एकाम्बरेश्वर मंदिर
(सर्वोच्च गोपुर शिखराचे शिवमंदिर!)
गेल्या काही भागात आपण भगवान महादेवाच्या पंचराम क्षेत्राविषयी माहिती घेतली. आता आपण भारतातील पंच भूत स्थलममधील पहिल्या शिव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत. हे मंदिर आहे श्री एकाम्बरेश्वर. सर्वोच्च गोपूर शिखराचे असलेले हे शिवमंदिर आहे.
साडेतीन हजार वर्षांपूर्वीचा आम्रवृक्ष हे येथील सर्वांत मोठे आकर्षण. ज्या आम्रवृक्षाखाली बसून पार्वतीने महादेवाला प्रसन्न करून घेतले, तोच हा आम्रवृक्ष! तब्बल ३५०० वर्षांचा हा वृक्ष पहायला भाविक गर्दी करतात. आंब्याच्या या वृक्षाच्या चार फांद्यांना चार वेगवेगळ्या प्रकारचे आंबे येतात, असे सांगितले जाते. हिमाचल प्रदेशांतील ‘पंचकेदार’ आणि आंध्रप्रदेशातील ‘पंचरामा’ मंदिराप्रमाणेच दक्षिण भारतात ‘पंचभूत स्थलम्’ नावाचा भगवान शंकरांच्या पाच मंदिरांचा समूह प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.
विश्वाची निर्मिती पृथ्वी, आप (पाणी), तेज (अग्नि), वायू (हवा) आणि आकाश या पाच तत्त्वांपासून झाली असल्याचे आपण मानतो. पंचभूत स्थलम् मधील पाच शिवमंदिरं या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. पंच म्हणजे पाच, भूत म्हणजे तत्व आणि स्थलम् म्हणजे स्थान किंवा ठिकाण. ही सर्व शिव मंदिरं दक्षिण भारतात हजार वर्षापूर्वी तयार झालेली आहेत. यातील चार मंदिरे तमिळनाडूत तर एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे.
या पाचही मंदिरातील शिवलिंग वैशिष्ट्यपूर्ण असून ती पंचमहाभूत तत्वापासून निर्माण झालेली आहेत. आज आपण ज्याचा परिचय करून घेणार आहोत त्या कांचीपुरम येथील एकाम्बरेश्वर मंदिरातील शिवलिंग पृथ्वी तत्वापासून निर्माण झाले आहे. इतर चार मंदिरांपैकी थिरुवनैकलम येथील जम्बुकेश्वर मंदिरातील शिवलिंग जल तत्वा पासून निर्माण झाले आहे. चिदम्बरम येथील थिल्लाई नटराज मंदिरातील लिंग आकाशतत्वापासून निर्माण झाले आहे. आण्णामलैयार मंदिरातील शिवलिंग अग्नि तत्वापासून निर्माण झाले आहे. तर श्रीकालहस्ती मंदिरातील शिवलिंग वायू तत्वापासून निर्माण झाले आहे.
पंचभूत स्थलम् या मंदिर समूहातील भगवान शंकरांचे पहिले अति भव्य मंदिर एकाम्बरेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. ते तमिळनाडूतील कांचीपुरम येथे आहे. पंच महाभूत तत्वातील पृथ्वी तत्वानुसार येथील शिवलिंग निर्माण झाले आहे. येथे भगवान शंकरांची एकाम्बरेश्वरार किंवा एकाम्बरनाथार या नावाने पूजा केली जाते.
मंदिर निर्माण
एकाम्बरेश्वरार मंदिराची निर्मिती कशी झाली याविषयीची एक आख्यायिका आहे. वेगवती नदीच्या काठावरील प्राचीन आम्रवृक्षा खाली बसून पार्वतीने महादेवाच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या सुरु केली. तिची परिक्षा पाहण्यासाठी भगवान शिवाने पार्वतीवर अग्नी सोडला. पार्वतीने आपला भाऊ भगवान विष्णूचा धावा केला. भगवान विष्णुंनी शिवाच्या मस्तकावरील चंद्र काढून घेतला. चंद्राच्या किरणांमुळे आम्रवृक्ष व पार्वतीचे रक्षण केले. पार्वतीची साधना भंग करण्यासाठी शिवाने गंगेला पाठविले. पर्वतीने गंगेला सांगितले, मी तुझी बहिण आहे. कृपया माझी साधना भंग करू नकोस. पार्वतीची विनंती ऐकून गंगेने तिची साधना भंग केली नाही. यानंतर त्या प्राचीन आम्रवृक्षाखाली बसून पर्वतीने वाळूपासून शिवलिंग बनवून भगवान शंकराची प्रार्थना केली. तिची निष्ठा पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. या प्रसंगाची आठवण म्हणून येथे वाळू पासून शिवलिंग निर्माण झाले. तेच एकाम्बरेश्वर मंदिरातील वालुकामय शिवलिंग.
