रुद्रनाथ येथे भगवान शंकरांची मुख पूजा केली जाते. बहुदा सगळ्या शिव मंदिरांत शिवलिंगाची स्थापना केलेली असते. रुद्रनाथ हे एकमेव ठिकाण असे आहे जेथे भगवान शंकरांचे स्वयंभू मुख पहायला मिळते. हिमालयाच्या अत्युच्च शिखरावर रुद्रनाथ मंदिर आहे.समुद्र सपाटीपासून सुमारे बारा-तेरा हजार फूट उंचीवरील रुद्रनाथ मंदिराचा हा सगळा परिसर निसर्ग सौंदर्याने इतका समृद्ध आहे की त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.
हिमालयातील गढ़वाल प्रांतात भगवान शंकरांची पाच मंदिरं ‘पंचकेदार’ नावाने प्रसिद्ध आहेत. एका पौराणिक आख्यायिकेनुसार पंचकेदारची ही पाचही मंदिरं पांडवांनी बांधली आहेत. महाभारत युद्धानंतर भगवान शंकरांचे दर्शन घेण्यास हिमालयात गेलेल्या पांडवाना भगवान शंकरानी पांच ठिकाणी रेड्याच्या रुपांत दर्शन दिले तेच हे पंचकेदार. केदारनाथ- येथे पांडवाना महारेड्याची पाठ दिसली, मध्यमहेश्वर येथे नाभीचे , तुंगनाथ येथे ह्दय आणि दोन भुजा यांचे, रुद्रनाथ येथे भगवान शंकरांचे मुख दर्शन झाले तर कल्पेश्वर येथे भगवान शिवाच्या जटांचे दर्शन झाले.
पाण्डवांना जेथे शिवाच्या मुखाचे दर्शन झाले ते ठिकाण म्हणजे रुद्रनाथ! हिमालयाच्या गढवाल प्रांतात समुद्रसपाटी पासून सुमारे ३५५९ मीटर उंचीवर म्हणजेच सुमारे बारा हजार फूट उंचीवर रुद्र्नाथाचे मंदिर आहे. रुद्रनाथ हे जगातील सर्वाधिक उंचीवरील शिव मंदिर आहे.
रुद्रनाथ येथे भगवान शंकरांची मुख पूजा केली जाते. बहुदा सगळ्या शिव मंदिरांत शिवलिंगाची स्थापना केलेली असते. रुद्रनाथ हे एकमेव ठिकाण असे आहे जेथे भगवान शंकरांचे स्वयंभू मुख पहायला मिळते. हिमालयाच्या अत्युच्च शिखरावर रुद्रनाथ मंदिर आहे. येथून ‘नंदादेवी’, ‘कामेट’, ‘त्रिशूली’ आणि ‘नंदाघुंटी’ ही पर्वत शिखरे अतिशय स्पष्ट आणि खुपच जवळ दिसतात.
रुद्रनाथला जाण्यासाठी सर्व प्रथम गोपेश्वर येथे जावे लागते. हे चमोली जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गोपेश्वर हे एक आकर्षक हिलस्टेशन देखील आहे. येथे ऐतिहासिक गोपीनाथ मंदिर आहे. या मंदिरातील सुप्रसिद्ध लोखंडी त्रिशूल यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण आहे. गोपेश्वर पासून सुमारे पाच किमी अंतरावर ‘सगर’ नावाचे लहानसे खेड़े आहे. येथून २२ किमी अंतरावर रुद्रनाथ मंदिर आहे.
‘सगर’ पासून २२ किमी पर्यंतचा हा रस्ता अतिशय खडतर आहे. निसर्गाचे अतिशय मनमोहक तसेच प्रचंड रौद्ररूप या पर्वत वाटेवर पहायला मिळते. सगर पासून ३ किमी वर ‘ल्विटी बुग्याल’ नावाचे हिरवेगार गवती पठार आहे. गढ़वाली भाषेत ‘बुग्याल’ म्हणजे गवताचे पठार. त्यानंतर ३ किमी चढ़ाईची पायवाट चढून गेल्यावर ‘पनार बुग्याल’ नावाचे गवताळ पठार लागते.
दहा हजार फूट उंचीवरील पनार बुग्याल रुद्रनाथ यात्रा मार्गातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून ११ किमी अंतरावर रुद्रनाथ मंदिर आहे. या ठिकाणी घनदाट वृक्षांचा प्रदेश संपून मखमली गवताची आणि हज़ारो लाखो रंगीबेरंगी फुलांची पठारं सुरु होतात. फूलोंकी घाटीची आठवण यावी अशी ही निसर्गाची नवलाई आहे.
रुद्रनाथचा हा रस्ता चढायला जेवढा अवघड तेवढाच तो निसर्गसौंदर्याने कमालीचा समृद्ध झालेला आहे. त्यामुळे येथे येणारा भाविक किंवा पर्यटक इथली वाटचाल आणि इथले निसर्गसौंदर्य जन्मात कधी विसरत नाही. पनार पठारावर ‘डुमुक’ आणि ‘कठगोट’ गावातले लोक आपली जनावरं चारायला येथे घेवुन येतात. हेच लोक यात्रेकरुंना चहा,सरबत पुरवितात. पनार बुग्याल पठारावरुन हिमालयाच्या हिमाच्छादित भव्य शिखारांचे जे मनमोहक दृश्य दिसते ते इतर कुठून क्वचितच दिसत असेल.
