द्राक्षराम
दक्षिण भारतात भगवान शंकरांची अनेक भव्य आणि प्रेक्षणीय मंदिरं आहेत. यांत पंचरामक्षेत्र विशेष प्रसिद्ध आहेत. पंचराम क्षेत्रांत अमरराम किंवा अमरलिंगेश्वर, द्राक्षराम, सोमराम, क्षीरराम आणि कुमारराम किंवा भीमराम या पंचराम मंदिरांचा समावेश होतो. आज या पंचराम क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजेच द्राक्षराम मंदिराचा परिचय करून घेणार आहोत.
द्राक्षराम मंदिराला भिमेश्वर स्वामी या नावानेही ओळखले जाते. चालुक्य राजा भीमा याने ९ व्या शतकांत द्राक्षरामाचे भिमेश्वर स्वामी मंदिर बांधले असा उल्लेख येथील शिलालेखांवर आढळतो. चालुक्यांनंतर राष्ट्रकुटांनी हे राज्य जिंकले. त्यांनीही अकराव्या शतकापर्यंत या मंदिरांत अनेक सुधारणा केल्या. द्राक्षराम मंदिराच्या ४० किमीच्या परिसरात महादेवाची १०८ मंदिरं बांधलेली आहेत.
मंदिराच्या परिसरातच माणिकाम्बा नावाच्या देवीचे मोठे मंदिर आहे. देवीच्या ५१ शक्तिपिठात याचा समावेश होतो. सतीच्या शरीराचा एक भाग असलेला डावा गाल येथे पडला त्यामुळे येथे शक्तीपीठाची निर्मिती झाली. देवीचा चेहरा डावीकडे झुकलेला आहे. त्यामुळे या देवीला वामाचारी देवता म्हणतात व मानतात.
चालुक्य आणि चोल राजांच्या काळातील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. हे मंदिर दुमजली असून आतील प्राकारही दुहेरी आहेत. साधारणपणे महादेवाची मंदिरं अंधारलेली असतात. परंतु या मंदिरात मात्र भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा सदैव उपलब्ध असते. शिवाय इथल्या मंदिरावरील शिल्पकला, कलाकुसर आणि भक्कम बांधकाम हे जगभरतील आर्किटेक्चरचे विद्यार्थी आणि अभ्यासक वास्तूतज्ञ यांच्यासाठी मोठेच आकर्षण समजले जाते.
या मंदिरातील शिवलिंग स्फाटिकाचे असून ते १० फूट उंच आहे. लिंगाच्या वरच्या भागावर काळ्या रंगाचे पट्टे दिसतात. पारध्याच्या रूपातील भगवान शंकरांनी अर्जुनाशी युद्ध केले. त्यावेळी त्यांनी व्याघ्रचर्म परिधान केले होते. त्याची ही खूण असल्याचे सांगितले जाते. त्याचप्रमाणे स्फटिकासारखे असलेले हे शिवलिंग शुक्ल पक्षात पोर्णिमा येईपर्यंत दररोज थोडे थोडे उजळत जाते. तर वद्य पक्षात अमावस्येपर्यंत दररोज धुरकट होत जाते. मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे सूर्याची पहिली किरणं शिवलिंगावर पडतात.
शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर उंच गॅलरी बांधलेली आहे. मंदिराबाहेरच्या प्रवेशद्वाराला चार गोपुरं असून त्यातील पूर्वेच्या प्रवेशद्वाराला गोगुलाम्मा, पश्चिमेच्या गोपुराला नुकाम्बिका ,उत्तरेच्या गोपुराला मुढाम्बिका तर दक्षिणेच्या गोपुराला घट्टाम्बिका अशी नावं दिलेली आहेत. त्याच प्रमाणे या प्रत्येक देवतेची मूर्ती गोपुरावर कोरलेली आहेत. दक्षिणेच्या गोपुरातून मंदिरांत प्रवेश केला जातो. मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात पूर्वी सर्व भिंतींवर हिरे बसविलेले होते. त्यांच्या प्रकाशात देवाचे दर्शन घेता येत असे. पण काही धर्मकंटक सत्ताधिशांनी हे हिरे काढून नेले. त्याचे काप गेले पण भोकं आजही पहायला मिळतात.
गाभाऱ्याच्या आतल्या बाजूला नटराजेश्वर, वामन, विश्वेश्वर, नृत्यमुद्रेतला गणपती, कनक दुर्गा, अन्नपूर्णा यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला काशी विश्वेश्वराचे मंदिर देखील आहे. त्यामुळेच या स्थानाला दक्षिण काशी असेही म्हणतात. भारद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी सारख्या सात ॠषींनी येथे यज्ञ केला होता. त्याची आठवण म्हणून येथील कुंडाला सप्तकुंड म्हणतात. भाविक यात्रेकरू या कुंडात स्नान करतात त्यामुळे सात जन्माची पापं धुतली जातात अशी श्रद्धा आहे.
उत्सव
या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव फेब्रुवारी-मार्च महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला साजरा केला जातो. याच काळात भिष्म एकादशीला श्री स्वामी वरी कल्याणम नावाचा विवाह समारंभ आयोजित केला जातो. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात नवरात्री उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात ‘कथिका सोमवार’ उत्सव, ‘ज्वालाथोरानम उत्सव’ तर डिसेंबर महिन्यात भगवान शिवाची जयंती ‘शास्ती उत्सव’ नावाने साजरे केले जातात.
कसे जावे
आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातीळ काकीनाडा पासून २८ किमी, अमलापुरम पासून २५ किमी तर राजमुंदरी पासून ५० किमी अंतरावर असलेल्या रामचंद्रपुरम नावाच्या गावात द्राक्षराम मंदिर वसलेले आहे. काकीनाडा आणि राजमुंदरी येथे रेल्वे स्टेशन्स आहेत. येथून रामचंद्रपुरम पर्यंत नियमित बस, टॅक्सी, सेवा नियमित सुरु असते. बसचा मार्गही चांगला आहे. त्यामुळे खाजगी वाहनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.