श्रावण मास विशेष
नामची सिक्कीमचा १०८ फुटी भगवान शिव
आपल्या देशांत अनादी काळापासून भगवान शिवाची पूजा केली जाते.त्यामुळेच काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि द्वारके पासून आसाम पर्यंत सर्वत्र भगवान शंकरांची शंभर शंभर एकर जागेवर वसलेली अति भव्य मंदिरं आणि जणू आकाशाला भिडलेल्या प्रचंड मोठ मोठ्या शिव मूर्ती पहायला मिळतात. भारताच्या ईशान्य दिशेला असलेल्या दुर्गम सिक्किमचा देखील याला अपवाद नाही.
आज आपण सिक्किमच्या नामची प्रांतातील सोलोफोक पहाडावरील सुप्रसिद्ध चारधाम मंदिर आणि येथील हिमालयातील पहाडावर स्थापन केलेल्या भगवान शिवाच्या १०८ फूट उंचीच्या शिवमुर्तीची माहिती घेणार आहोत.
नामची हे दक्षिण सिक्किम मधील जिल्ह्याचे मुख्यालय आहे. नामची काही फार मोठं गाव नाहीये. पण येथून जवळच असलेल्या सोलोफोक पहाडावरील चारधाम किंवा सिद्धेश्वर धाम या धार्मिक स्थळाचा सिक्किम पर्यटन विभागाने अतिशय योग्य नियोजन करून विकास केल्यामुळे येथील पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे.
नामची जवळच्या सोलोफोक पहाडाला थेट महाभारत काळाची पार्श्वभूमी लाभली आहे. महाभारतातील महायुद्ध होण्यापूर्वी अर्जुनाने भगवान शिवा पासून पशुपति अस्त्र मिळविले तो प्रसंग सोलोफोक पहाडावर घडला. अर्जुनाने येथे चारधाम मंदिरं बांधली असे म्हणतात. याच पवित्र ठिकाणी २०११ च्या महाशिवरात्रीला जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या शुभ हस्ते भगवान शिवाच्या १०८ फूट उंचीच्या महाकाय शिवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.तेंव्हापासून येथे भाविक आणि पर्यटक यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या राज्याच्या पर्यटन विभागाने जाणीव पूर्वक सूक्ष्म नियोजन करून एखाद्या प्राचीन धार्मिक क्षेत्राचे आधुनिक पर्यटन स्थळांत रूपांतर केल्याचे हे एक आदर्श उदाहरण म्हणता येईल.
सिक्किमच्या नामची प्रदेशांत सोलोफोक नावाच्या पहाडावर सिद्धेश्वर नावाचे प्राचीन धर्मस्थळ आहे. महाभारत युद्धाच्या आधी याच ठिकाणी भगवान शंकराने अर्जुनाला पशुपत अस्त्र दिले ते हे ठिकाण. या ठिकाणी भारतातील सुप्रसिद्ध रामेश्वरम, सोमनाथ, जगन्नाथपुरी आणि बद्रिनाथ या चार धामाची मंदिरं येथे पूर्वी पासून लहान आकारात होती. खुद्द अर्जुनानेच या मंदिरांची स्थापना केली होती अशी लोकमान्यता आहे. पवन चामलिंग या बिलडरने २००५ साली सात एकर जागेवर हे मंदिर बांधले. त्यानंतर सिक्किम पर्यटन विभागाने या चार धाम मंदिरांना अद्ययावत रूप दिले. तसेच भारतातील सुप्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांच्या हुबेहूब प्रतिकृति आणि मंदिराची उभारणी केली. एवढेच नाही तर सोलोफोक पहाडावर भगवान शंकराची १०८ फूट उंचीची मुर्तीची प्रतिष्ठापना केली त्यामुले देशभरातील भाविक आणि पर्यटक यांची गर्दी येथे दिवसेंदिवस होऊ लागली.
