इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी
बिजापुरचा ८५ फूटी शिवगिरी महादेव!
आपल्या देशांत भगवान शंकराची असंख्य मंदिरं आहेत. १०० एकरच्या जागेपासून तर एखाद्या लहानशा कंजस्टेड जागी देखील भगवान शिवाची पिंड पहायला मिळते. अनेक ठिकाणी शिवाच्या मोठ मोठ्या मूर्ती देखील पहायला मिळतात. भगवान शिवाची अति भव्य मंदिरं त्यावरील कलाकुसर पाहून भाविक आश्चर्यचकित होतात. ही मंदिरं आणि शिवाच्या आकाशाला भिडणार्या विशाल मूर्ती पाहून मन थक्कं होतं. भगवान शिवाच्या या छाती दडपूण टाकणार्या मूर्ती पाहण्यासाठी त्या त्या राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातून आणि जगातून देखील भाविक व पर्यटक आवर्जुन येतात. अशाच एका भव्य शिव मुर्तीची माहिती आज आपण करून घेणार आहोत.
भगवान शंकराची ही मनोवेधक मूर्ती थोड़ी थिडकी नाही तर चक्कं ८५ फूट उंच आहे. कर्नाटकातील ‘बिजापुर’ जवळ असलेल्या कंदुका पहाडावरील मुरुदेश्वर मंदिरांत भगवान शंकरांची ही मूर्ती ‘बिजपुरचा शिवगिरी महादेव’ या नावाने प्रसिद्ध आहे. ध्यानस्थ बसलेली भगवान शिवाची ही साधना मुद्रेतील अवाढव्य मूर्ती पाहून भाविक या मूर्तीत दंग न झाला तरच नवल!
भगवान शिवाची ही ८५ फूट म्हणजेच सुमारे २६ मीटर उंच शिवमुर्ती बिजापुरच्या सुप्रसिद्ध टी.के. पाटील चैरिटेबल ट्रस्ट यांनी बिजापुर (विजयापूर) येथे तयार करवून स्थापन केली आहे. बिजापूरच्या ‘संदगी रोड’ वर ही मूर्ती पहायला मिळते. हे नवीन धार्मिक ठिकाण हळूहळू नावारुपाला येत आहे. १५०० टन वजनाची ही शिवमूर्ती देशातील दुसरी सर्वांत मोठी आणि वजनदार मूर्ती असल्याचे मानले जाते. शिमोगा येथील शिल्पकाराने १३ महिने रात्रंदिवस अथक काम करून ही मूर्ती घडविली. या मुर्तिचं सिव्हिलियन डिज़ाइन बेंगलुरु च्या आर्किटेक्टनी तयार केले.
बिजापुर पासून जवळच असलेल्या बसंत वनांत उभारलेली ही शिव मूर्ती ८५ फूट उंच असून स्टील आणि सिमेंटचा उपयोग करून ही मूर्ती घडविली आहे. देशांतील सर्वांत उंच १० शिवमूर्तींमध्ये ‘शिवगिरी महादेव शिव मूर्ती’चा समावेश केला जातो.
कुठे आहे ही शिवमूर्ती ?
बिजापुर पासून ३ किमी अंतरावर असलेल्या अक्काली रोडवर ‘रामपुर’ (कानडी उच्चार ‘राम्बपूर’) नावाच्या खेडयांत असलेल्या ‘कंदुका पहाडा’च्या शिखरावर ही मूर्ती स्थापन केलेली आहे. जवळच असलेल्या डोडावेले सिड्दरागुडा या सर्वोच्च शिखारा वरुनही हे मंदिर व मूर्ती दिसते. २००६ साली २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र होती. याच दिवशी शिवगिरीच्या विशाल महादेव मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले.
कसा दिसतो शिवगिरी महादेव?
शिवगिरी येथील महादेव शांतपणे डोळे मिटून ध्यानस्थ बसलेले आहेत. चेहेर्यावर अत्यंत शांत भाव.डोक्यावर जटा, रुद्राक्ष माला आणि चंद्र शोभातोय. मागच्या बाजुच्या डाव्या हातांत त्रिशूल आणि डमरू असून उजवीकडील हातांत शंख धारण केलेला आहे. पुढचे दोन्ही हांत ध्यानमुद्रेत दोन्ही गुडघ्यांवर निश्चल ठेवलेले आहेत. भगवान शिव व्याघ्रजिनावर पद्मासनात ध्यानस्थ बसलेले आहेत.
