इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी
कांद्याने आणला चक्क १०५ फुटी हनुमान!
‘इंडिया दर्पण’च्या माध्यमातून देशातल्या सर्वांत उंच आणि भव्य हनुमान मूर्तींची माहिती आपण प्रथमच मराठीतून घेतो आहोत. आज आपण जगातल्या तिसर्या क्रमांकाच्या हनुमान मुर्तीची माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे १०५ फूट उंचीचा हा हनुमान आपल्या महाराष्ट्रातच आहे. गंमत म्हणजे दर्जेदार कांद्यामुळे हनुमानाची १०५ फूट उंचीची मूर्ती येथे स्थापन झाली. हे कसे घडले …!!
शक्तीची देवता असलेला हनुमान उर्फ़ बजरंगबली उर्फ़ मारुती हा संपूर्ण देशांत सर्वांत लोकप्रिय देव आहे. त्याचं रूप आणि त्याच्या शक्तीच्या आणि भक्तीच्या गोष्टी अबालवृद्धांना अनादि कालापासून आकर्षित करीत आल्या आहेत. त्यामुळेच जवळ जवळ प्रत्येक गावात हनुमान मंदिर किंवा हनु मानाची मूर्ती असतेच.’इंडिया दर्पण’च्या माध्यमातून देशातल्या सर्वांत उंच आणि भव्य हनुमान मूर्तींची माहिती आपण प्रथमच मराठीतून घेतो आहोत.
आज आपण जगातल्या तिसर्या क्रमांकाच्या हनुमान मुर्तीची माहिती पाहणार आहोत. विशेष म्हणजे १०५ फूट उंचीचा हा हनुमान आपल्या महाराष्ट्रातच आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा नावाच्या गावात हनुमानाची ही १०५ फूट उंच मूर्ती तयार करण्यात आलेली आहे.गंमत म्हणजे नांदुरा येथील दर्जेदार कांद्यामुळे हनुमानाची १०५ फूट उंचीची मूर्ती नांदुरा येथे स्थापन झाली. हे कसे घडले ते सांगण्यापूर्वी नांदुरा येथील हनुमानाविषयी सांगतो. बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा नावाचा तालुका आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तसेच मुंबई हावड़ा रेल्वे मार्गावर नांदुरा हे गाव आहे. येथे जगातली तिसर्या क्रमांकाची १०५ फूट उंच हनुमान मूर्ती आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ वरून तसेच शेगावला जातांना व परत येतांना ही हनुमान मूर्ती रेल्वेतून देखील दिसते.
अशी दिसते हनुमान मूर्ती
नांदुरा येथील १०५ फूट उंच हनुमान आपल्या दोन्ही शक्तिशाली पायांवर उभा आहे. हनुमानाच्या डोक्यावर सोनेरी मुकुट असून या हनुमानाचा रंग पांढराशुभ्र आहे. हनुमानाचे गाल आणि तोंड लाल रंगाचे आहे. हनुमानाच्या गळ्यात गुढग्यापर्यंत रूळणारी रंगीत फुलांची सुंदर माळ आहे. हनुमानाच्या दोन्ही हातांवर हिरव्या काठांचे उत्तरीय वस्त्र असून गळ्यात सोनेरी रंगाचे हार व सुवर्णमाळा आहेत. नांदुरा येथील ह्नुमानाची शेपटी ७० फूट लांब आहे.हनुमानाची ही मूर्ती अतिशय भव्य आधे. हनुमानाच्या पायाचा तळवाच ५-६ फूट उंच आहे. त्यामुळे या मूर्ती समोर उभं राहिल्यावर हनुमानाची भव्यता पाहून भाविक नतमस्तक होतो.
नांदुरा येथील हनुमान मूर्ती अतिशय सुंदर आणि वैशिष्ट्येपूर्ण आहे. मूर्तीच्या कपाळावर सुवर्ण लेपन केलेले तिलक लावलेले आहेत.या मूर्तीला १ ते १२ इंच आकाराचे १००० कृत्रिम हिरे लावलेले आहेत. मूर्तीचे डोळे वैशिष्ट्येपूर्ण असून २७ बाय २४ आकाराचे आहेत. दरवर्षी हनुमान जयंतीला मूर्तीला ३५० किलो फुलांचा हार रिमोट द्वारे चढविला जातो. या विशाल मूर्तीला रिमोट द्वारे जलाभिषेक केला जातो हे दृश्य विलोभनीय असते.
