गिनीज बुकांत नोंद झालेला
कोईम्बतूरचा ११२ फूटी आदियोगी शिव!
‘इंडिया दर्पण’च्या वाचकांना जगातील ‘महाकाय शिव मूर्तीं’ ही विशेष लेखमाला पसंत पडते आहे. याबद्दल सर्व सुज्ञ वाचकांचे मनापासून आभार.आजवर आपण देशातल्या मोठ मोठ्या ११ विशाल शिव मूर्तींची माहिती घेतली. आज आपण ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने ज्या विशालकाय महादेव मूर्तीची नोंद घेतली त्या कोईम्बतूरच्या आदियोगी शिव मूर्तीची माहिती घेणार आहोत….
तामिळनाडुतील कोईम्बतुर हे शहर आजवर येथे तयार होणार्या कॉटन आणि सिल्क साडयांसाठी प्रसिद्ध होते. आज मात्र येथील ‘ईशा फाउंडेशन’ आणि ‘विशाल शिवमुख मूर्ती’ मुळे कोईम्बतुरचे नाव जगाच्या आध्यात्मिक आणि धार्मिक नकाशावर झळकते आहे. केवळ भारतातीलच नाही तर परदेशातील विशेषत: अमेरिकेतील भाविक योग प्रेमी आणि पर्यटक येथे येतात ते आदियोगी शिव मूर्ती पहायला.
सध्या आध्यात्मिक गुरुंमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले धार्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या कल्पनेतून भगवान शंकरांची ही ११२ फूट उंच शिव मूर्ती २०१७ साली साकार करण्यात आली आहे.
येथे भगवान शिवाचा केवळ मुखवटा ११२ फूट उंच बनविण्यात आला आहे. भगवान शिवाच्या या मूर्तीतुन जीवनाचा उल्हास, जीवनाची स्थिरता आणि जीवनाची नशा याचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी सतत दीड वर्षे काम केले. जगभरातील लोकांना विशेषत: तरुण पिढीला योगाचे महत्व पटावे,त्यांच्यात योगाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी देशातील सर्वांत उंच आणि भव्य शिव मूर्ती तयार करवून घेतली आहे.
भारतीय योग शास्त्राचा जगभर प्रचार प्रसार व्हावा यासाठी आदियोगी शिव मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. आणि या मुर्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतल्या मुळे त्यांचा हा उद्देश बहुतांशी सफल झाला आहे. या मूर्ती पेक्षा मोठ्या शिव मूर्ती जगात आहेत.परंतु येथील आदियोगी शिवाचा फक्त मुखवटाच गळा,चेहरा आणि डोक्यावरील जटा यांची उंची ११२ फूट आहे. शिवाची लांबी ४५ मीटर (१४७ फूट) आणि रुंदी २५ मीटर (८२ फूट) आहे. संपूर्णपणे स्टील पासून तयार करण्यात आलेल्या या आदियोगी शिव मूर्तीचे वजन ५०० टन आहे. हे जागतिक रेकॉर्ड झाले आहे.
भगवान शिवाला योगाचा प्रवर्तक मानतात. त्यामुळेच या विशाल आकाराच्या शिवमूर्तीला आदियोगी म्हणजे पहिला योगी असे नाव देण्यात आले. कोईम्बतुर येथील आदियोगी शिवाच्या ३४ मीटर म्हणजेच ११२ फूट उंचीच्या शिव मूर्तीची प्रतिष्ठापना २४ फेब्रुवारी २०१७ या दिवशी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभ हस्ते महाशिवरात्रीच्या पावन दिवशी आदियोगी शिव प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले. आदियोगी शिव मूर्तीच्या अनावरण प्रसंगी गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिलेले व सुप्रसिध्द गायक कैलाश खरे यांनी गायिलेले ” आदियोगी द सोर्स ऑफ योगा” हे गीत ईशा फौन्डेशनने प्रकाशित केले आहे. भगवान शिव हे आदियोगी होते ही गोष्ट तरुण पिढीच्या मनावर बिंबविण्यासाठी, तरुणाईला योग मार्गाकडे आकर्षित करण्यासाठी जगातील सर्वांत उंच शिव मुखाची निर्मिती ईशा फाउंडेशनने केली. सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी स्वत: आदियोगी शिवाच्या या विशाल चेहेर्याचे डिझाइन तयार केले. चेहेर्यावरील भाव हुबेहूब उमटावेत यासाठी त्यांनी सतत दीड वर्षे मेहनत घेतली.
पश्चिम घाटांच्या श्रुंखलेत वेल्लीयांगिरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कोईम्बतुर येथील ईशा योग केंद्राच्या परिसरांत आदियोगी शिव मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. ही शिव मूर्ती घडविण्यासाठी दोन वर्षे आठ महिने (म्हणजे ३० महिने) लागले. मानव तंत्रात ११२ चक्र असतात त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही शिव मूर्ती ११२ फूट उंच करण्यात आल्याचे सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी एका मुलाखतीत सांगितले.