गंगटोक पासून ड्रायव्हिंगने दोन तासाच्या अंतरावर असलेले नामची हे जिल्ह्याचे मुख्यालय असले तरी अतिशय लहान गाव आहे.हा सगळा परिसर समुद्रसपाटी पासून उंचावर आहे. येथे सदैव ढगांचे राज्य असते असे म्हटले तर वावगे होणार नाही. सिध्देश्वर धाम येथे आल्यावर आपण जेंव्हा भगवान शिवाच्या महाकाय मूर्तीच्या दर्शनाला जातो तेंव्हा एखाद्या हिंदी चित्रपटातील दृश्या प्रमाणे मध्येच ढगांचा पडदा समोर येतो आणि क्षणापूर्वी दिसलेली भगवान शिवाची विशाल मूर्ती आणि सारा मंदिर परिसर ढगांमध्ये गुडुप होउन जातो. ढगांचा हा पाठशिवणीचा खेळ दिवसभर चालू असतो.
ढगांचे हे स्वर्गीय दृश्य कमी पड़ते म्हणून की काय येथे हजारो प्रकारची शेकडो रंगाची आणि गंधाची फुले सर्वत्र पसरलेली दिसतात. येथे येणारा पर्यटक ढगांचे पाठशिवणीचे स्वर्गीय दृश्य पहावे की आकर्षक, मनमोहक फुलांचे फोटो काढावेत या गोड संभ्रमात पडतात. प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट या न्यायाने इथली चार धाम मंदिरं मूळ मंदिरंपेक्षा आकर्षक दिसतात.त्यामुळे येथे येणारे पर्यटक आपल्या मोबाईल मध्ये इथला स्वर्गीय परिसर साठवून घेण्यात दंग झाल्याचे दिसते.
किर्तेश्वर
सिद्धेश्वर चारधाम मंदिर परिसरात प्रवेश करताच हातात धनुष्य बाण धारण केलेल्या किर्तेश्वराची मूर्ती समोर दिसते. भगवान शंकराला स्थानिक भाषेत किर्तेश्वर म्हणतात. किर्तेश्वर म्हणजे प्राण्यांचा रक्षण कर्ता- पशुपतिनाथ! सिक्किम मध्ये किर्तेश्वराची अनेक मंदिरंही पहायला मिळतात.
आपापल्या वाहनांवर गंगा यमुना
चारधाम मंदिर परिसरांत अगदी मध्यवर्ती ठिकाणी एक सुंदर कारंजा तयार करण्यात आला आहे. या कारंजात गंगा आणि यमुना या नद्यांच्या पांच साडेपाच फूट उंचीच्या आकर्षक प्रतिमा लक्ष्य वेधून घेतात. या ठिकाणी गंगा आणि यमुना आपापल्या वाहनावर म्हणजे गंगा मगरीवर तर यमुना कसवावर उभ्या असलेल्या दिसतात.लहान मुलांपासून तर जेष्ठां पर्यंत सर्वांना गंगा यमुनेच्या मूर्ती भुरळ पडतात. प्रयाग येथील गंगा यमुनेच्या संगमाची ही प्रतिकृती आहे असे म्हणतात.
प्रसिद्ध चारधाम
चारधाम सिद्धेश्वर मंदिराचे पूर्वी पासूनचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथील चारधाम मंदिरांच्या प्रतिकृती. उत्तराखंडातील बद्रिनाथ, गुजरात मधील सोमनाथ, ओरिसा मधील जगन्नाथ पुरी आणि तमिलनाडुतील रामेश्वरम येथील मंदिरांच्या अतिशय आकर्षक प्रतिकृती. येथे येणारया प्रत्येक भाविकाला किंवा पर्यटकांना येथे आल्यानंतर आपण एकदा तरी चारधाम यात्रा करावी अशी प्रेरणा मिळते. ही चार धार्मिक स्थळं भौगोलिक दृष्टया एकमेकांपासून दूर असली तरी त्यातील धार्मिक एकता आश्चर्यजनक म्हणावी लागेल.
या चारही मंदिरांची प्रवेशव्दारं अतिशय आकर्षक बनविलेली आहेत. रंगीबेरंगी फुलांनी संपूर्ण परिसर शोभिवंत झालेला दिसतो. डावीकडून उजवीकडे प्रदक्षिणा करतांना सर्व प्रथम दिसते ते तमिलनाडुतील वैशिष्ट्यपूर्ण रामेश्वरम मंदिर. द्रविड़ी शैलीतील रंगीत गोपुरांचे समुद्राच्या किनार्यवर असलेले हे मंदिर हिमालयातील ढगांच्छादित पर्वतावर पाहून मन थक्कं होतं. गुजरातचे वैभव असलेले सोमनाथ मंदिराची प्रतिकृती पाहून हीच भावना मनांत येते. यानंतर साईं बाबांचे एक लहानसे मंदिर येथे आहे. तेथून थेट भगवान शिवाच्या १०८ फूट उंचीच्या मूर्ती जवळ जाता येते.साईं मंदिराच्या जाळीला भाविकांनी लाल,पिवळे धागे बांधलेले दिसतात. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून हे धागे बांधतात असे सांगितले जाते.
