कम्बोडियातील अंग्कोरवाटचे
जगातील प्राचीन आणि सर्वांत विशाल विष्णू मंदिर
मंदिरं आणि देवालये ही भारतीयांच्या धार्मिकतेची मूलभूत ओळख आहे. आदिवासी पाडयां पासून तर मोठ मोठ्या महानगरांपर्यंत कुठेही जा आपापल्या परिस्थितीनुसार लहान मोठी मंदिरं, देवालये पहायला मिळतात. भारताच्या गावागावांतील गल्ली बोळांत तर मंदिरं दिसतातच परंतु परदेशांत देखील भारतीय लोकांनी आपली ही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं/देवालये बांधलेली आहेत. मंदिरांविषयीचे भारतीयांचे हे प्रेम काही आत्ताचे नाहीये तर अगदी अनादि काळापासूनचे आहे. मागच्या लेखमालेत आपण भगवान शंकरांच्या ६० फूटांपासून २५३ फूट उंचीच्या ‘महाकाय शिवमूर्तीं’ची माहिती घेतली. आज पासून आपण ‘परदेशातील सुप्रसिद्ध मंदिरं’ : या सदरांत परदेशातील सुप्रसिद्ध प्राचीन आणि अर्वाचीन मंदिरांची माहिती जाणून घेणार आहोत.

मो. ९४२२७६५२२७
आज आपण भारतापासून ४८०० किमी अंतरावर असलेल्या जगातील सर्वांत जुन्या आणि अतिविशाल मंदिराची माहिती घेणार आहोत.
भारताच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच ‘आग्नेय’दिशेला ‘कम्बोडिया’ नावाचा देश आहे. या देशांत ‘अंग्कोरवाट’ या नावाचा जगातला सर्वांत मोठा आणि विशाल हिंदू मंदिरांचा परिसर आहे. ‘अंग्कोरवाट’चे जुने नाव ‘यशोधारपुर’ असे होते. १६२.६ हेक्टर म्हणजे १६२६००० वर्ग मीटर म्हणजेच ४०२ एकर जागेवर ही मंदिरं बांधण्यात आलेली आहेत. कम्बोडियाचे तत्कालीन सम्राट सूर्यवर्मन द्वितीय यांच्या शासनकाळात (१११२-५३ ई) या मंदिरांची निर्मिती झाली आहे.
दिल्लीच्या ‘अक्षरधाम’च्या चौपट मोठे मंदिर
कम्बोडिया देशांचे दोन समान भाग पडणार्या ‘मिकांग’ नदीच्या काठावर वसलेल्या ‘सिमरिप’ शहरातील हे मंदिर आजही जगातले सर्वांत मोठे मंदिर आहे. चारशे एकर मैलांवर हे मंदिर उभारलेले आहे. दिल्लीचे अक्षरधाम मंदिर शंभर एकर जागेवर उभारलेले आहे.यावरून अंग्कोरवाट मंदिर किती अवाढव्य आहे याची कल्पना येऊ शकते.विशेष म्हणजे कम्बोडियाच्या राष्ट्रध्वजावर देखील या मंदिराच्या चित्राला स्थान देण्यात आले आहे. जगातील सर्वांत लोकप्रिय असलेल्या या धार्मिक स्थानाला ‘यूनेस्को’ या नामवंत जागतिक संघटनेने विश्व धरोहर स्थळांमध्ये अग्रक्रम दिला आहे. येथे येणारे पर्यटक केवळ वास्तुकलेचे अनुपम सौन्दर्य पहायलाच येत नाहीत तर येथून दिसणारा रोजचा सूर्योदय आणि सूर्यास्त पहायला देखील येतात.
इसवी सन सुरु होण्यापूर्वी अनेक शतके अनेक भारतीय प्रवासी पूर्वेकडील देशांत स्थलांतरित झाले होते. कालांतराने याच लोकांनी हिंदचीन, सुवर्णद्वीप, वनद्विप, मलाया इत्यादि ठिकाणी अनेक राज्यांची स्थापना केली. उत्तरेकडील ‘कम्बूज’ वरूनच सध्याचे ‘कम्बोडिया’ नाव अस्तित्वात आलेआहे.काही विद्वानांच्या मते, भारताच्या पश्चिमोत्तर सीमेवरील कम्बोजांचा संबंध या भारतीय उप निवेशाशी होता. अनुश्रुतींनुसार या राज्याचा संस्थापक कौण्डिन्य ब्राह्मण होता. येथील एक संस्कृत अभिलेखांत देखील त्याचे नाव आढळते. नवव्या शतकात जयवर्मा तृतीय हा ‘कम्बुज’चा राजा होता.त्यानेच सुमारे इ.स. ८६० मध्ये अंग्कोरथोम (‘थोम’ म्हणजे राजधानी) नावाच्या आपल्या राजधानीचा पाया घातला. पुढे चाळीस वर्षे ही राजधानी दिवसेंदिवस वाढत राहिली. इ.स. ९०० पर्यंत ही राजधानी पूर्णत्वाला आली.या राजधानीच्या निर्मिती विषयी ‘कम्बूज’ साहित्यात अनेक कथा देखील प्रचलित आहेत.
