इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी
पुन्हा कुरुक्षेत्रावर अवतरले
भगवान श्रीकृष्णाचे विराट रूप !
भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायांत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विराट रूप दाखविल्याचे सगळ्या जगाला माहित आहे. बी.आर.चोप्राच्या महाभारत या सुप्रसिद्ध मालिकेतही श्रीकृष्णाचे हे विराट स्वरूप पाहिले होते . भगवान श्रीकृष्णाचे तेच विराट स्वरूप आता कुरुक्षेत्रावर कायमस्वरूपी पहायला मिळणार आहे.
कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली आणि जेथे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले विराट रूप दाखविले त्याच जागेवर गुरुवार दिनांक ३० जून रोजी भगवान श्रीकृष्णाच्या ४० फूट उंचीच्या विराट स्वरूपातील अष्टधातूच्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. श्रीकृष्णाच्या विराट स्वरूपातील ४० फूट उंचीच्या या मुर्तीचा भगवान श्रीकृष्णाच्या जगातील सर्वांत उंच मूर्तीमध्ये समावेश करण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्णाचे विराट स्वरूप नावाची ही भव्य मूर्ती कुरुक्षेत्र पासून १२ किमी अंतरावर असलेल्या ज्योतिसार धाम या सुप्रसिद्ध ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे.
हरयाणा सरकार, कुरुक्षेत्र विकास मंडळ आणि हरयाणा पर्यटन विकास महामंडळ यांनी या भगवान श्रीकृष्णाच्या विराट स्वरूपातील मूर्तीची निर्मिती आणि स्थापना केली आहे. भगवान श्रीकृष्णाची विश्वरूप स्वरूपातील ४० फूट उंचीची ही भव्य मूर्ती तयार करण्यासाठी हरयाणा सरकारने गुजरात मधील सरदार सरोवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टेचू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वांत उंच पुतळा तयार करणार्या डॉ. राम वानजी सुतार यांच्यावरच ही कामगिरी सोपविली.
डॉ राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांनी ८० कारागिरांच्या मदतीने तीन वर्षांत ४० फूट उंच आणि ३४ टन वजनाची ही मूर्ती तयार केली. दिल्ली जवळच्या नोयडा येथे सुतार यांच्या स्टूडियोत ही मूर्ती तयार करण्यात आली. त्यानंतर ८ मोठ्या ट्रकमधून ही मूर्ती हरयाणातील कुरुक्षेत्र येथे नेण्यात आली. येथे श्रीकृष्णाची ही मूर्ती उभारण्यासाठी १० फूट उंच पाया तयार करण्यात आला.त्यावर मोठ मोठ्या क्रेन्सच्या सहाय्याने मूर्तीचे ८ भाग जोडण्यात आले.
श्रीकृष्णाचे विराट स्वरूपाचे दर्शन घडविणारया या मूर्तीत श्रीकृष्णासोबत श्रीगणेश, ब्रह्मदेव, शिवजी, श्री विष्णुचे नृसिंह रूप,हनुमान, भगवान परशुराम,अग्निदेव देखील आहेत.डोक्यावर फणा उभारून सावली देणारा शेषनागही आहे. अष्टधातूच्या या मूर्तीत ८५ टक्के तांबे,१५ टक्के अन्य धातूंचा वापर करण्यात आला आहे.
कुरुक्षेत्राला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी हरयाणा सरकारने कंबर कसली आहे. देशातील आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ज्योतिसार धामला नवे रूप देण्यात येत आहे. येथे सुमारे एक लाख स्क्वेअर फूट जागेवर विविध प्रकल्प आकर घेत आहेत.हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर दररोज १०,००० पेक्षा अधिक पर्यटक येथे येतील अशी अपेक्षा आहे.
कुरुक्षेत्र विकास मंडळाने ज्योतिसार, ब्रह्मसरोवर,संहित सरोवर,नर्कतारी बाणगंगा, अभिमन्यु टेकडी यांच्या विकास कामांना अग्रक्रमाने प्राधान्य दिले आहे. महाभारतावर आधारित थीमपार्क देखील तयार करण्यात येत आहे. लवकरच या संपूर्ण प्रकल्पाचे लोकार्पण येईल. हरियाणा सरकारच्या सरस्वती हेरिटेज बोर्ड कुरुक्षेत्र पर्यटन विकासाला चलना देण्यासाठी दहा किमी लांबीचा ‘बोट-वे’ तयार करीत आहे. त्यासाठी १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.हा ‘बोट-वे’ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील बीर पिपली गावाजवळच्या प्राचीन सरस्वती तीर्था पासून ज्योतिसार धाम पर्यंत नेण्यात येईल.
कुरुक्षेत्रा विषयी प्रत्येक भारतीयांना आकर्षण आहे. हजारो वर्षापूर्वी येथे झालेले महायुद्ध आणि भगवान श्रीकृष्णाने रणांगणावर अर्जुनाला सांगितलेली गीता भारतातीलच नाही तर जगभरातील लोकांच्या आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे आधुनिक काळातील नवीन कुरुक्षेत्र पहायला जगभरातील पर्यटक लाखोंच्या संख्येने येतील यात संशय नाही!’