बंगळुरुचा ६५ फूटी शिवोहम शिव महादेव!
बेंगळुरू येथील सुप्रसिद्ध शिवोहम शिव मंदिरातील ६५ फुटी भगवान शंकराचे दरवर्षी किमान ५ लाख भाविक दर्शन घेतात. मागच्या वर्षी २१ फेब्रुवारीला रौप्य महोत्सवी महाशिवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या या महाकाय शिव मुर्तीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. आज आपण याच महादेवाविषयी जाणून घेऊ…
बेंगळुरूच्या जुन्या एअरपोर्ट रोड वरील केम्पा फोर्ट परिसरांत हे शिवमंदिर १९९५ साली स्थापन करण्यात आले. अर्थात या ठिकाणी फार प्राचीन काळापासून भगवान शंकराचे मंदिर अस्तित्वात होतेच. परंतु १९९०-९२ च्या आसपास एका शिवभक्ताला या ठिकाणी भगवान शिवाची विशाल मूर्ती स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. जगभरातील नवीन पिढयांना आशा आणि विश्वास यांचा संदेश देण्यासाठी या ६५ फूटी विशाल शिव मुर्तीची स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
ब्ल्यू-प्रिंट शिवाय तयार करण्यात आलेली मूर्ती
कर्नाटकातील सुप्रसिद्ध मूर्तिकार काशीनाथ यांनी भगवान शिवाची ही ६५ फूटी मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती तयार करण्या पूर्वी कोणत्याही प्रकारची ब्ल्यू-प्रिंट किंवा नकाशा तयार करण्यात आला नाही. एवढंच नाही तर या मुर्तीची मापे मोजण्यासाठी कोणताही मेजरिंग टेप वापरण्यात आला नाही असे सांगितले जाते. तसे असेल तर हेदेखील एक आश्चर्यच म्हणावे लागेल.
श्रुंगेरी मठाचे शंकराचार्य यांचे शुभहस्ते २६ फेब्रुवारी १९९५ या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवोहम शिव मंदिरातील शिव मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. याच दिवशी जुन्या शिव मंदिराचे ‘शिवोहम शिव मंदिर’ असे नामकरण देखील करण्यात आले. शिवोहम शिव मंदिराच्या प्रवेशव्दारा जवळ २५ फूट उंचीचे शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे.आज देखील बेंगळुरू शहरातील हे सर्वांत मोठे शिवलिंग आहे.
ध्यानमग्न चतुर्भुज भगवान शिव
शिव पुराणात वर्णन केल्याप्रमाणे शिवोहम शिव मंदिरातील शिवमुर्ती चतुर्भुज असून ती ध्यानमग्न अवस्थेत बसलेली आहे. शिवाच्या डाव्या बाजुच्या हातांत त्रिशूल तर उजव्या बाजुच्या हातांत डमरू धारण केलेले आहे. येथे भगवान शंकर व्याघ्रजीन वर ध्यानस्थ बसलेले आहेत. भगवान शिवाच्या जटांमध्ये गंगा बसलेली असून ती कोणत्याही क्षणी उसळी मारून वर येईल असे वाटते.
३२ फूट उंचीचा ‘विघ्न हरण गणपती’
या मंदिर परिसरांत भगवान शिवाच्या ६५ फूट उंच शिव मूर्ती प्रमाणेच श्री गणेशाची ३२ फूट उंचीची बैठी चतुर्भुज मूर्ती भाविकांचे लक्ष्य आकर्षित करते.बाजूला नवग्रहांची लक्ष्यवेधी मंदिरं आहेत. ही गणेश मूर्ती शिव मूर्तीच्या नंतर तयार करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध आधयात्मिक गुरु दादा जे.पी.वासवानी यांच्या हस्ते १ मार्च २००३ रोजी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या गणेशाला ‘विघ्न हरण गणपती’ असे म्हणतात.भाविक भक्त या गणेशा समोर असलेल्या जाळीला लाल व नारंगी रंगाचे धागे बांधतात. या मुळे त्यांच्या अडचणी व समस्या दूर होतात असा दृढ़ विश्वास आहे.
