इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– पॅव्हेलिअन –
टी२० विश्वचषकाचा थरार
टी२० चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात सुरू झालाय. संघ दाखल झालेत. ग्रुप स्टेज आणि सराव सामने आता संपतील आणि ‘सुपर १२’ नावाच्या फेरीचा मुख्य दरवाजा आता उघडला जाईल. यासंदर्भात लिहित आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक जगदीश देवरे…
रविवार २३ ऑक्टोबर, भारतीय संघाची पहिली लढत होतेय ती पाकिस्तानशी… हा सामना पंरपरागत शत्रूत्व आणि त्यातून निघणारी खुन्नस या दोन स्तरावर खेळला जाईल. या सामन्याचा रिझल्ट काय लागतो, यावर संघाचे पुढचे मनोबल, धैर्य वगैरे निश्चीत होईल, असे म्हणतात. म्हणजे नेमकं काय होईल हे माहिती नाही. पण एक नक्की आहे की या ‘जलशातून’ पुढे गेल्यावरच भारतीय संघासाठी खऱ्या अर्थाने विश्वचषकाची लढाई सुरू होणार आहे. म्हणजे अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात आपण जर जिंकलो तर, आशिया चषकातील अनुभवाच्या आधाराने हे विधान करावे लागेल की या स्पर्धेतले पुढचे काही सामने ‘सहज’ म्हणून घेतले जातील आणि पराभूत झालोच (दुदैवाने) तर मग विचारायलाच नको…..!
भारतीय संघाला किमान काही दिग्गजांनी तरी आत्तापर्यंत या स्पर्धेच्या संभाव्य विजेतेपदाचा दावेदार ठरवलंय. सुनिल गावस्कर, टॉम मुडी यांनी ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दाेन संघ अंतिम सामन्यात पोहोचतील अशी शक्यता वर्तवली असली तरी त्या मागच्या भावना वेगळ्या आहेत. प्रत्यक्षात हा विश्वचषक भारतीय संघासाठी मात्र एक कठीण ‘टास्क’ ठरणार आहे हे निश्चित. क्रिकेट हा कितीही अनिश्चिततेचा खेळ असला तरी प्रबळ दावेदार कुणाला म्हणायचं याच्या काही चाचण्या ठरलेल्या आहेत. त्यातली पहिली आणि महत्वाची चाचणी म्हणजे फलंदाजी, गाेलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांपैकी कुठेही हा संघ दुबळा किंवा कमजोर नसावा लागतो.
गेल्या काही टी२० सामन्यातले भारतीय संघाचे पराभव बघितले तर त्यातले बहुतांशी सामने हे आपल्या गोलंदाजांनी गमावलेले आहेत हे विसरता येणार नाही. संघात रोहित शर्मा आहे, विरोट कोहली आहे. ज्यांना गेम चेंजर म्हणता येईल असे सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिकही आहेत. परंतु हेच गेम चेंजर गोलंदाजीत शोधायचे झाल्यास हाती काहीच लागत नाही. जसप्रीत बुमराह अनफीट ठरला. पुढे रविंद्र जाडेजाच्या बाबतीत तेच घडलं आणि मग कहर म्हणजे २०२२ च्या आयपीएल मध्ये जो दिपक चाहर सर्वाधिक पैसे मोजून लिलावात घेतला होता तो देखील अनफिट ठरला. खेळाडूंचा फिटनेस हा जरी खेळाचा एक भाग असला तरी काही दिवसांच्या फरकाने बसलेले हे तीन सलग फटके भारतीय संघासाठी विश्वचषकात घातक ठरू शकतील इतके मजबूत आहेत.
फंलदाजीत आमच्याकडे दादा मंडळी आहेत, परंतु त्याने काही होणार नाही. जमवलेल्या धावा डिफेंड करण्यासाठी किंवा आमच्या या दादा मंडळींवर दबाब येणार नाही इतक्या कमी धावसंख्येवर विरूद्ध संघाला रोखण्यासाठी आमच्या ताफ्यात असलेल्या गोलंदाजांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, जी अशक्य वाटतेय. खासकरून १७, १८ आणि १९ व्या षटकांवर भारतीय संघासाठी साडेसाती सुरू असल्याचा जो काही भास होतोय. ताे दुर झाल्याशिवाय आमची गोलंदाजी देखील दमदार आहे, असे म्हणण्याचे धाडस करता येणार नाही. मोहम्मद शामीने सराव सामन्यात चांगली कामगिरी करून काही आशा अपेक्षा जिंवत केल्या आहेत, परंतु त्याला कामगिरीत सातत्य ठेवावेच लागेल.
हा विश्वचषक आहे आणि तो देखील ऑस्ट्रेलियासारख्या खेळपट्यांवर खेळवला जाणारा. जिथे भारतीय संघाला क्रिकेटमध्ये फारसं यश मिळत नाही. आयसीसी टी२० विश्वचषकाच्या विजेतेपदाचा इतिहास देखील मनोरंजक आहे. ७ विश्वचषकात ६ वेगवेगळे विजेते या चषकाला लाभले आहेत. भारत (२००७), पाकिस्तान (२००९), इंग्लंड (२०१०), वेस्ट इंडीज (२०१२ आणि २०१६), श्रीलंका (२०१४) आणि
आस्ट्रेलिया (२०२१) अशी ही ट्रॉफी जगभर फिरून आली आहे. एकट्या वेस्ट इंडिजचा अपवाद जर सोडला तर कुणालाही दुसऱ्यांदा विजेतेपद मिळालेले नाही. यंदाचा विश्वचषक कुणाच्या नावावर जाईल याचे उत्तर देणे कठीण असेलही कदाचित, परंतु भारतीय संघासाठी ही कामगिरी अवघड वळणाची आहे हे मान्य करावेच लागेल. या अवघड वळणावर भारतीय संघाने बाजी मारली तर १३ नोव्हेंबर २०२२ हा दिवस भारतीय संघासाठी खास असेल.
Column Pavilion T20 World Cup by Jagdish Deore