शिवगिरी महादेव मूर्तीच्या बैठकी खाली गुहेच्या आकाराचा प्रशस्त हॉल तयार केलेला आहे. या हॉलमध्ये भगवान शंकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग लहान लहान मुर्तींच्या रुपांत साकार केले आहेत.उदा. पार्वती स्नान करतांना घराचे रक्षण करणार्या बाल गणेशाचे शिवाशी झालेले युद्ध, समुद्र मंथना नंतर भगवान शिवाने प्राशन केले हलाहल विष, स्वर्गातुन शिवाच्या मस्तकावरील जटेत गंगेचे पदार्पण, भस्मासुर वध, शिव पार्वती विवाह असे अनेक प्रसंग कन्नड़ भाषेत पहायला मिळतात.
टी.के.पाटील चैरिटेबल ट्रस्टचे कार्य:
टी.के.पाटील चैरिटेबल ट्रस्टने हे स्थळ धार्मिक व पर्यटन क्षेत्र म्हणून जाणीवपूर्वक विकसित करण्याचे ठरविले आहे.अनेक समाजोपयोगी उपक्रम या ट्रस्ट द्वारे राबविले जातात.१८ एकर जागेवर ‘बसंत वन’ नावाचं ओल्ड एज होम चालविले जाते. सुरुवातीलाच ५२वृद्धांची सर्व प्रकारची व्यवस्था येथे करण्यात आली असून आता त्याची क्षमता वाढविन्यात आली आहे. येथे वयोवृद्ध महिलांना प्राधान्य देण्यात येते. आर्थिक व सामाजिक दृष्टया मागासलेल्या मुलांसाठी मोफत बोर्डिंग सुरु करण्यात आले आहे.
श्री टी.के.पाटील यांचे चार बंधू आहेत. सगळे अतिशय संपन्न आहेत. २००६ साली या चारी भावांनी आपल्या आईची सुवर्णतुला करून ती रक्कम दान धर्म करण्याचे ठरविले. त्यांच्या मातोश्रींचे वजन भरले ५५ किलो. त्यावेळी ५५ सोन्याची किंमत भरली साडेचार कोटी रूपये. या चारी भावांनी साडेचार कोटी रूपये असे गुंतविले की त्याच्या येणार्या व्याजातुन सगळी सामाजिक कामे केली जातात. ‘ओल्ड एज होम’ किंवा ‘मुलांच्या बोर्डिंग’ साठी कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत. या चारी भावांनीच शिवगिरी येथील महादेवाची ८५ फूट उंच मनमोहक मूर्ती बनवून या जागेचे पर्यटन स्थळांत रूपान्तर घडवून आणले आहे.
रात्रीच्या वेळी शिवगिरी महादेवाचा सगळा परिसर अत्यंत खुलून दिसतो. आकर्षक लायटिंग मुळे शिवमूर्तीच्या सौंदर्याला जणू चार चाँद लागतात. स्टेशन पासून ३ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. मुर्तीची सिमेट्री पाहून आश्चर्य वाटते. शांत, शक्तीशाली आणि प्रेरणा दायी असे हे स्थान आहे.
या स्थानाच्या संकेत स्थळावर काही पर्यटकांनी आपले अनुभव पाठविले आहेत. यात या ठिकाणी असलेल्या लहान मुलांच्या ‘जॉय राइडस्’चं कौतुक केलंय. इथली शिव मूर्ती तर अफलातून आहेच. संपूर्ण परिसर व्यवस्थित मेंटेन केलेला आहे.भोवताली सुंदर गार्डन्स ,लॉन विकसित केलेल्या आहेत. भाविकांसाठी व पर्यटकांसाठी खाण्यापिण्यासाठी अनेक स्टॉल्स उपलब्ध आहेत.मुलांसाठी खेळण्यांची अनेक दुकाने. मनोरंजनासाठी विविध आकर्षक खेळणी व साधने या ठिकाणी उपलब्ध आहेत. वीकेंड साजरा करण्या साठी अतिशय योग्य ठिकाण. बिजापुरला गेलांत तर अवश्य भेट द्यावे असे हे पर्यटन कम धार्मिक स्थळ आहे.
संपर्क : www.shivagiri.com
विजय गोळेसर मो. ९४२२७६५२२७