जगातली तिसरी सर्वांत मोठ्ठी शिवमूर्ती
कर्नाटकातील १२३ फूटी मुरुडेश्वर शिव!
आपला भारत मंदिरांचा देश आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आपल्या देशांत अशी अनेक प्राचीन मंदिरं आहेत ज्यांची पाळंमुळं सत्ययुगाशी आणि द्वापरयुगाशी जोडलेली आहेत. अनेक मंदिरांना हजारो वर्षांचा इतिहास आहे, परंपरा आहेत. आज आपण ज्या मंदिराची माहिती घेणार आहोत त्याचा संबंध तर रामायण पूर्व काळाशी जोडला जातो. लंकाधिपति रावणाशी या मंदिराचा संबंध जोडला जातो. कर्नाटकातील मुरुडेश्वर येथील शिव मंदिरा विषयी मी सांगतो आहे. मुरुडेश्वर नावाने प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले हे शिव मंदिर अरबी समुद्राच्या किनार्यावर उभारण्यात आलेल्या भगवान शंकराच्या महाकाय मूर्ती मुळे आता जगप्रसिद्ध झाले आहे.
मुरुडेश्वर येथे भगवान शंकरांची पद्मासनात बसलेली मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या मुर्तीची उंची १२३ फूट आहे. भगवान शंकरांची ही आपल्या देशातील दुसरी तर जगातली तिसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी शिवमूर्ती आहे. या शिवमूर्ती पेक्षा फक्त दोनच शिवमूर्ती मोट्ठ्या आहेत. वाचकांना ठाउकच आहे की, नेपाळ मधील काठामांडू जवळ कैलाशनाथ महादेवाची मूर्ती १४३ फूट उंच असून जगातली प्रथम क्रमांकाची सर्वांत मोट्ठी २५१ फूट उंच शिवमूर्ती राजस्थानातील नाथद्वार येथे आहे. ‘स्टॅच्यु ऑफ बिलिफ’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या शिवमूर्तीची माहिती ३ नोव्हेंबर २०२१च्या रोजीच्या लेखात वाचल्याचे ‘इंडिया दर्पण डॉट कॉम’च्या वाचकांना आठवतच असेल.
मुरुडेश्वर येथील १२३ फूट उंचीची भगवान शंकराची जगातली तिसर्या क्रमांकाची सर्वांत उंच मूर्ती अरबी समुद्रातूनही खूप दुरून दिसते. शिवमोगा येथील मूर्तिकार काशीनाथ आणि त्यांच्या सहकारी कारागीरांनी ही मूर्ती दोन वर्षांत तयार केली. स्थानिक बांधकाम व्यावसायिक आर.एन.शेट्टी यांनी सुमारे ५ कोटी रूपये खर्च करून ही शिवमूर्ती तयार करविली. २००६ च्या महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कर्नाटकातील कन्नड जिल्ह्यातल्या भटकल तालुक्यात कंडूका पहाडावर मुरुडेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी चतुर्भुज भगवान शंकर पद्मासनात बसलेले असून त्यांचा पुढचा उजवा हात आशिर्वाद दर्शक असून डाव्या हातांत जपमाल आहे. शिवाच्या मागच्या उजव्या हातांत त्रिशूल असून मागच्या डाव्या हातांत डमरू धारण केले आहे. भगवान शंकरांच्या डोक्यावर जटा असून त्यावर गंगा आणि चंद्र विराजमान झालेले आहेत. शिवाच्या गळ्यात रुद्राक्ष माला आणि नाग असून कमरे भोवती देखील नागबंध आहे. भगवान शिव व्याघ्रजिनावर बसलेले असून त्यांनी कमरे भोवती वल्कले परिधान केली आहेत.
मुरुडेश्वर शिवाची ही मूर्ती इतकी भव्य आणि विशाल आहे की तिचे विशाल रूप पाहून मनुष्य चकित होतो. सागराच्या आणि भगवान शिवाच्या या विशालत्वा समोर आपले क्षुद्रत्व तत्काल जाणवते आणि भक्ती भावनेने मनुष्य नतमस्तक होतो. मुरुडेश्वर येथे शिवलिंग कसे स्थापन झाले याविषयी शिवपुराणात एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. या आख्यायिकेनुसार रावणाने कैलास पर्वतावर जावून भगवान शंकरला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली. त्याच्या तपस्येवर प्रसन्न होवून भगवान शिवाने रावणाला आत्मलिंग दिले. रावणाला ते आत्मलिंग आपल्या राज्यात न्यायचे होते. भगवान शंकर म्हणाले, ” तुला हवे तिथे हे आत्मलिंग स्थापन कर. मात्र ते जमिनीवर कुठेही ठेवू नकोस. हे आत्मलिंग तू जेथे टेकवशील तिथेच त्याची स्थापना होईल.”
रावण आत्मलिंग घेवून लंकेकडे निघाला. वाटेत सायं संध्या करण्याची वेळ झाली. त्यावेळी तेथे दिसलेल्या गुराख्याच्या रूपातील गणेशाच्या हातांत त्याने आत्मलिंग दिले परंतु त्याला परत येण्यास विलंब झाल्यामुळे गणपतीने ते आत्मलिंग जमिनीवर टेकविले आणि तिथेच स्थापन झाले. हे शिवलिंग नेण्यासाठी रावणाने खुप प्रयत्न केले पण ते येथेच राहिले. कर्नाटकातील गोकर्ण व मुरुडेश्वर येथे हा प्रसंग घडला अशी मान्यता आहे. मुरुडेश्वर मंदिर ‘कंडूका’ पहाडावर वसलेले आहे. दक्षिण भारतातील परंपरे नुसार येथे देखील वीस मजली दगडी गोपुर बांधलेले आहे. २४९ फूट उंचीचे हे गोपुर जगातले सर्वांत उंच गोपुर मानले जाते. आर. एन.शेट्टी या व्यवसायिकाने या गोपुराचे व संपूर्ण परिसराचे आधुनिकीकरण केले आहे.
गोपुराच्या प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूंना खर्या हत्तींसारखे दिसणारे दगडी हत्ती आहेत. लहान थोर पर्यटकासाठी हे एक महत्वाचे आकर्षण मानले जाते. गोपुराच्या आतून वर जाण्यासाठी अत्याधुनिक लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. या लिफ्टद्वारे गोपुराच्या सर्वोच्च १८ व्या मजल्यावर जाता येते. तेथून मुरुडेश्वराचा निसर्गसंपन्न परिसर आणि अथांग पसरलेला अरबी समुद्र यांचे विहंगम दृश्य पर्यटक आयुष्यभर विसरु शकत नाही. हा अनुभव घेण्यासाठी कर्नाटकातीलच नव्हे तर देशांतील आणि परदेशातील पर्यटक येथे येतात. मुरुडेश्वर हे कर्नाटकातील सर्वांत सुंदर समुद्र किनार्यांपैकी एक आहे. निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक स्थळ यांचा सुरेख संगम येथे झालेला आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक येथे आकर्षित होतात.
मंगलोर पासून मुरुडेश्वर १६५ किमी अंतरावर आहे.
मंदिर वेळा : सकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत
मंदिरांत जाण्यासाठी प्रवेश शुल्क घेतले जात नाही. येथे जाण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा कालखंड चांगला मानला जातो.
वार्षिक उत्सव : महाशिवरात्र आणि कार्तिक पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा)
संपर्क: मुरुडेश्वर भटकल, कर्नाटक -५८१३५०
www.myokshy.com/murudeshvar temple