समुद्राकाठचा ५८ फुटी गंगाधरेश्वर!
एखादया शास्त्रांत पारंगत असल्यावर एखाद्या व्यक्तीने मोठा विक्रम केला तर ते समजू शक.ते परंतु कोणत्याही शास्त्राची माहिती नसतांना, कोणत्याही विषयाचा अभ्यास नसतांना, केवळ आपल्याला एखादा जागतिक विक्रम करायचा आहे, असे म्हणून ते अशक्य वाटणारे कार्य पूर्ण करणे केवळ कथा कादंबरी किंवा चित्रपटातच शक्य असते. पण असे अशक्य ते शक्य करून दाखविले आहे ‘देवदाथन’ नावाच्या केरळी युवकाने. आज २९-३० वर्षांचे वय असलेल्या देवदाथान याने केरळ मधील सर्वांत उंच भगवान शंकराची मूर्ती तयार केली आहे. शिल्पकलेचा गंध नसतांना, घरातल्या सात पिढ्यात कुणी साधा मातीचा गणपती सुद्धा बनविला नसेल अशा घरातील मुलाने चक्कं जगभर फेमस होईल अशी शिवाची दगडी मूर्ती तयार केली. देवदाथन याच्या जिद्दीची कथा सांगण्यापूर्वी केरळच्या आझिमाला शिव मंदिरा जवळच्या ५८ फूट उंचीच्या शिव मुर्तीची ओळख करून घेऊ या.
आज्झिमाला शिवमंदिर केरळ मध्ये तिरुअनंतपुरम जिल्ह्याच्या विजिनजम पूर्व बंदरावर वसलेलं आहे. थम्पनुर पासून २० किमी आणि कोवलम बीच पासून ७ किमी अंतरावर आज्झिमाला शिवमंदिर आहे. मंदिर परिसरांत आल्यावर समुद्राच्या काठी असलेल्या शिवाच्या ५८ फूट उंचीची विशाल प्रतिमा मोबाईल कॅमेर्यात साठवून ठेवण्याचा मोह लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही आवरत नाही. या परिसरातील निसर्गसौंदर्य देखील पर्यटकांचे मन आकर्षित करायला पुरेसे आहे.
यावर्षी केरळ मधील आज्झिमाला शिवमंदिर अचानक जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. या मुर्तीची प्रतिष्ठापना होण्यापूर्वीच सोशल मिडीयावर या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले आणि तिरुअनन्तपुरमला येणारा प्रत्येक पर्यटक आज्झिमालाला भेट देऊ लागला.
केरळ मधील आज्झिमाला शिवमंदिर समुद्राच्या काठावर आहे. येथील समुद्र किनार्यावरील दगडी खडकांवर भगवान शिवाची ५८ फूट उंचीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. समुद्राच्या काठावर ही शिवमूर्ति स्थापन करताना, समुद्राच्या खारट पाण्यापासून मूर्तीचे नुकसान होऊ नये यासाठी विशेष प्रकारचे सिमेंट आणि वैशिष्ट्यपूर्ण केमिकल्सचा वापर करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरांत हे मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनल्या पासून केरळ मधील भगवान शिवाची सर्वांत उंच मूर्ती पहायला लांब लांबून लोक येत आहेत.
भगवान शिवाच्या इतरत्र दिसणार्या प्रतिमा पेक्षा ही मूर्ती खुपच वेगळी आहे. या मूर्तीचे नाव गंगाधरेश्वर असे आहे. सुप्रसिद्ध पौराणिक कथेनुसार भगिरथ राजाने हजारो वर्षे तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न करून घेतले. आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी त्याला स्वर्गीची गंगा पृथ्वीवर आणायची होती. भगवान शिवाने गंगेला पृथ्वीवर येण्याचे आवाहन केले. गंगा पृथ्वीवर येण्यास तयार झाली. पण ती जर थेट स्वर्गातून पृथ्वीवर आली असती तर पृथ्वीवर हाहाकार मजला असता. म्हणून भगवान शिवाने तिला आपल्या डोक्यावरील जटांमध्ये उतरायला सांगितले. त्यासाठी भगवान शिव पृथ्वीवर भक्कम आसन घालून बसले. काही पौराणिक चित्रांत भगवान शंकर उभे असून गंगा त्यांच्या डोक्यावर उडी मारते असे पहायला मिळते.
या विषयावर अनेक कथा कादंबर्या, नाटकं आणि चित्रपट देखील झाले आहेत. येथे देखील ‘देवदाथान’ हा तरुण शिल्पकार या विषयाच्या मोहात पडला आणि त्याने भगवान शिव पृथ्वीवर भक्कमपणे बसले असून गंगा त्यांच्या डोक्यावर जटेत अवतीर्ण झाल्याचे एकमेवाद्वितीय शिल्प दगडातून कोरले आहे. भगवान शंकरांच्या या पेक्षाही मोठ्या मूर्ती देशांत आणि जगात पहायला मिळतात पण गंगाधरेश्वरा सारखी विशाल मूर्ती कुठेही पहायला मिळत नाही म्हनुनच तर तिला एकमेवाद्वितीय शिव मूर्ती म्हणतात!
