आजही द्वारकेचा महिमा अगाध आहे. चार धामातील एक प्रमुख धाम आहे-द्वारका! तसेच सप्तपुरीतील एक प्रमुख नगरी आहे द्वारका!! साक्षात भगवंताचा वास ज्या द्वारकेत होता त्या द्वारकेचा महिमा अवर्णनीय आहे.
भारताच्या पश्चिम किनार्यावर गुजरात राज्यात असलेल्या व्दारकेला प्राचीन कालपासून खूप महत्व प्राप्त झालेले आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी आणि द्वारका या सात नगरांमध्ये असतांना मृत्यु आल्यास थेट मोक्ष प्राप्ती होते असे गरुडपुराणात सांगितले आहे. अशी ही मोक्ष मिळवून देणारी नगरी भगवान श्रीकृष्णाने वसविली आणि तिचा विकास केला. भगवान श्रीकृष्णाच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर आयुष्यात जन्माला येउन एकदा तरी पहावा असे प्रत्येक हिन्दू बांधवांना वाटते.
समुद्राने तब्बल सहा वेळा द्वारका गिळंकृत केली. सध्याची द्वारका ही सातव्यांदा उभारलेली नगरी आहे असे म्हणतात. समुद्रांत बुडालेल्या द्वारकेच्या रहस्याचा शोध घेण्याचे कार्य २००५ मध्ये सर्व प्रथम सुरु झाले. याकामी भारतीय नौदलाने मोलाचे सहकार्य मिळते आहे.स्कूबा डायव्हिंग द्वारे समुद्राच्या तळाशी जावून समुद्रांत बुडालेले द्वारकेचे अवशेष शोधून त्यावर संशोधन केले जात आहे.
हल्ली आपल्याला दिसणारी द्वारका सोळाव्या शतकांत बांधली आहे. द्वारकेतलं द्वारकाधीश जगत्मंदिर श्रीकृष्णाचा नातू राजा वज्र याने बांधले होते असे म्हणतात. हे पाच मजली मंदिर चुनखडी आणि दगड यांपासून बांधले आहे. या मंदिरावर दिवसातून पाच वेळा ध्वज चढविण्याचा उपक्रम आजही नित्यनेमाने केला जातो.
द्वारकेतीलं भगवान श्रीकृष्णाचे प्रमुख द्वारकाधीश मंदिर कांकरोली येथे राजसमंद तलावाच्या काठावर आहे. हे द्वारकेतील सर्वांत प्राचीन आणि प्रेक्षणीय मंदिर आहे. भगवान कृष्णाला इकडे रणछोडजी म्हणतात. गाभार्यात भगवान श्रीकृष्णाची चांदीच्या सिंहासनावर विराजमान चार फूट उंच चतुर्भुज मूर्ती आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणातुन घडविलेली आहे. देवाला सोने, चांदी, हिरे, मोती ,माणिक, पाचू यांपासून बनविलेले अनेक दागिने आहेत. सोन्याच्या अकरा माळा देवाच्या गळ्यात नेहमी घालतात. किंमती पितांबर देवाला परिधान करतात.
भगवंताला चार हात असून यांत शंख, सुदर्शनचक्र, गदा आणि कमळ धारण केलेले आहे. डोक्यावर सोन्याचा हिरे जडित मुकुट असतो. भाविक देवाला तुलशी आणि फुलं वाहतात. येथे भगवंतांनी कल्याण कोलम पद्धतीचा वेष म्हणजे अत्यंत श्रीमंतांच्या विवाह समारंभातील वेष परिधान केला आहे. द्वारकाधीशाला अशा प्रकारचे १०८ वेष आहेत. विविध प्रसंगी विविध प्रकारचे वेष द्वारकाधीशाला परिधान केले जातात. द्वारकाधीशाला अनेक प्रकारांनी सजवून त्याच्या विविध प्रकारांनी सेवा केल्या जातात.
पुष्टिमार्ग वैष्णवांचे संस्थापक वल्लभाचार्य आणि विठ्ठलेशनाथजी यांनी या सेवा पद्धती ठरवून दिल्या आहेत.द्वारकाधीश मंदिर हे पुष्टी मार्गातील प्रमुख मंदिर मानले जाते. यात मंगलशृंगार, ग्वाल, राजभोज, उत्थापनभोग, संध्या आरती आणि शयन आरती यांचा समावेश असतो. महाभारत, हरिवंश, भागवत,स्कन्दपुराण आणि विष्णु पुराण या प्रमुख पुराणांत द्वारकेचा उल्लेख आहे.