नजिकच्या भविष्य काळात ईशा फाउंडेशनद्वारे वाराणशी, मुंबई आणि दिल्ली येथे अशा प्रकारच्या तीन विशाल शिव मुर्तींची स्थापना करण्याची योजना असल्याचे सांगितले जाते. ईशा फाउंडेशन ही तमिलनाडुतील सुप्रसिद्ध संघटना आहे. आध्यात्मिक सद्गुरू जग्गी वासुदेव १९९२ पासून ईशा फाउंडेशनचे नेतृत्व करतात. या संस्थेत सुमारे २० लाख स्वयंसेवक आहेत. योगाचा प्रचार प्रसार, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कार्यात ईशा फाउंडेशनचा सक्रिय सहभाग असतो.
ईशा फौन्डेशनचे प्रमुख कार्यालय (आश्रम) कोईम्बतुर येथे असून त्यांची अमेरिकेतील ईशा इंस्टीट्यूट ऑफ इनर सायन्सेस ही आध्यात्मिक संस्थाही योग प्रसार, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक कार्यात आघाडीवर आहे.
योग प्रसार हे ईशा फौन्डेशनचे प्रमुख कार्य आहे. ईशा योगांमध्ये ध्यान, प्राणायाम शांभवी महामुद्रा शिकविली जाते. कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी ,व्यवस्थापक आणि संचालक या सर्वांना ईशा फौन्डेशन व्दारे योगाचे प्रशिक्षण दिले जाते.१९९८ साली तुरुंगातील कैद्यांना देखील योग प्रशिक्षण देण्यात आले.१९९७ पासून अमेरिकेतील लोकांना योग प्रशिक्षण देण्याचे कार्य संस्थे तर्फे मोठ्या प्रमाणात केले जाते. आजच्या घडीला अमेरिकेत लोकांना योग प्रशिक्षण देण्यात ईशा फौन्डेशन आघाडीवर आहे.
ईशा फौन्डेशनचे पर्यावरण संरक्षणाचे कार्य तर खरोखर कौतुकास्पद आहे. तमिलनाडुत अकरा कोटी वृक्ष रोपण करण्याची त्यांची महत्वाकांक्षी योजना आहे.१७ ऑक्टोबर २००६ या दिवशी तमिलनाडुतील २७ जिल्ह्यांत एकाच दिवशी ८.५२ लाख रोपांची लागवड करुन ईशा फौन्डेशनने विश्व विक्रम केला. त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या कार्याचा २००८ साली इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
ईशा फौन्डेशनने जगभरात योगाचा प्रसार करण्याच्या उद्देश्याने तमिलनाडुतील कोईम्बतुर येथे आदियोगी शिवाची ११२ फूट उंच मुर्तीची स्थापना केली आहे. योग प्रसाराच्या त्यांच्या कार्याचे मोल जाणुनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जगप्रसिद्ध आदियोगी शिव मूर्तीचे अनावरण केले आहे. आणि जगप्रसिद्ध गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने जगातील सर्वांत उंच शिव मुर्तीची दखल घेतल्याने ईशा फौन्डेशनच्या योग प्रसार कार्याला चांगलाच वेग प्राप्त झाला आहे.
भारताचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांनी २०१९ च्या महाशिवरात्रीच्या दिवशी “आदियोगी दिव्य दर्शनम” या नावाच्या थ्री डी लेसर शो चे उद्घाटन केले. या थ्री डी लेसर शो द्वारे भगवान शंकराने मानव जातीला योगशास्त्र समजावून दिले आहे. १४ मिनिटांचा हा ध्वनी प्रकाशाचा लेसर शो आदियोगी शिव मूर्तीवर प्रोजेक्ट केला जातो. प्रत्येक वीक एन्डला तसेच विशेष उत्सव प्रसंगी ‘आदियोगी दिव्य दर्शनम लेसर शो’ दाखविला जातो. विशेष म्हणजे २०२० साली टेक्नोलॉजी इन एंटरटेनमेंटइन द हाउस ऑफ वर्शिप या गटात ‘आदियोगी दिव्य दर्शनम’ या थ्री डी लेसर शोला Mondo dr.EMEA & APAC अॅवार्डने गौरविण्यात आले आहे.
संपर्क : आदियोगी शिव स्टॅच्यु द्वारा ईशा फौन्डेशन
महाशिवरात्री ग्राउंड, इशान विहार, वेलिंगिरी फूट हिल्स, तामिळनाडू- 641114
वेळ : सकाळी ६ वाजे पासून फोन: 0830008311
column rauli mandiri coimbatore aadiyogi shiv vijay golesar
Temple Gunnies World Record