हिमालयाच्या नर आणि नारायण या दोन पर्वत रांगातील सपाट जागेवर विसावलेलं बद्रीनाथ सगळ्या भारतीयांच्या मनांतील श्रद्धास्थान आहे. जन्माला आल्यासरशी आयुष्यातून निदान एकदा तरी बद्रिनाथला जावे अशी प्रत्येक हिंदूंची इच्छा असते. कारण चारधाम यात्रेतील बद्रीनाथ, रामेश्वरम्, सोमनाथ आणि जगन्नाथपुरी यांतील हे महत्वाचे स्थान आहे. बद्रिनाथाच्या दर्शनाने मनुष्य जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो अशी श्रद्धा आहे.
परमपवित्र बद्रीनाथ उत्ताराखंडातील चमोली जिल्ह्यांत वसले आहे. बद्रीनाथ हे तीर्थक्षेत्र नीलकंठ पर्वताच्या पार्श्वभूमीवर शोभून दिसते. इथे खूप मोठ्या प्रमाणात सर्वत्र बोरिची झाड़ आहेत.पूर्वी तर येथे बोरींच्या झाडांचे घनदाट जंगल हजारो मैल पसरलेले होते. त्यावरुनच या ठिकाणाला नाव पडले ‘बदरी’. त्याचंच पुढे झालं बद्रीनाथ!
अतिप्राचीन तीर्थस्थान असल्यामुळे अनेक प्राचीन वैदिक आणि पौराणिक धर्मग्रंथांत बद्रीनाथचा उल्लेख आढळतो. आठव्या शतकांत आलवार संतांनी रचलेल्या ‘नालयिर दिव्य प्रबंध’ या ग्रंथांत बद्रीनाथाचा महिमा सर्वप्रथम वर्णन केलेला आढळतो. पूर्वी हे महादेवांचे वसतिस्थान होते. परंतु विष्णुंनी येथे बसण्याचा हट्ट केल्यामुळे भगवान शिव थोडे पुढे सरकले आणि केदारनाथाला स्थायिक झाले अशी एक दंतकथा सांगितली जाते.
दुसर्या दंतकथेनुसार गंगा नदी स्वर्गातुन पृथ्वीवर आली. तिचे बारा प्रवाह पृथ्वीवर आले. त्यातला एक प्रवाह केदारनाथवर पडला. त्यालाच अलकनंदा नदी म्हणतात. श्रीमद्भागवतात देखील बद्रीनाथ,त्याच्या जवळचे नर व् नारायण पर्वत आणि अलकनंदा नदी यांचा उल्लेख आहे. समुद्रसपाटीपासून हे अंतर ३१३३ मीटर( १०,२७९ फुट) उंचीवर आहे. बद्रीनाथ हे भगवान विष्णुंचे देशातीलच नाही तर जगातील सर्वश्रेष्ठ स्थान आहे.
अलकनंदा नदीच्या उजव्या काठावर वसलेल्या बद्रीनाथ मंदिराचे प्रवेशद्वार रंगीत असून मंदिर दगडी बांधनीचे आहे. पन्नास फूट उंचीच्या चोथर्यावर हे मंदिर बांधलेले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार १५ मीटर उंचीचे असून त्यावर अहिल्याबाई होळकरांनी स्थापन केलेले तीन सुवर्ण भाविकांचे लक्ष्य वेधून घेतात.या प्रवेशद्वाला सिंहव्दार म्हणतात.
मुख्य मंदिराचे दोन भाग आहेत. पहिल्याभागात गरुड, हनुमान आणि लक्ष्मीदेवी यांची लहान लहान मंदिरं आहेत. मंदिराच्या प्रांगणांत चारी दिशांना ही मंदिरं आहेत.
मंदिराच्या दुसर्या भागांत श्रीबदरीनारायण विष्णुची मुख्य मूर्ती आहे. येथे बदरीनारायणाची एक मीटर उंचीची काळया शालिग्राम दगडापासून बनविलेली चतुर्भुज मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे. कुणी तयार केलेली नाही अशी श्रद्धा आहे. बद्रिनाथाच्या मुकुटावर मोठा चमकदार हिरा आहे. मूर्तीच्या आजूबाजूला नर, नारायण, कुबेर, उद्धव आणि नारदमुनि यांच्या मूर्ती आहेत. हीच या मंदिरातली मुख्य वेदी आहे. यांचीच पूजा, अर्चा, दर्शन करून मानव जन्म-मरणाच्या फेर्यातुन मुक्त होतो असे मानले जाते.
सहा महीने बर्फांत अच्छादलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे ज्यांना ‘कपाट’ म्हणतात, अक्षय्यतृतीयेच्या दिवशी एप्रिल महिन्याच्या शेवटी उघडले जातात. यंदा ते १३ में पासून उघडले आहेत. आता ते नोव्हेंबर पर्यंत दर्शानासाठी उघडे राहतील. त्यानंतर नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत हिमालयातील बर्फाळ वातावरण व वादळी हवामानामुळे सहा महिने हे मंदिर बंद असते. या काळांत बद्रिनाथाची मूर्ती जवळच्या ज्योतिर्मठात ठेवलेली असते. केरलातील नम्बुदरीपाद ‘रावल’ ब्राह्मणच बद्रीनाथमंदिराचे पारंपरिक पुजारी आहेत.
तीर्थक्षेत्र म्हणून तर बद्रीनाथ महान आहेच.परन्तु हिमालयातला इथला निसर्गही अत्यंत मनोहारी आहे. हिमाच्छादित उंचच उंच पर्वतकड़े आणि त्यांच्याशी बरोबरी करणारी हिरवीगार झाड़ी, उंच कडयांवरून उड्या मरणारे जलप्रपात आणि स्फटिकासारखी स्वच्छ, शीतल अलकनंदा पाहून माणसाचे मन तृप्त न झाले तरच नवल!
इथं आल्यावर का्य पहावे आणि का्य सोडावे अशी अवस्था होते. तरीही येथे आल्यावर पवित्र नीलकंठ पर्वत, प्राचीन परंपरा असलेले तप्त पाण्याचे कुंड, नारदकुंड, पवित्र चरण पादुका,नैसर्गिक वसुंधरा धबधबा, धार्मिक महत्व असलेले ब्रह्मकपाल, शेषनेत्र ही ठिकाणे अवश्य पहावित.
कसे जावे? : बद्रीनाथला जाण्यासाठी जवळचं विमानतळ ३१७ किमीवर देहरादून येथे आहे. रेल्वेने जायचे असेल तर ३०० किमीवर हृषीकेशं किंवा ३१० किमीवर हरिद्वार हे रेल्वेस्टेशन आहे. येथून बस किंवा खाजगी गाड्यांनी बद्रिनाथला जाता येते. हल्ली हेलीकॉप्टर सेवा देखील उपलब्ध झालेली आहे.
मंदिर प्रशासक : बद्रीनाथ मंदिर उत्तर प्रदेश सरकार अधिनियम ३०/१९४८ मध्ये मंदिर अधिनियम १६/१९३९ अंतर्गत सामिल करण्यात आले.नंतर याचेच नाव श्रीबद्रिनाथ तथा श्रीकेदारनाथ मंदिर अधिनियम असे करण्यात आले.सध्या उत्तराखंड सरकारव्दारा निर्देशित १७ सदस्यीय समिति या दोन्ही देवस्थानांचे प्रशासन पाहते.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!