‘हिलिंग स्टोन आणि मिरॅकल स्पॉट’
भगवान शिवाच्या महाकाय मूर्ती समोर ‘हिलिंग स्टोन’ म्हणजे संकट निवारक दगड आणि ‘मिरॅकल स्पॉट’ ही दोन भाविकांच्या जिव्हाळयाची स्थानं आहेत. ‘हिलिंग स्टोन’ला हात लावून तो डावीकडे किंवा उजवीकडे फिरल्यास कामं होतील की नाही याचे संकेत मिळतात. अशा प्रकारचा फिरता दगड तुळजापुर येथे देवी मंदिरा मागे प्रदक्षिणा मार्गावर देखील पहायला मिळतो. मिरॅकल स्पॉट म्हणजे स्वच्छ पाण्याचे एक छोटे कुंड असून तेथे ७ वेळा ॐ नमो शिवाय म्हणून नाणे पाण्यात टाकल्यास भाविकांना आश्चर्यकारक अनुभव येतात असे सांगितले जाते.
भगवान शिव दर्शन उत्सव
शिवोहम शिव मंदिरांत दरवर्षी सुमारे ५ लाख भाविक दर्शन घेतात त्यातील दिड ते दोन लाख भाविक एकट्या महाशिवरात्र उत्सवात सहभागी होतात. शिवोहम शिव मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे दरवर्षी महाशिवरात्र उत्सव काळात अमरनाथ ,पाच धाम आणि बारा ज्योतिर्लिंग दर्शन यात्रा घडविली जाते. थोडक्यात म्हणजे देशांतील प्रमुख शिव मंदिरांचे दर्शन एकाच ठिकाणी घडते.
यावेळी मंदिर परिसरांत कृत्रिम रित्या पांच धाम क्षेत्रातील गुहा व बर्फाच्छादित वातावरण तयार करण्यात येते. विशेषत: अमरनाथ येथील गुहा आणि त्यातील बर्फा पासून तयार झालेले शिवलिंग इतके हुबेहूब बनवितात की ते पाहण्यासाठी अक्षरश: लाखो भाविक येथे येतात. हिमालयातील ‘हरिद्वार’, ‘ॠषिकेष’,’बद्रीनाथ’ आणि ‘केदारनाथ’ येथील शिवलिंग गर्भगृहासह पहायला भाविक उत्सुक असतात.
त्याचप्रमाणे काचेच्या बंदिस्त केबिन मध्ये बारा ज्योतिर्लिंगातील ‘सोमनाथ’,’मल्लिकार्जुन’, ‘महांकालेश्वर’,’ओमकारेश्वर’, ‘केदारनाथ’, ‘भिमाशंकर’, ‘विश्वनाथ’, ‘त्रिम्बकेश्वर’, ‘बैद्यनाथ’ , ‘नागेश्वर’, ‘रामेश्वरम’ आणि ‘घृश्नेश्वर’ येथील केवळ शिवलिंगच नाही तर त्या त्या ज्योतिर्लिगाच्या गर्भगृहात उभे असल्याचा अनुभव भाविकांना घेता येतो. देशातील सुप्रसिद्ध शिव मंदिरातील शिवलिंगांचे साक्षांत दर्शन घेण्यासाठी दिड ते दोन लाख भाविक येथे येतात.
सर्वांत मोठा महाशिवरात्रोत्सव
शिवोहम शिव मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव असतो महाशिवरात्रीचा! या दिवशी रात्री आणि दिवस विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यावेळी लाईव्ह भजन आणि धार्मिक स्पर्धांची रेलचेल असते.’शिव अंताक्षरी’ आणि ‘जागरण’हे या वेळचे दोन प्रमुख कार्यक्रम असतात.यांत केवळ देशांतीलच नव्हे तर परदेशातील भाविक देखील सहभागी होतात.याप्रसंगी स्पेशल लेझर शो चे आयोजन केले जाते. हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम असतो तो पाहण्यासाठीभाविक देशभरातून येथे एकत्र येतात. मागच्या वर्षी २१ फेब्रुवारी २०२० या दिवशी शिवोहम शिव मंदिराचा २५ वा रौप्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.यावेळी वरील सर्व उपक्रम लाखो भाविकांच्या साक्षीने यशस्वीरित्या राबविण्यात आले.
६०० बेघरांना घरे
शिवोहम शिव मंदिराच्या रौप्य म्होत्सवानिमित्त AiR Humanitarian Homes या ट्रस्टने ६०० बेघर व्यक्तींना अन्न,वस्त्र, निवारा देण्याचा कार्यक्रम राबविला असून बंगळुरू शहरांत तीन ठिकाणी ६०० बेघर व्यक्तींना आश्रय देण्यात आला आहे. या ६०० लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा या प्रमाणेच आवश्यक औषधे देखील देण्यात येतात.
संपर्क: Shivoham Shiv Mandir, 97, HAL Old AirForce Road, Kemp Fort Mall Parking, Ramgiri,Murgesh Pallya, Bengaluru Karnataka 500017. Phone- 09731885555