प्रत्येक गावाची एक स्वतंत्र ओळख असते. २००१ पासून बुलढाना जिल्ह्यातील नांदुरा या गावाची ओळख हनुमान नगरी म्हणून होत आहे. हनुमानाची जगातली तिसरी १०५ फूट उंच मूर्ती नांदुरा येथे कशी आली आणि तिने नांदुरागावाला हनुमान नगरी अशी नवीन ओळख कशी मिळवून दिली ते आता सांगतो.
येथे कांद्याने कसा आणला हनुमान?
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा नावाचे एक लहानसे गाव आहे. येथील एक शेतकरी आपल्या शेतात पिकलेला कांदा घेउन विक्रीसाठी नागपुरच्या मार्केट मध्ये गेला. आंध्र प्रदेशातील शिवराम मोहनराव नावाच्या कांदा व्यापार्याला तो कांदा इतका आवडला की त्याने नांदुरा येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. नांदुरा परिसरात त्याने कांदा,मिरची आणि धान्य बाजार पेठेत व्यवसाय सुरु केला. मेहनत आणि सचोटी केलेल्या या व्यवसायाने शिवराम मोहनराव लवकरच लक्षाधीश आणि पुढे कोट्याधिश झाले.
शिवराम मोहनराव हे श्री बालाजीचे भक्त आहेत. नांदुरा येथे बालाजीचे मंदिर बांधण्याची प्रेरणा त्यांना मिळाली त्यानुसार १९९९९ मध्ये त्यांनी श्री तिरुपतीबालाजी संसथान या न्यासाची स्थापना केली. तिरुपती येथील डोंगराच्या सुरुवातीला असलेल्या गरुडाची उंच मूर्ती पाहून आपणही नांदुरा येथे अशीच चाळीस ते पन्नास फूट उंचीची हनुमानाची मूर्ती स्थापन करावी अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. घरी आल्यावर त्यांनी मूर्तीच्या बांधकामाची योजना सुरु केली. त्यासाठी चाळीस ते पन्नासलाख रूपये खर्च येईल याची त्यांना कल्पना आली.
येवढा खर्च करण्याची त्यांची तयारी होती त्यानुसार नियोजन सुरु झाले. परंतु काही कामासाठी ते दिल्लीला गेले. तिथे ८० फूट उंचीची हनुमान मूर्ती तयार करण्यात येत असल्याचे त्यांना समजले. त्यामुले त्यांनी ५० फुटांऐवजी १०५ फूट उंच हनुमान मूर्ती नांदुरा येथे तयार करण्याचा संकल्प केला. त्यानुसार १९९९ मध्ये नांदुरा गावाच्या पश्चिमेला भूमिपूजन करण्यात आले. आंध्र प्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉनबाबू या मुर्तिकाराने २१० दिवस रात्रंदिवस काम करुन १०५ फूट उंचीची ही हनुमान मूर्ती तयार केली . ८ नोव्हेंबर २००१ रोजी गोवर्धन पीठ जगन्नाथ पुरी येथील जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री १०८ निश्चलानंदजी महाराज यांचे शुभ हस्ते हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण करण्यात आले.
हनुमानाची ही विशाल मूर्ती बनविण्यासाठी ८०० क्विंटल लोखंड, ३७५ ट्रक सिमेंट वापरण्यात आले. ही मूर्ती तयार करण्यासाठी ७० लाख रूपये खर्च आला. नांदुरा येथील मुर्तीची जगातील तिसर्या क्रमांकाची हनुमान मूर्ती अशी नोंद २००३ मध्ये लिम्का बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड करण्यात आली आहे. या महाकाय हनुमान मूर्तीच्या मागेच भव्य असे श्री बालाजी मंदिर देखील बांधण्यात आले आहे. १०५ फूट उंचीच्या या हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक दर्शनार्थी येथे येतात. पूजा अभिषेक करून हनुमानाचे दर्शन घेउन प्रसन्न होतात. आपणही जेंव्हा शेगावला श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला जाल तेंव्हा नांदुरा येथील जगातला तिसर्या क्रमांकाचा सर्वांत उंच हनुमान पहायला विसरु नका.
Column Rauli Mandiri 105 Feet Hanuman by Vijay Golesar