आजचे अंग्कोरथोम एका विशाल महानगराचे अवशेष आहेत. त्याच्या चारी दिशांना ३३० फूट रुंदीचे ‘खंदक’ आहेत. हिंदीत याला ‘खायी’ म्हणतात. त्यावेळचे महानगर आणि पाण्याने भरलेले विशाल खंदक यांच्यात दगडी तटबंदी बांधलेली आहे. ही तटबंदी आजही भक्कम आणि सुस्थितीत आहे. प्राचीर मध्ये अनेक भव्य आणि विशाल महाद्वारं आहेत. त्रिशिर्ष दिग्ग्जांनी महाद्वारांच्या उंच शिखारांना जणु आपल्या मस्तकावर धारण केले आहे.पांच वेगवेगळया प्रवेश दारांनी पाच वेगवेगळे राजपथ नगराच्या मध्यापर्यंत पोहचतात. विविध आकारांच्या सरोवरांचे अवशेष आपल्या जीर्ण अवस्थेतही आपल्या निर्माणकर्त्याचे गुण गातात. या नगराच्या मध्यभागी भगवान शंकराचे एक विशाल मंदिर आहे. या मंदिराचे तीन भाग आहेत. प्रत्येक भागांत एक उंच शिखर आहे. मध्य शिखरांची उंची सुमारे १५० फूट आहे. या उंच शिखरांच्या चारही बाजूंना सुमारे ५० लहान लहान शिखरं आहेत. या सर्व शिखरांच्या चारी दिशांना समाधिस्थ अवस्थेतील शिव मुर्तींची स्थापना केलेली आहे. मंदिराची भव्यता आणि उच्च दर्जाची निर्मिती मूल्य पाहून आजही मनुष्य आश्चर्यचकित होतो. मंदिरांच्या भिंतींची इंच अन इंच जागा पशु,पक्षी,फुलं आणि नृत्यांगना सारख्या विविध आकृत्यांनी अलंकृत करण्यात आल्या आहेत.
वास्तुकला शास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे जगातील एक मोठेच आश्चर्य मानले जाते. भारताच्या प्राचीन पौराणिक मंदिर अवशेषांत तर एकमेव आहे. अंग्कोरथोम मधील मंदिरं आणि भवनं येथील प्राचीन राजपथ आणि सरोवरं या महानगराच्या समृध्दीचे सूचक आहेत. या अवशेषांवरून देखील त्याकाळी (जेव्हा पाश्चिमात्य जग रानटी अवस्थेत होते) हे महानगर किती विशाल आणि समृद्ध होते याची कल्पना येते. तसेच त्याकाळी कोणतीही साधनं नसतांना, तंत्रज्ञान विकसित झालेले नसतांना त्यांनी निर्माण केलेले हे भव्य दगडी कोरीव काम पाहून फक्त थककं होण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही. बाराव्या शतकाच्या सुमारास सूर्यवर्मा द्वितीय याने अंग्कोरधाम मध्ये भगवान विष्णुचे एक विशाल मंदिर बनविले. या मंदिराचे संरक्षण करण्यासाठी सुमारे ७०० फूट रुंदीचे खंदक तयार करण्यात आले. दुरून पाहिल्यावर हा खंदक एखाद्या तलावा सारखा दिसतो. मंदिराच्या पश्चिमेकडून खंदक ओलांडण्यासाठी एक पुल तयार केलेलाआहे. पुलानंतर मंदिरांत प्रवेश करण्यासाठी एक विशाल प्रवेशव्दार तयार करण्यात आले आहे. या प्रवेशव्दाराची रुंदी १००० फूट आहे.
