श्रावण मास विशेष…
अबब! केवढा मोठ्ठा महादेव!
भगवान शिवाच्या अनेक नावांपैकी महादेव हे एक नाव प्रसिद्ध आहे. आजवर आपण भगवान शिवाच्या मोठ्या, खूप मोठ्या आणि अतिभव्य मंदिरांची माहिती आपण पाहिली आहे. भगवान शिव हा आपल्या भारताचा मूलभूत देव आहे.त्यामुळे संपूर्ण देशांत शिवाची आराधना केली जात नाही असे गाव नाही. राजा महाराजां पासून तर दरिद्री माणसा पर्यंत सर्व त्याचे भक्त आहेत. आजही आपल्या देशांत सर्वांत जास्त शिव मंदिरं बांधली जातात. एवढच नाही तर या भोळया शंकरा वरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शिवाच्या मोठ मोठ्या मूर्ती अनेक भक्त अनेक ठिकाणी स्थापन करतात. या मूर्तींची भव्यता,अवाढव्य आकार पहिल्या नंतर आपल्याला भगवान शंकराला महादेव का म्हणतात हे मनापासून पटते.आणि तोंडातून शब्द बाहेर येतात, ‘अबब! केवढा मोठ्ठा आहे हा महादेव’! जगातल्या सर्वांत मोठ्या शिव मुर्तीची माहिती आज आपण घेणार आहोत.
स्टॅच्यु ऑफ बिलिफ नाथद्वार : जगातली सर्वांत उंच शिव मूर्ती
नमनाला घडाभर तेल वाया न घालविता मी पहिल्यांदाच सांगतो, भगवान शंकरांची जगातली सर्वांत उंच मूर्ती आपल्या देशांतच आहे. राजस्थान मधील उदयपुर पासून ६२ किमी अंतरावर असलेल्या नाथद्वार येथे तयार करण्यात आलेली भगवान शंकराची ही मूर्ती जगात सर्वांत मोठ्ठी आहे. ३५१ फूट उंचीच्या या शिव मूर्तीला ‘स्टॅच्यु ऑफ बिलिफ’ म्हणजे ‘विश्वासाची मूर्ती’ असे म्हणतात.’
मिराज ग्रुप’ चे संचालक मदनलाल पालीवाल यांनी ही शिव मूर्ती तयार केली आहे. भगवान शंकरांची ही मूर्ती भारतातील दुसर्या क्रमांकाची भव्य मूर्ती आहे. तिच्यापेक्षा मोठी मूर्ती गुजरात येथील सरदार सरोवर येथे वल्लभभाई पटेल यांची आहे. आजच्या घडीला मात्र भगवान शिवाची ही जगातली सर्वांत मोठी मूर्ती आहे. या मुर्तीची भव्यता पाहून मनुष्य भारावून जातो आणि थकक होतो. ‘स्टॅच्यु ऑफ बिलिफ’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या अतिभव्य भगवान शंकरांच्या मुर्तीची उंची ३५१ फूट आहे. मूर्ती ज्या दगडावर विराजमान झालेली आहे तो बेस (पाया) ११० फूट उंच आहे. भगवान शिवाचा पायाचा पंजा ६५ फूट उंच असून १५० फूट उंचीवर शिवाचे गुडघे आहेत.गुडघ्यां पासून कंबर१७५ फूट उंचीवर असून भगवान शिवाचे खांदे २८० फूट उंचीवर आहेत. भगवान शंकरांचा केवळ चेहेराच ६० फूट उंच असून त्यांच्या जटांची उंची १६ फूट आहे.आणि हो भगवान शिवाच्या हातातला त्रिशूल ३१५ फूट उंच आहे.
नाथद्वार येथील स्टॅच्यु ऑफ बिलिफ समोर उभं राहिल्यावर भगवान शिवाला महादेव का म्हणतात याचे उत्तर मिळते. भगवान शिवाच्या या अति भव्य मूर्ती समोर शिवाचे वाहन असलेला असाच २५ फूट उंचीचा आणि ३७ फूट लांबीचा विशाल नंदी तयार करण्यात आला आहे. हा नंदी तयार करायलाच २ महिने लागले. भगवान शिवाच्या या भव्यत्तम मुर्तिचा पाया एका उंच टेकडीवर घेतला असून तो चंदेरी रंगाचा आहे. महादेवाची ही भव्य मुर्ती कॉपर कलरने कोटिंग केली आहे. या कॉपर कलर मुळे या मूर्तीला पुढची किमान २० वर्षे सूर्य प्रकाश आणि पावसा पासून धोका होणार नाही असे म्हणतात.