मंदिराच्या छतावर किंमती झुम्बर शोभून दिसतात. मंदिराच्या वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी जीने आहेत. पहिल्या मजल्यावर अम्बादेवीची मूर्ती आहे. पाच मजले असलेले हे मंदिर १४० फूट उंचीचे आहे. मंदिराच्या प्रवेशव्दाराला ‘स्वर्गद्वार’ तर बाहेर पडण्याच्या द्वाराला ‘मोक्षद्वार’ म्हणतात. या मंदिरातून गोमती नदी जिथे सागराला मिळते तो संगम दिसतो. श्रीकृष्णाच्या मंदिराशिवाय द्वाकेत वासुदेव, देवकी, रेवती, आणि बलराम यांची मंदिरं आहेत. त्याचप्रमाणे सुभद्रा, रुक्मिणीदेवी, जाम्बवती आणि सत्यभामा यांची प्रेक्षणीय मंदिरं आहेत.
द्वारकेच्या दक्षिणेला एक लांबट तलाव आहे. याला ‘गोमती तलाव’ असे म्हणतात. यावरूनच द्वारकेला ‘गोमती द्वारका’ असे म्हणतात. गोमती तलावाच्या वर नऊ घाट आहेत. येथे सरकारी घाटाजवळ निष्पाप कुंड’ नावाचे कुंड आहे. या कुंडात गोमती नदीचे पाणी असते. खाली उतरण्यासाठी पक्क्या पायर्या आहेत. सर्वप्रथम निष्पाप कुंडात स्नान करून द्वारकाधीशाचे दर्शन घेतात.
बेट द्वारकेच्या मार्गावर रुक्मिणी देवीचं स्वतंत्र मोठं मंदिर आहे. द्वारकाधीश मंदिरापासून सुमारे २ किमी अंतरावर हे मंदिर आहे. दुर्वास ॠषींच्या शापमुळे तिला हा एकांत भोगवा लागला अशी आख्यायिका आहे.
बेट द्वारकेला देखील द्वारकानाथाचे भव्य मंदिर आहे.
बेट द्वारकेला जाण्यासाठी होडीचा किंवा मोटरबोटीचा उपयोग करावा लागतो. बेटद्वारका येथील मंदिरांत ‘लक्ष्मी-नारायण’, ‘त्रिविक्रमा’, ‘जाम्बवतीदेवी’, ‘सत्यभामादेवी’ आणि ‘रुक्मिणीदेवी’ या प्रत्येकाच्या नावाने वेगवेगळी शिखरे आहेत. द्वारका ही चार धाम यात्रेतील महत्वाची नगरी आहे. आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेले द्वारकापीठ ही आजही महत्वाची संस्था आहे. त्यांनी स्थापन केलेली इतर पीठं श्रुन्गेरी, पुरी आणि ज्योतिर्मठ येथे आहेत. आदि शंकराचार्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन द्वारका पीठाची स्थापना केली.
काय पहावं :
द्वारकेत गेल्यावर द्वारकाधीश मंदिराप्रमाणेच नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, गोमती घाट, बेट द्वारका, गीता मंदिर,रुक्मिणी मंदिर,स्कूबा डायव्हिंग, सिद्धेश्वर महादेव मंदिर, भड्केश्वर महादेव मंदिर ही मंदिरं आवर्जुन पहावीत अशी आहेत. मोदी सरकारने गुजरात मध्ये पर्यटनाला उदयोगाचा दर्जा दिल्यामुळे गुजरात मधील सर्व धार्मिक स्थळं अधिकच देखणी व प्रेक्षणीय केली आहेत. हल्लीची द्वारका हे गोमतीच्या किनार्यावर उभारलेलं नियोजित आधुनिक शहर आहे. इथले रस्ते प्रशस्त आहेत. झाडांची आणि बगिचांची संख्या भरपूर आहे. इथली स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे.
कसं जावं :
विमानानं जायचं असेल तर जवळचं विमानतळ पोरबंदर १०१ किमी वर आहे. अहमदाबाद ओखा या रेल्वे मार्गावर द्वारका हे मोठे जंक्शन आहे. त्यामुळे जवळ जवळ सर्वच रेल्वे येथे थांबतात. रेल्वेचा प्रवास शांत सुरक्षित आणि स्वस्त असतो. द्वारकेसाठी बस मार्गही सुस्थितीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!