कांचीपुरम येथील एकाम्बरेश्वरार मंदिर सहाव्या शतकांपासून अस्तित्वात आहे. प्राचीन तमिळ ग्रंथांत या मंदिरांचा उल्लेख ‘काम कोट्टम’ (ह्ल्लीचे ‘कामाक्षी मंदिर’) आणि ‘कुमार कोट्टम’ (म्हणजेच आजचे ‘एकाम्बरेश्वरार मंदिर’) म्हणून केलेला आढळतो. तिसऱ्या शतकातील तमिळ संगम काव्यात या मंदिरांचा उल्लेख आहे. इ. स. २७५ ते इ. स. ८९७ या कालखंडात या प्रदेशावर राज्य करणाऱ्या पल्लव राजांनी हे मंदिर बांधले. त्यांच्यानंतर आलेल्या चोला राजघराण्यातील राजांनी या मंदिराचे नुतनीकरण व नवनिर्मिती केली. दहाव्या शतकात आदि शंकराचाऱ्यांनी तत्कालिन राज्यकर्त्यांच्या मदतीने कांचीपुरमचे नुतनीकरण केले. त्यांनी कामाक्षी आम्मा मंदिर आणि वरदराज पेरूमल मंदिराची नव्याने उभारणी केली. इ. स. १५३२ मधील शिलालेखानुसार अच्च्युतरायाने एकाम्बरेश्वरार आणि वरदराज स्वामी मंदिरांना समान एकर जागा दान दिली.
पंधराव्या शतकांत विजयनगरच्या राजांनी एकाम्बरेश्वरार मंदिराच्या बांधकामात मोठीच भर टाकली. त्यांच्यानंतर ब्रिटिश राजवटीत वल्लाल पच्चियाप्पा मुदलियार यांनी चेन्नईहून कांचीपुरम येथे येऊन मंदिराच्या नुतनीकरणासाठी अमाप पैसा खर्च केला. घोड्यावर स्वार झालेल्या पच्चियाप्पा मुदलियार यांचे एक शिल्पचित्रं मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खांबावर कोरलेले पहायला मिळते. पुढे वृद्धापकाळात कांचीपुरमला येणे कठीण झाल्यावर त्यांनी एकाम्बरेश्वरार याच नावाचे मंदिर चेन्नई येथे बांधले. आर्कियोलोजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या १९०५-०६ च्या रिपोर्ट नुसार हल्लीच्या मंदिराचे नुतनीकरण ‘नट्टू कोट्टाई चेट्टियार’ यांनी केले आहे.
अद्वितीय शिल्पकला
एकाम्बरेश्वराचे हे मंदिर सुमारे २५ एकर जागेवर वसले आहे. मंदिराच्या दक्षिणेकडील राजा गोपुरमची उंची ५९ मीटर म्हणजे १९४ फूट आहे. अकरा मजल्यांचे हे गोपुरम दक्षिण भारतातील हे सर्वांत उंच गोपुरम आहे. मंदिरावरील शिल्पकला प्रेक्षणीय असून याचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून आर्किटेक्चरचे विद्यार्थी येथे येतात. प्रवेशद्वाराच्या खालच्या अर्ध्या भागात दोन्ही बाजूंना विनायक आणि मुरुगन यांची मंदिरं आहेत. प्रवेशद्वारापासून जवळच दोन हॉल किंवा सभागृह आहेत. त्यांना ‘वाहन मंडपम’ आणि ‘सराबेस मंडपम’ किंवा ‘नवरात्री मंडपम’ असे म्हणतात.
येथील सुविख्यात ‘आयिराम काल मंडपम’ किंवा ‘हॉल-वे विथ थाऊजंड पिलर्स’ म्हणजेच एक हजार दगडी खांबांचा मंडप विजयनगरच्या राजांनी बांधला आहे. प्रवेश केल्यानंतर पहिल्याच भागात हा मंडप दिसतो. याच्या खालून गुप्त रुपांत पवित्र नदी वाहते असे म्हणतात. मंदिराच्या तिसऱ्या प्रांगणात अनेक देवतांची लहान लहान मंदिरं आहेत. चौथ्या प्रांगणात गणेशाचे एक लहानसे मंदिर आणि तळे आहे.
मंदिराचा दगडी ध्वजस्तंभ प्रमुख मंदिरासमोर आहे. बाजूला तलाव आहे. ध्वज स्तंभाजवळच पच्चियाप्पा मुदलियार यांनी बांधलेले ‘थिरुकाची मायानाम’ आणि ‘कल्याण मंडप’आहेत. मंदिराच्या चार दिशांना ‘थिरुकाची मायानाम’, ‘वालिसम’, ‘ॠषभसेन’ आणि ‘सत्यनादीसम’ यांची मंदिरं आहेत. ध्वजस्तंभा खालील हॉल मधील खांबांवर पुराणांतील कथांची शिल्पचित्रं तसेच महादेवाच्या विविध अवतारांची शिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या मुख्य गाभार्यात भगवान शंकरांची मूर्ती आणि पृथ्वी तत्वापासून निर्मित झालेले शिवलिंग आहे. गर्भगृहातील शिवलिंगा मागील भिंतीवर शिव-पार्वतीचे शिल्प आहे. तमिळ भाषेत येथे शिवाला ‘ताझुवा कुजैनथार’ आणि पार्वतीला ‘इलावर कुझाली’ असे म्हणतात.