भगवान शिवाच्या या मूर्तीच्या माथ्यावर पाण्याच्या २ मोठ्या टाक्या तयार करण्यात आल्या आहेत.यातील एक टाकीतील पाणी शिव मूर्तीला दररोज जलाभिषेक करण्यासाठी वापरण्यात येते तर दूसरी टाकी इमर्जन्सी साठी तयार करण्यात आली आहे. मूर्तीच्या आत चार मोठ मोठ्या लिफ्ट्स बसविण्यात आल्या आहेत. यातील दोन लिफ्ट्स व्हीआयपींसाठी तर दोन लिफ्ट्स सर्व सामान्य दर्शकांसाठी उपलब्ध आहेत.यातील खालच्या दोन लिफ्ट्सने ११० फूट उंचीवर जाता येते तर दुसर्या दोन लिफ्ट्सनी २८० फूट उंचीवर जाता येते. २८० फूट उंचीवर भगवान शिवाचे खांदे आहेत. भगवान शिवाच्या डाव्या आणि उजव्या बाजुच्या खांद्यावर दोन बालकन्या तयार करण्यात आल्या आहेत. येथून नाथद्वार शहराचे २० किमी पर्यंतच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते.
याशिवाय मूर्तीच्या रोजच्या देखभाली साठी ३ स्टेप्स देखील तयार करण्यात आल्या आहेत. येथूनच भाविक भगवान शिवाचे दर्शन घेतात. पूजा करतात. भगवान शिवाच्या या महामूर्तीला प्रदक्षिणा घालण्यासाठी ३०० फूट लांबीचा तसेच १.५ किमी लांबीचा असे दोन प्रदक्षिणा मार्ग तयार करण्यात आले आहेत. येथे येणारया पर्यटकासाठी आणि भाविकांसाठी ३ विशाल गार्डन्स विकसित करण्यात आले आहेत. त्यांना हर्वल गार्डन, टेरिश गार्डन आणि मेज गार्डन अशी नावं देण्यात आली आहेत.याच प्रमाणे प्रशासकीय इमारती, रेस्तरंट्स, मार्केट, म्युझिकल कारंजे, आणि ओपन प्लॅटफॉर्म्स देखील उपलब्ध आहेत.
भगवान शिवाच्या या मूर्ती भोवतीचा सुमारे २५ एकरचा भाग अतिशय आकर्षक पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. समोरच मिराज ग्रुपचे भव्य शोपिंग सेंटर आणि लिव्हिंग कॉम्पलेक्स देखील पहायला मिळतात. ही विशाल शिव मूर्ती रात्री देखील दुरून दिसावी यासाठी विशिष्ट प्रकारची लायटिंग करण्यात आली आहे. या लायटिंगचे काम सुप्रसिद्ध क्रिकेट पटू कपिल देव यांच्या मास्को कंपनीने केले आहे. त्या निमित्ताने कपिल देव देखील येथे येउन गेले आहेत.
‘स्टॅच्यु ऑफ बिलिफ’ची ही मूर्ती मानेसर गुरगाव येथील प्रसिद्ध मूर्तिकार नरेश कुमावत यांनी तयार केली असून कोटा येथील हैंगिंग ब्रिज बनविणारया ‘शापुरजी पालन ‘ या कंपनीने या मूर्तीचे फिटिंग केले आहे. कसे जावे: नाथद्वारला येण्यासाठी मावली जंक्शन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. मावली जंक्शन पासून ४५ मिनिटांत बस, रिक्षा ,किंवा खाजगी वाहनाने नाथद्वारला पोहचता येते. उदयपूर पासून नाथद्वार ६२ किमी अंतरावर आहे.
महत्वाची सूचना : कोविड लॉकडाऊन मुळे महादेवाच्या या स्टॅच्यु ऑफ बिलिफ नाथद्वारचे बांधकाम थांबले होते. ते पूर्ण झाले आहे. मात्र पर्यटकांना प्रवेश दिल्याची खात्री करुनच येथे जावे.