१२ ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती
भगवान शिवाच्या भव्य मूर्ती भोवती १२ ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती पहायला मिळतात. १२ ज्योतिर्लिंगाचे स्थानमहात्म्य वर्णन करणारे श्लोकही येथे कोरलेले आहेत.
असा आहे : सिद्धेश्वर महादेव!
अतिशय भव्य अशा मंचावर भगवान शंकराची योगसनात बसलेली मूर्ती येथील प्रमुख आकर्षण आहे. भगवान शिवाने उजव्या हाताने आशीर्वाद दिलेला असून मागच्या हातात त्रिशूल धारण केला आहे. डाव्या हातात मणिमाला असून मागील हातात डमरू धरलेला आहे.भगवानाच्या गळ्यात व कमरे भोवती नाग असून डोक्यावरील जटांमध्ये चंद्रकोर आणि गंगा धारण केलेली आहे. भगवान शिवाच्या मूर्तीखाली एक शिव मंदिर आहे. या मंदिरात शिव पुरानातिल कथाचित्रे कोरलेली आहेत. यांत शिव पार्वती विवाह, प्रजापति दक्षयज्ञ, सतीचे कलेवर घेउन फिरणारा शिव, माता पार्वतीची तपस्या, सत्संग किर्तन करणारा भक्त समूह आदींचा यात समावेश होतो.
सर्वांधिक आकर्षक : बद्रिनाथ मंदिर!
यानंतर पुढचे मंदिर दिसते ते जगन्नाथ पुरीचे . येथील श्रीकृष्ण,बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अतिशय प्रभावी आहेत. मला स्वत:ला चारधाम मंदिर समुहातील बद्रीनाथ मंदिर सर्वांत अधिक आकर्षक वाटले. येथील बद्रिनाथ मंदिर पाहिल्यावर मूळ बद्रिनाथधाम प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा मनांत निर्माण झाल्या शिवाय राहत नाही.इतके इथले बद्रिनाथ धामाचे प्रवेशव्दार आकर्षक आहे. या सर्व चारधाम मंदिरांची देखरेख निगा अतिशय उत्कृष्ट आहे. येथे नित्यपूजा, नैवेद्य दाखविले जातात. दुपारी ही चारही मंदिरं बंद केली जातात. फक्त सकाळी आणि सायंकाली ही मंदिरं दर्शनार्थ उघडी असतात. चारधाम सिद्धेश्वर मंदिर परिसर पहायल किमान दोन ते तीन तास लागतात.
या मंदिर समुहाचे एंट्रंस (प्रवेशव्दार) एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस सारखे आकर्षक आहे. येथे वोटिंग कॉरीडोर मध्ये विविध देशांतील चलनांचे नोटांचे प्रदर्शन मांडलेले आहे. विविध देशांतील चलनी नोटांचे हे संकलन प्रेक्षणीय आहे. मंदिरात प्रवेश घेतांना प्रत्येक व्यक्तीला ५० रूपये प्रवेश शुल्क भरावे लागते. येथे सशुल्क यात्री निवास तसेच भोजन व्यवस्था उपलब्ध आहे.
गंगटोक पासून ७८ किमी म्हणजे दोन तासांच्या ड्रायव्हिंग अंतरावर चारधाम मंदिर आहे. दक्षिण सिक्किमच्या ‘पेलिंग’ किंवा ‘जो रे थांग’ पासूनही रस्ता आहे.येथे वर्षभर थंडी खूपच असते. त्यामुळे गरम कपडे सोबत ठेवावेत असा सल्ला दिला जातो.
संपर्क : Solophok Hill, Near Namchi Sikkim
मंदिर वेळा : सकाळी ९ ते सायं ७.००
जवळचे रेल्वे स्टेशनः न्यू जलपाईगुड़ी (९५ किमी)
जवळचे विमानतळ: बागडोगरा विमानतळ (१०५ किमी.)