मंदिराच्या भिंतींवर संपूर्ण रामायण दगडी शिल्पाद्वारे तयार करण्यात आले आहे.हे मंदिर पाहिल्यावर येथे रहण्यासाठी आलेल्या त्यावेळच्या भारतीय लोकांनी आपली भारतीय कला आणि संस्कृति हजारो मैलांवर जिवंत ठेवल्याचा आभिमान वाटतो. हे मंदिर पाहून अंग्कोरधोम ज्या कंबुज देशाची राजधानी होती तेथे प्राचीन काली देखील विष्णु, शिव, शक्ती, गणेश आदि देवतांची पूजा प्रचलित होती असे दिसते. या मंदिराच्या निर्मितीवर गुप्त कालीन संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसतो. अंग्कोरथोम चे नाव पूर्वी यशोधरपुर होते. या महानगराचा संस्थापक राजा यशोवर्मा ‘अर्जुन आणि भीम’ यांच्या सारखा शुर वीर, सुश्रुत सारखा विद्वान्, तसेच शिल्पकला,लिपि आणि नृत्य कलेत पारंगत होता.त्याने ‘अंग्कोरथोम’ आणि ‘अंग्कोरवाट’ शिवाय ‘कम्बूज’ च्या अनेक राज्यांतही त्याने अनेक आश्रम स्थापन केले .या आश्रमांत वेद, पुराण, रामायण, महाभारत आणि अन्य भारतीय ग्रंथांचे अध्ययन आणि अध्यापन केले जात होते. अंग्कोरवाट च्या हिंदू मंदिरांवर कालांतराने बौद्ध धर्माचा प्रभाव पडला.कालांतराने बौद्ध भिक्षुंनी या मंदिरांचा ताबा घेतला.
स्थापत्यकला
प्राचीन ख्मेर शैलीने प्रभावित असलेल्या या मंदिराच्या कॉरिडॉर्समध्ये पुराणातील बळी राजा वामन,स्वर्ग -नरक, समुद्रमंथन, देव दानव युद्ध, महाभारत, हरिवंश पुराण,तसेच रामयनातील अनेक प्रसंग दगडी शिल्पांत अतिशय आकर्षकपणे कोरलेले आहेत. येथील शिलाचित्रांत रामकथा संक्षिप्त रुपांत कोरलेली आहे. या शिल्पचित्रांची मालिका रावण वधासाठी देवतांनी केलेल्या आराधनेने सुरु होते. यानंतर सीता स्वयंवराचे दृश्य आहे. बालकांडातील या दोन प्रमुख घटनांनंतर ‘विराध’ उर्फ़ ‘कबंध’ वध चित्रण आहे. पुढच्या शिलाचित्रांत धनुष्य -बाण घेतलेले राम सुवर्ण मृगा मागे धावतांना दिसतात. यानंतर सुग्रीवाची रामाशी झालेली मैत्री दखाविलेली आहे.त्यानंतर वाली आणि सुग्रीव यांचे द्वन्द्वयुद्ध दाखविलेले आहे. पुढच्या शिलाचित्रांत अशोक वाटिकेत हनुमान येतात. त्यानंतर राम-रावण युद्ध, सितेची अग्निपरिक्षा आणि राम अयोध्येला परत येतात ही दृश्य पहायला मिळतात.
कम्बोडिया कुठे आहे?
कम्बोडिया ज्याला पूर्वी काम्पुचिया नावाने ओळखत तो दक्षिण पूर्व अशिया खंडातील एक प्रमुख देश आहे. या देशाची लोकसंख्या १ कोटी ४३ लाख आहे. नामपेह्न ही कम्बोडियाची राजधानी आहे. हिंदू,बौद्ध् ख्मेर,साम्राज्य या देशावर होते. कम्बोडियाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने वस्त्र उद्योग आणि पर्यटन यांवर आधारित आहे २००७ मध्ये केवळ अंग्कोरवाट मंदिराला भेट देणार्या विदेशी पर्यटकांची संख्या ४० लाखांपेक्षा अधिक होती.या वरून कम्बोडियातील अंग्कोरवाट चे भगवान विष्णु मंदिराचे जागतिक महत्व लक्षांत यावे! कलेच्या दृष्टीने अंग्कोरथोम आणि अंग्कोरवाट येथील अनेक महालं, असंख्य भवनं तसेच अनेक मंदिरं, देवालये यांचे अवशेष भारतीय संस्कृति आणि कलेचे महत्व अधोरेखित करतात. त्यामुळेच जगाच्या विविध भागांतून दरवर्षी लाखो पर्यटक या मंदिराला भेट देतांत.