पनारच्या पुढे साधारण दोन किमी अंतरावर ‘पित्रधार’ नावाचे ठिकाण आहे. येथे शिव, पार्वती आणि नारायण यांची लहान दगडी मंदिरं आहेत. या ठिकाणी यात्रेकरू आपल्या पितरांच्या नावाने ‘दगडं’ ठेवतात. या ठिकाणी वनदेवीचे मंदिर आहे. येथे काही यात्रेकरू देवीला बांगड्या, बिंदी, चुनरी वाहतात. रूद्रनाथची अवघड चढण येथे संपते आणि हलकासा उतार येथून सुरु होतो.पनार ते पित्रधार मार्गे अकरा किमीची वाटचाल पूर्ण करुन यात्रेकरू रुद्रनाथला पोहचतो. पंचकेदार यात्रेतील रुद्रनाथ हे चौथे केदार आहे.
येथे एका भव्य नैसर्गिक गुहेत असलेल्या मंदिरांत भगवान शंकराची पाषण मूर्ती आहे. शिवाचे मुख या ठिकाणी पहायला मिळते. भगवान शिवाची ही मूर्ती स्वयंभू आहे असे म्हणतात. मंदिराजवळच्या ‘वैतरणी’ नावाच्या कुंडात शक्तीरुपांत भगवान विष्णूंची शेषशायी मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला पांच पांडव,कुंती आणि दौपदी यांची छोटी छोटी दगडी मंदिरं आहेत.
मंदिरांत प्रवेश करण्यापूर्वी यात्रेकरू ‘नारद’ कुंडात स्नान करुन आपला थकवा घालवितात आणि त्यानंतर मंदिरांत दर्शानासाठी जातात. मंदिराजवळ सूर्यकुंड, चन्द्रकुंड, तारकुंड आणि मानकुंड इत्यादि पवित्र कुंड आहेत.
रुद्रनाथ मंदिराचा हा सगळा परिसर निसर्ग सौंदर्याने इतका समृद्ध आहे की त्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. सर्वत्र मखमली हिरवळीवर फुललेली रंगीबेरंगी फुलं मन आकर्षित करतात.वाटेत हिमालयीन मोर, मोनाल, थार, थुनार आणि मृग म्हणजे हरणासारखी जंगली जनावरं दिसतात. बिन शेपटीचे शाकाहारी उंदीर आपल्याला वाटेत नाचतांना, बागडतांना दिसतात. भोजपत्राच्या वृक्षाप्रमाणेच एवढ्या प्रचंड उंचीवर असंख्य ब्रह्मकमळं देखील उमललेली दिसतात. मंदिर समितीचे पुजारी यात्रेकरुंना शक्य तो सर्व प्रकारची मदत करतात.परन्तु येथे खाण्यापिण्याची आणि रहाण्याची व्यवस्था स्वत: करावी लागते.
रुद्रनाथ मंदिर परंपरेनुसार अक्षय्य तृतीयेला उघडतात व् दिवाळीनंतर बंद करतात. हिमवर्षावाच्या शीतकाळात सहा महिन्यासाठी रुद्रनाथाची गादी गोपेश्वर येथील गोपीनाथ मंदिरात ठेवतात. येथेच रुद्रनाथाची नित्यपूजा केली जाते.
कसे जावे
ॠषिकेष पासून २१२ किमी अंतरावर गोपेश्वर आहे. ॠषिकेष वरून बस किंवा टँक्सी द्वारे सहजगत्या गोपेश्वरला जाता येते. गोपेश्वर हे प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.येथे टूरिस्ट रेस्ट हाउस,पीडब्ल्यूडी बंगले,छोटी होटेल्स आणि लॉजेस सहज उपलब्ध होतात. रात्री गोपेश्वर येथे मुक्काम करून दुसर्या दिवशी पहाटे रुद्रनाथची यात्रा सुरु करता येते.
रुद्रनाथला कसे जावे
पहिला मार्ग- गोपेश्वर पासून पांच किमी अंतरावर ‘सगर’ नावाचे लहानसे गाव आहे.येथून पोर्टर, गाइड,घोड़े, खेचर आदि उपलब्ध होतात. सगर येथून २२ किमीची चढ़ी चढण चढूनच यात्रेकरू रुद्रनाथला पोहचतात. ही चढण म्हणजे यात्रेकरुंच्या श्रद्धेची परिक्षा आणि ट्रेकिंग शौकिनांसाठी आव्हान असते. हा सर्व रस्ता घनदाट झाडींचा,डोंगरदरयांचा जंगली पायवाट रस्ता आहे. त्यामुळे पूर्ण तयारी करून निघणेच उत्तम.
गोपेश्वर येथे पोर्टर आणि गाइड सहज मिळतात. एक वेळा पोर्टर घेतले नाही तरी चालते पण प्रथम जाणार्यांनी ‘गाइड’ अवश्य घ्यावा कारण या संपूर्ण मार्गावर कोठेही मार्गदर्शक पाट्या किंवा बोर्ड्स नाहीत. रस्ता घनदाट जंगलाचा आहे त्यामुळे वाट चुकली तर योग्य मार्गावर येणे कठिन होते. त्यामुळे शक्यतो गाइड करावा. दुसरा मार्ग – जोशीमठ पासून देखील ४५ किमी अंतरावर ट्रेकिंग मार्गाने रुद्रनाथला पोहचता येते.
केव्हा जावे
खरं तर में महिन्यात रुद्रनाथ मंदिराची कपाटं उघडल्यावर येथील यात्रा सुरु होते परंतु ऑगस्ट-सप्टेम्बर महिन्यात येथील निसर्ग खर्या अर्थाने खुलतो, फुलतो, बहारतो त्यामुळे निसर्गाचे अविस्मर्णीय सौंदर्य अनुभवन्यासाठी यात्रेकरू आणि ट्रेकिंग शौकिन हाच काळ निवडतात!
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!