ही मूर्ती तयार करणारा शिल्पकार शून्य अनुभव असलेला तरुण युवक आहे. त्रिवेंद्र्माच्या गव्हर्नमेंट फ़ाईन आर्ट्स कॉलेजचा हा विद्यार्थी. गेल्या सहा वर्षापासून तो ही मूर्ती घडवित होता. एप्रिल २०१४ ला त्याने ही मूर्ती घडवायला सुरुवात केली तेंव्हा तो २३ वर्षांचा होता. २०२० साली ही मूर्ती घडवून तयार झाली तेंव्हा तो २९ वर्षांचा झाला होता. उद्घाटन होण्यापुर्वीच या मूर्तीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे अनेक पर्यटक येथे येऊ लागले. ही मूर्ती घडवितांना मुर्तीचा आकर निश्चित करण्यासाठी थ्री डी डायनामिक्स आणि ऑटोकॅड या तंत्राचा उपयोग करण्यात आला. ‘देवदाथानला बारावी नंतर ऑटोकॅड आणिं अॅनीमेशन या विषयांची गोडी लागली आणि हीच या कार्याची सुरुवात ठरली.
त्रिवेंद्रम येथे राहणारा ‘देवदाथान’ मूर्तीच्या निर्मिती विषयी भरभरून बोलतो. ” ही माझी पॅशन होती. मी तिचा पाठपुरावा सुरु केला. मुर्तिचा आकर आणि साईज निश्चित करण्यासाठी मी ‘थ्री डी डायनामिक्स आणि ऑटोकॅड’ चा उपयोग केला. कोणताही अनुभव नसतांना भरपूर संशोधन केलं. मी हे काम करू शकेल की नाही याची वडिलांना खात्री नव्हती मला मात्र कॉन्फीडन्स होता.” वयाच्या २३ व्या वर्षीच त्याने या मुर्तीची निर्मिती सुरु केली. त्यापूर्वी ही मूर्ती कुठे स्थापन करायची त्या जागेची शोधाशोध सुरु केली. भरपूर ठिकाणं पालथी घातली. तेंव्हा कुठे त्यांना समुद्र किनार्यावर हा खडक आढळला. त्या खडकावरच त्यांनी शिवाची मूर्ती कोरली आहे.
ही मूर्ती बनविण्यासाठी त्यांना सहा वर्षे लागली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. ज्या मंदिरांत ही शिवमूर्ती स्थापन करण्यात आली आहे ते मंदिर ३५०० स्क्वेअर फूट पसरलेले आहे. भगवान शिवाच्या प्रतिमेला येथे गंगाधरेश्वर असे म्हणतात. शिवाच्या पारंपरिक मुद्रांपेक्षा ही शिवप्रतिमा वेगळी आहे. या प्रतिमेखाली एक भव्य ध्यान मंदिर तयार करण्यात आले आहे. शिव मंदिराशिवाय येथे अनेक प्राचीन मंदिरं आहेत. ही सर्व मंदिरं अतिशय कलात्मक आहेत. आज्झिमाला मंदिरही आपल्या कलात्मकतेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर समुद्र किनार्यावर आहे.जवळ पास खडक पसरलेले आहेत. त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्त पहाण्यासाठी येथे पर्यटक आणि भाविकांची नेहमीच गर्दी असते.
वार्षिक उत्सव
आज्झिमाला शिवमंदिरांत जानेवारी फेब्रुवारी महिन्यांत वार्षिक महोत्सवाचे आयोजन करतात. हजारो भाविक ‘नारंगा विलाक्कू’ अर्पण करतात. नारंगा विलाक्कू म्हणजे लोक निंबूवर तेलाचे दिवे लावतात. आणि ते निम्बू समुद्रांत सोडतात. रात्रीच्या अंधारांत हजारो नारंगा विलाक्कू समुद्रात तरंगताना पाहून त्यांचा प्रकाश पाहतांना देहभान हरपते.
आज्झिमाला शिवमंदिर केरळ मध्ये तिरुअनंतपुरम जिल्ह्याच्या विजिनजम बंदरावर वसलेलं आहे. थम्पनुर पासून २० किमी आणि त्रिवेंद्रम पासून ४० किमी अंतरावर असलेल्या कोवलम बीच पासून ७ किमी अंतरावर आज्झिमाला शिवमंदिर आहे. मंदिरा पर्यंत पोहचायला बस आणि टैक्सी सेवा उपलब्ध आहे. पद्मनाभ मंदिरा प्रमाणे येथे ड्रेस कोड नाही. कार पार्किंगसाठी भरपूर मोठी जागा आहे.
संपर्क: Azhimala Siva Temple
Pulinkudi Mulloor P.O., Thiruanantpuram, Kerala 695521
Mob. 91.4712268422
वेबसाइट: www.aazhimalamahadevatemple.com