे आले होते. येथील एका दगडावर श्रीविष्णुचे पाऊल उमटलेले आहे.त्यामुळे श्री विष्णुच्या पावलांचे चिन्ह असलेले स्थान म्हणजे ‘हरी की पौड़ी’ किंवा ‘हरिचे पाऊल’!
देव आणि दानव यांनी केलेल्या समुद्र मंथनातून निघालेल्या अमृत कलशातील अमृताचे काही थेंब हरिद्वार येथील ‘हरी की पौड़ी’ किंवा ‘हरिचे पाऊल’ या ठिकाणी पडले त्यामुळे हा घाट हरिद्वारमधील सर्वांत पवित्र घाट समजला जातो.हरिद्वारला येणारा प्रत्येक भाविक ‘हरी की पौड़ी’ या घाटावर येतोच येतो. हे सगळं रामायण सांगायचं कारण म्हणजे ‘हरी की पौड़ी’ या घाटापासून हाकेच्या अंतरावर भगवान शंकरांची १०१ फूट उंचीची मूर्ती आहे.
दुरुनच दिसते
हरिद्वार येथील गंगेवरील पाईप आणि तारा यांच्या आधाराने तयार करण्यात आलेल्या ओव्हर ब्रिज वरून ‘हरी की पौड़ी’ला येतांना दोन-तीन कि.मी.अंतरावरुनच भगवान शंकराची जगातली उंच मूर्ती दिसू लगते. उंचावरून पहिल्यावर किंवा ड्रोन ने केलेले चित्रीकरण पाहिल्यावर येथील गंगेचे रौद्र रूप पहायला मिळते. अतिशय विशाल आणि प्रचंड वेगाने वाहते गंगा येथे. हरी की पौड़ी या घाटावर तिन्ही त्रिकाळ भाविकांची गर्दी असते. आणि सायंकाली होणार्या गंगेच्या आरतीला तर हजारो भाविक हजर असतात. या घाटावरूनही भगवान शिवाची मूर्ती दिसते.
हरी की पौड़ी घाटाच्या मागेच ‘स्वामी विवेकानंद पार्क’ या उद्यानात उत्तराखंडातली सर्वांत उंच महादेवाची मूर्ती उभारलेली आहे. हे उद्यान फारसे मोठे नाही परंतु त्याची चांगली निगा राखण्यात आली आहे. विविध फुलझाडे, रोप वाटिका आणि शोभेची झाडं लावलेली आहेत. सर्वत्र छान हिरवळ आहे. उद्यानात फिरण्यासाठी पेव्हर ब्लॉकचे रस्ते तयार केले आहेत. उद्यान मोकळे असल्याने प्रवेश मोफत आहे.
येथील शिवमूर्ती कशी दिसते?
दहा बारा फूट उंचीच्या गोलाकार चबुतर्यावर भगवान शंकराची मूर्ती उभारलेली आहे. देशातल्या इतर भव्य शिव मूर्ती आणि हरिद्वारची शिव मूर्ती यात दोन विशेष गोष्टी आढळतात. एक म्हणजे इतर ठिकाणच्या बहुतेक शिवमूर्ती ध्यानस्थ बसलेल्या आहेत. तर येथील शिवमूर्ती उभी आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवाला दोनच हात दाखविलेले आहेत. इतर अनेक ठिकाणी शिवमूर्तीला चार हात दाखविलेले दिसतात.
येथील शिवाची मूर्ती १०१ फूट उंच आहे. काही ठिकाणी तिची उंची १०८ फूट असल्याचे उल्लेख आहे. परंतु तेथे चबुतर्याची देखील उंची धरलेली दिसते. येथील भगवान शंकर उभे असून त्यांच्या डाव्या हातात त्रिशूल आणि त्यालाच जोडलेले डमरू आहे.भगवान शिवाच्या जटेत गंगा बसलेली असून कपाळावर चंद्रकोर शोभून दिसते. शिवाच्या गळ्यात नाग आणि रुद्राक्ष माला रुळत आहेत. येथे शिवाने कमरे भोवती व्याघ्रजीन परिधान केले असून त्याच्या कमरे भोवती दोन नाग दाखविलेले आहेत.
हरिद्वार येथील शिवाची मूर्ती स्टील आणि सिमेंट पासून तयार करण्यात आलेली आहे. उन,वारा आणि पाउस यांचा परिणाम मूर्तीवर होऊ नये या साठी विशेष निगा राखली जाते.दर तीन वर्षांनी मूर्तीला रंग दिला जातो. रंग येथील स्थानिक कलाकार देतात. भगवान शिवाने हलाहल विष प्राशान केल्याने त्यांचा रंग निळा झाला या पौराणिक कथेनुसार यावेळी भगवान शिवाच्या मूर्तीला निळा रंग दिलेला आहे.
कमरे भोवती परिधान केलेले व्याघ्राजीन हुबेहूब वाघाच्या कातड्याच्या रंगाचे आहे. भगवान शिवाचे नेत्र उघडे असून.त्यांचा उजवा हात भाविकांना अभय देतो आहे. येथील शिव मूर्ती पहातांना भगवान शिवाची या परिसरावर कृपा आहे याची जाणीवेने मन प्रसन्न शांत होते. हरिद्वारला येणारे विशेषत: ‘हरी की पौरी’चे दर्शन घेणारे भाविक हरिद्वार येथील भगवान शिवाची भव्य मूर्ती आवर्जुन पाहतात.आपण हरिद्वार जाल तेंव्हा हरिद्वार द्वारच्या शिवशंभोची जगातली सर्वांत उंच मूर्ती अवश्य पहा.