इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी
दिल्लीचा १०१ फुटी मंगल महादेव!
देशांतल्या मोठ मोठ्या महादेवाच्या मुर्तींची ही आगळी वेगळी लेखमाला इंडिया दर्पणच्या सुज्ञ वाचकांच्या पसंतीस पडत आहे ही आनंदाची बाब आहे. देशाच्या विविध भागांत भगवान शिवाच्या उंच आणि भव्य मूर्ती तरुण पिढीच्या आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरत आहे. राजधानी दिल्लीतही १०१ फूट उंचीची भगवान शंकरांची भव्य मूर्ती देशी आणि विदेशी पर्यटकाचे लक्ष्य वेधून घेते आहे. कारण दिल्ली एअरपोर्ट जवळच हे प्रसिद्ध मंदिर आहे. आज आपण दिल्लीच्या १०१ फूट उंचीच्या मंगल महादेवाची माहिती घेणार आहोत.

मो. ९४२२७६५२२७
दिल्ली एयरपोर्टच्या जवळ मंगल महादेव नावाचे एक अतिशय आकर्षक मंदिर आहे. दिल्ली चेन्नई हाय-वे क्रमांक 48 (जुना हाय-वे क्रमांक 8) वर दिल्ली – गुरगांव रोडवर नवी दिल्ली एयरपोर्ट समोर विरूद्ध दिशेला भगवान शिवाची १०१ फूट उंचीची विशाल मूर्ती रोडवरून येणार्या जणारांचे लक्ष वेधून घेते. हाय-वे पासून अवघ्या अर्ध्या मिनटाच्या ड्रायव्हिंग नंतर एवेन्यू बोगेनवेलिया उर्फ़ “मंगल महादेव मंदिर” दृष्टीस पड़ते. मंदिरा बाहेर बोर्ड वर मंदिराचे नाव लिहिलेले आहे – ‘मंगल महादेव मंदिर’, रंगपुरी, दिल्ली.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिक्युरिटी गार्ड कैमरेधारकांना सूचना देतात, “येथे व्हीडियो शूटिंग करायला परवानगी नाही. जल्दी से दर्शन करके वापिस आइये”. कोरोना मुळे येथे अजूनही दर्शनार्थीना गर्दी करायला परवानगी दिली जात नाही. आम्ही गेलो तेव्हा इथल्या संपूर्ण परिसरात शंभर सव्वाशेच्या आसपास दर्शनार्थी असतील, परंतु ५ एकर क्षेत्रफळाच्या या प्रचंड मोठ्या परिसरात विखुरलेल्या शंभर सव्वाशेंच्या जमावाला गर्दी म्हणजे विनोदच!
शिव परिवार
पद्त्राने काढून, हात पाय धुवून आपण भगवान शिवाच्या मूर्तीकड़े जावू लागतो. आपल्या दोन्ही बाजूंना दूरपर्यंत हिरवीगार लॉन पसरलेली असते.आणि समोर असते भगवान शंकरांची १०१ फूट उंच भव्य मूर्ती. जवळून ही मूर्ती पाहताना जणू ती आकाशाला टेकली की का्य असा भास होतो. या लॉनवर डाव्या बाजूला धनुर्धर भगवान श्री राम आणि माता जानकी तर आपल्या उजव्या बाजूला योगेश्वर श्रीकृष्ण आणि राधा यांच्या २५ फूट उंचीच्या आकर्षक मूर्ती दिसतात. मंगल महादेवच्या मूर्ति जवळ जावून लक्ष्य पूर्वक पाहिल्यावर आपल्या उजव्या बाजूला माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपति या आपल्या दोन विश्वप्रसिद्ध पुत्रांसह विराजमान झालेली दिसते.
आणि हो आपल्या डाव्या बाजूला भगवान शिवाचे आवडते वाहन विशाल नन्दीच्या रुपांत पहायला मिळते.या बाकीच्या मूर्तीचा आकार भगवान शिवाच्या मूर्तीच्या तुलनेत लहान असल्या मुळे दुरून त्या लक्षांत येत नाहीत. हाय-वे वरून येता -जातांना भगवान शिवाची प्रतिमा मात्र दूरूनच लक्ष्य वेधून घेते. मंगल महादेव मंदिराची निर्मिती श्री सरल बसंत बिड़ला यांनी केली आहे.आणि माजी प्रधानमंत्री स्व. अटल बिहारी बाजपेयी यांनी दिनांक १० मार्च १९९४ रोजी या मंदिराचे लोकार्पण केले.
मंदिरातील सुविधा
या मंदिरांत पिण्यासाठी कूलरचे थंड पाणी, टॉयलेट्स,बसण्यासाठी अनेक ठिकाणी बेंच आदिची उत्तम व्यवस्था केलेली आहे. या शिवाय मंगल मंजूषा नावाचे प्रसाद व धार्मिक वस्तू आणि ग्रंथ यांचे रिटेल काउंटर देखील येथे उपलब्ध केलेले आहे. एक सत्संग हॉलही येथे आहे. परन्तु करोना मुळे सध्या येथे कार्यक्रमांचे आयोजन केले जात नाही. सध्या हा सत्संग हॉल बन्दच आहे.
जय श्री चैरिटेबिल ट्रस्टने या मंदिराच्या देखरेखीचीजवाबदारी घेतलेली आहे. इथली स्वच्छता शांतता आणि सुव्यवस्था नजरेत भरते. मंदिर परिसरातील तुळसी, आंबे ,पिंपळ आणि केळीच्या खांबांच्या रांगा पाहून मन मोहित होते.
मंगल महादेव मंदिराच्या प्रवेश द्वारा समोर बस थांबते याचा अर्थ या मंदिरात येण्या जाण्यासाठी सार्वजनिक परिवहन सेवा उपलब्ध आहे. तसेच मंगल महादेव बिड़ला कानन येथे पहिले तीस मिनट कार पार्किंग निःशुल्क आहे.
संपर्क : मंगल महादेव मंदिर,४३ शिवाजी मार्ग, अव्हेन्यु बोगनव्हिला , रंगपुरी,एरोसिटी नवी दिल्ली- ११००३८
दर्शन वेळा : आठवड्याचे सातही दिवस सकाळी ६ ते रात्री १०