पहिल्या प्रदक्षिणा मार्गावर ग्रॅनाईटमधून घडविलेल्या नायनमार्सच्या ६३ मूर्ती आहेत. मंदिराच्या आतल्या प्रदक्षिणा मार्गावर १००८ शिवलिंग कोरलेले आहेत. येथे सर्वत्र घडविलेले किंवा कोरलेले शिवलिंग दिसतात. कांचीपुरम मधील इतर सर्व शिव मंदिरांप्रमाणे याठिकाणी पार्वतीचे स्वतंत्र मंदिर नाही. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार कामाक्षी अम्मा मंदिरातील देवीच एकाम्बरनाथाची अर्धांगिनी आहे. मंदिर प्रांगणांत भगवान विष्णूंचे लहानसे मंदिर आहे. त्याला ‘निलाथिंगल थंडम पेरूमल’मंदिर म्हणतात.
येथे विष्णूच्या वामन रुपाची पूजा केली जाते. अलवारसंतांनी बांधलेल्या १०८ दिव्य देसम मंदिरांतील हे एक मंदिर आहे. भगवान विष्णुंच्या मंदिरामुळे शैव आणि वैष्णव भक्तांचा मेळा येथे जमतो. मंदिराच्या दुसऱ्या प्रांगणात नटराजाचे स्वतंत्र मंदिर आहे. साडेतीन हजार वर्षांपुर्वीचा आम्रवृक्ष हे येथील सर्वांत मोठे आकर्षण. ज्या आम्रवृक्षाखाली बसून पार्वतीने महादेवाला प्रसन्न करून घेतले तोच हा आम्रवृक्ष! ३५०० वर्षांचा हा वृक्ष पहायला भाविक गर्दी करतात. आंब्याच्या या वृक्षाच्या चार फांद्यांना चार वेगवेगळ्या प्रकारचे आंबे येतात असे सांगितले जाते.
नित्यपूजा आणि वार्षिक उत्सव
मंदिरातील नित्य पूजा शैव पंथाचे पुजारी करतात. मंदिरांत दररोज सहा प्रकारच्या पूजा केल्या जातात. पहाटे ५.३० वाजता उषाथकालम,सकाळी ८.०० वाजता कालशांती, सकाळी १०.०० वाजता उच्चीकालम, सायंकाळी ६.०० वाजता सायरसायी, रात्री ८.०० वाजता इरानदाकालम, रात्री १०.०० वाजता अर्धजामम. नित्य पूजेत अभिषेकम (पवित्र स्नान), अलंकारम (देवाला सजविणे), नैवेद्यम(देवाला नैवेद्य दाखविणे) आणि दीपआराधना केली जाते. एकाम्बरेश्वराचे लिंग वाळू पासून निर्माण झालेले आहे. त्यामुळे पिंडीच्या खालच्या भागाचीच पूजा प्रामुख्याने केली जाते. यावेळी नागस्वरम आणि तावील ही वाद्यं वाजविली जातात. सोमवार, शुक्रवार, प्रदोष, अमावस्या, कृतिका नक्षत्रातील पौर्णिमा आणि चतुर्थीला विशेष पूजा करतात.
फाल्गुन महिन्यात (मार्च- एप्रिल) ‘पायगुनी ब्रह्मोत्सव’ साजरा केला जातो. ‘कल्याणोत्सवम’ने या उत्सवाची सांगता होते. कांचीपुरम मधील सर्व मंदिरांत हा उत्सव लोकप्रिय आहे. दहा दिवस विविध प्रकारच्या वाहनावरून देवाची मिरवणूक काढली जाते. कल्याण महोत्सव म्हणजे सार्वजनिक विवाह उत्सव. या दिवशी एकाम्बरेश्वरा बरोबरच हजारो तरुण तरुणींचे विवाह मंदिरांत लावले जातात. हा विधी पाहण्यासाठी हजारो लोक येतात.
कसे जावे
चेन्नई ते कांचीपुरम ७८ किमी, महाबलीपुरम ७५ किमी, पॉंडेचेरी ११५ किमी, वेल्लोर ७० किमी, तिरुपती ११० किमी अंतरावर असून या सर्व ठिकाणांवरून बस सेवा उपलब्ध आहेत. बसस्थानकापासून पायी चालत जाता येईल. एवढ्या अंतरावर एकाम्बरेश्वरमंदिर आहे.
मंदिर वेळा : सकाळी ७.३० ते १२.०० सायं. ४.३० ते ७.३०
कधी जावे : ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात कांचीपुरमला जावे.
मंदिर व्यवस्थापन : तमिळनाडू सरकारच्या हिंदू रिलिजस अॅंड चरिटेबल एंडोमेंटस डिपार्टमेंट
संपर्क : एकाम्बरेश्वर मंदिर, कांचीपुरम. फोन- 044-27269773, मोबाईल 9443990773