इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी –
ओरिसातील १०९ फूट उंच दमनजोडी हनुमान!
ओरिसा हे राज्य केवळ जगन्नाथपुरी किंवा पुरीच्या आकर्षक बीचेस साठीच प्रसिद्ध आहे असे नाही तर समृद्ध समुद्र किनारा लाभलेल्या ओरिसात असंख्य प्रेक्षणीय ठिकाण आहेत. जी लोकांना फारशी माहित नाहीत. आता हेच पहा ना जगातली दुसर्या क्रमांकाची उंच हनुमान मूर्ती ओरिसात आहे हे तुम्हाला तरी माहित होतं का? नाही ना! चला तर आज आपण दमनजोडीच्या उंच हनुमानाचे दर्शन घेऊ या…
कुठे आहे दमनजोडी?
एच.ए.एल.हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लि.मुळे प्रसिद्ध असलेल्या ओरिसातील कोरापूट जिल्ह्यात कोरापुट पासून ३६ किमी. अंतरावर दमनजोडी नावाचं एक शहर आहे. येथे NALCO नाल्को टाउनशिप परिसरांत हनुमानाचे एक प्राचीन मंदिर आहे. अभय आंजनेय नावाने प्रसिद्ध असलेल्या या मंदिर परिसरांत २०१७ मध्ये जगातील दुसर्या क्रमांकाच्या हनुमान मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
दमनजोडी येथील बजरंगबली १०८.९ फूट म्हणजे ३३.१ मीटर उंच आहे. बजरंगबलीच्या पायथ्याशी ३५ फूट उंचीचे भव्य आणि अतिशय आकर्षक मंदिर आहे. मंदिरा भोवतीचा सर्व परिसरच अतिशय सुंदर रितीने विकसित करण्यात आला आहे. सर्वत्र मनमोहक हिरवळ,लहान मुलं आणि मोठयांच्याही आवडीच्या गार्डन्स,विविध प्रकारची खेळणी, रंगीत कलाकुसर युक्त मंदिरं आणि आकर्षक कंपाउंड पाहून पर्यटक मनापासून खूश होतो.
रंगांची आकर्षक उधळण
दमनजोडी येथील हनुमान मूर्तीच्या परिसरांत श्री सत्यसाईबाबा, श्री शिर्डीचे साईंबाबा आणि थोड्या अंतरावर मा कांता बाउसिनी देवी यांची अतिशय आकर्षक मंदिरं आहेत. १०९ फूट उंचीच्या महाकाय बजरंगबली प्रमाणेच येथील मंदिर समूह शहराच्या कोणत्याही भागातून सहज नजरेस पडतो. १०८.९ फूट उंचीची ही हनुमान मूर्ती अष्टधातुं पासून बनविण्यात आली असल्याचा उल्लेख एका ठिकाणी वाचण्यात आला. मात्र ही मूर्ती पांढरया मोतिया रंगाने रंगविलेली आहे. हनुमानाच्या गळयातील फुलांची माळ,हातांवरील उत्तरीय, ह्नुमानाची शेपटी,मुकुट,चेहरा सगळच अतिशय आकर्षक रंगांनी सजविलेले आहे.
असा आहे हा जगप्रसिद्ध हनुमान
दमनजोडी येथील मुख्य आकर्षण आहे हनुमानाची महाकाय मूर्ती. खर्या हनुमानाला आपले रूप बदलता येते असे म्हणतात. तो कधी मुंगी एवढा लहान तर कधी पर्वतापेक्षाही मोठा होऊ शकतो असे म्हणतात. दमनजोडी येथील हनुमान आपल्या शक्तीशाली दोन पायांवर उभा असून त्याच्या गळ्यात एक मोठी सुंदर पुष्पमाला आहे. त्याच्या दोन्ही हातांच्या बाहूंवर उत्तरीय वस्त्र असून उजवा हात अभयदर्शक आहे. ह्नुमानाच्या डाव्या हातात त्याची आवडती गदा त्याने धारण केली आहे. हनुमानाला ही गदा कुबेराने दिली होती अशी आख्यायिका आहे. गदा हेच हनुमानाचे अतिशय आवडते शस्त्र आहे. हनुमानाप्रमाणे फक्त दूसरा पांडव भीमसेन यानेच गदेचा अतिशय प्रभावी वापर केल्याचे सर्वज्ञात आहे.
हनुमानाला शक्तीची देवता म्हणतात. त्याच्या इतका शक्तीशाली दुसरं कोणी नाही याची अनुभूती दमनजोडी येथील महाकाय हनुमान मूर्ती पाहून येते. या बजरंगबलीचे हाताचे दंड, पोटरी,मांड्या पाहून प्रत्यक्ष बजरंगबली नक्की असाच दिसत असेल याची खात्री वाटू लागते आणि माणूस त्याच्या पायाशी विनम्रपणे नतमस्तक होतो.
वैशिष्ट्ये
– NALCO नाल्को टाउनशिप परिसरांत ही महाकाय हनुमान मूर्ती आहे.
– आठ एकर जागेवर अंजना पुष्प वाटिका नावाचे प्रशस्त गार्डन आकर्षक पद्धतीने विकसित केलेले आहे.
– माँ कांता बाऊसनी देवीचे मंदिर बांबूच्या घनदाट वनांत आहे.
– हनुमाना प्रमाणेच इतर अनेक देवी देवतायांच्या आकर्षक मूर्ती सर्वत्र पहायला मिळतात.
– हनुमान मूर्तीच्या पायथ्याशी ३५ फूट उंचीचे भव्य मंदिर आहे. या मंदिरामुळे हनुमान मूर्ती १४४ फूट उंच झाली आहे. गावातून कुठूनही ही भव्य हनुमान मूर्ती दिसते.
– पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध आहेत.
Column Rauli Mandiri 109 feet Hanuman by Vijay Golesar Orissa Damanjodi